परमा : गोनोरिया

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. लैंगिक संबंध असणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये गोनोरियाची लागण आढळू शकते.

लक्षणं

पुरुषांमध्ये

  • मूत्रनलिकेची आग
  • सकाळी लघवी करताना आधी एक-दोन थेंब पू येणे, कधीकधी यापेक्षा अधिक प्रमाणात वारंवार पू येणे
  • क्वचित कुणामध्ये अंडकोषांमध्ये वेदना

स्त्रियांमध्ये

  • मूत्रनलिकादाह आणि गर्भाशयाच्या तोंडाचा दाह होतो व त्यातून पू येतो.

गुदमैथुन करत असल्यास स्त्री पुरुषांमध्ये गनोरियाचा संसर्ग असल्यास पुढील लक्षणं आढळतात.

  • गुदद्वारातून स्राव किंवा रक्तस्राव
  • खाज आणि दाह
  • शौचाच्या वेळी वेदना
वेळीच उपचार न झाल्यास

पुरुषांमध्ये – मूत्रमार्गाचा दाह तसेच वीर्यकोश (सेमिनल व्हेसिकल), पुरुषस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्रंथी) व क्वचित बीजांडापर्यंत आजार पोचण्याची शक्यता असते. असे झाल्यास मूत्रमार्गदाहाची किंवा जननसंस्थेच्या दाहाची लक्षणे दिसतात. ‘पू’ जास्त प्रमाणात येणे, मूत्रनलिकेच्या मुळाशी दुखरेपणा, इत्यादी त्रास आढळतो.

स्त्रियांमध्ये – आजार गर्भनलिकेमध्ये आणि त्यानंतर ओटीपोटात पोचण्याची शक्यता असते. गर्भनलिकांना सूज आली तर नंतर गर्भनलिका आकसून बंद होण्याची शक्यता असते. परमा हे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

परमा झालेल्या स्त्री-पुरुषांमध्ये अपुऱ्या उपचारांमुळे मूत्रनलिकेचा आकार बिघडून लघवी अडकण्याचा संभव असतो.

निदान कसं करायचं?

पुरुषांमध्ये परमा आजाराचे रोगनिदान करणे सोपे असते. स्त्रियांमध्ये मात्र योनिमार्ग व गर्भाशयाची आतून तपासणी केल्यावरच निदान होऊ शकेल. गर्भाशयाच्या, मूत्रनलिकेच्या तोंडातून ‘पू’ येणे ही महत्त्वाची खूण आहे. आजार मूत्राशयात किंवा गर्भाशयातून ओटीपोटात गेला असेल तर ओटीपोटात दुखरेपणा आढळतो. शंका वाटत असेल तर पुवाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून खात्री केली जाऊ शकते.

उपचार                                                                           

परमा किंवा गोनोरियामध्ये सिप्रो (सिप्रोफ्लॉक्सॅसीन) गोळयांचा 1 ग्रॅम डोस हा सर्वात चांगला उपाय आहे. हे औषध नसल्यास कोझाल आठ गोळया (एकदम) किंवा रोज एक गोळी याप्रमाणे तीन दिवस दिल्यास आजार बरा होतो. नुसते पेनिसिलीनही चांगले लागू पडते. याबरोबर मूत्रमार्ग किंवा गर्भाशयात आजार पोचला असेल तर तज्ज्ञाकडून अधिक उपचार करणे आवश्यक आहे. याबरोबर लिंगसांसर्गिक रोगांचे आणखी काही प्रकार नाहीत याची खात्री करणे आवश्यक असते. यासाठी प्राथमिक उपचार देऊन तज्ज्ञाकडे पाठवावे हे चांगले.

समजून घ्या

वेळीच निदान झालं आणि योग्य उपचार झाले तर गनोरिया बरा होतो मात्र उपचार घेतले नाहीत तर जीवावर बेतू शकते. औषधोपचार पूर्ण झाला तरी किमान 8-15 दिवस लैंगिक संबंध टाळा. गनोरिया एकदा होऊन गेला तरी परत होऊ शकतो.

(या माहितीसाठी – www.arogyavidya.net, www.lovematters.in या वेबसाइट्सची मदत घेण्यात आली आहे)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap