‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २

मागच्या भागात आपण  लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी दिशाची मुलाखत वाचलीत. आता मुलाखतीचा दुसरा  भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. हिजडा समाजातील नाती, प्रेम, कमिटमेंट, इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि लैंगिक विविधतेला स्वीकारलं जावं यासाठी काय करायला हवं याविषयी दिशा बोलली आहे.

प्रश्न – प्रत्येक नात्यामध्ये नाती, प्रेम, कमिटमेंट, इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स असतात. लैंगिक वेगळेपण असणाऱ्या लोकांच्या नात्याविषयी समाजामध्ये नेहमी उत्सुकता असते शिवाय गैरसमज देखील असतात. याबद्दल काय सांगशील?  

शब्दवेडी दिशा: नात्यांबद्दल विचारलंत तर आमच्यातदेखील नाती देखील तशीच असतात, जशी LGBT कम्युनिटी मधील लोकांची असतात किंवा हेट्रोसेक्शुअल लोकांमध्ये असतात. फरक इतकाच असतो की खूपदा आमच्यातली नाती टिकून राहत नाहीत. हिजडा कम्युनिटीमधल्या लोकांची देखील इतर लोकांसारखी स्वप्नं असतात. पण आमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन चांगला नसल्याने ती पूर्ण होणं अवघड असतं. त्यातून सतत एक प्रकारचं मानसिक असमाधान राहतं, stability येत नाही, पार्टनर्स बदलत राहतात असे अनेक प्रॉब्लेम येतात. मला विचाराल तर पितृसत्ता आणि पुनरुत्पादन या दोन्ही गोष्टींनी आपल्या नात्यांवर फार प्रभाव टाकलाय आणि माझ्या मताने या गोष्टींनी नात्यांना नष्ट केलंय. आपल्या पार्टनरचं आपण संरक्षण करायचं ही भावना पितृसत्ताक व्यवस्थेनं इतकी जास्त रुजवली आहे की तीच गोष्ट समलैंगिक संबंध असणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील दिसते. त्यामुळं जो संरक्षण करतो त्याला आपोआप शोषण करण्याचा अधिकार मिळतो किंवा तसं त्या व्यक्तीच्या डोक्यात भिनलेलं असतं.

माझं पाहिलं नातं याच कारणामुळं तुटलं. माझा पहिला पार्टनर माझ्याबरोबर एखाद्या टिपिकल, पुरुषी भावना असणाऱ्या नवऱ्यासारखं वागायचा. मी पण लहानपणापासून ज्या स्त्रियांना बघितलं होतं, त्या स्त्रियांप्रमाणे  त्याच्याशी वागायचे. सेक्सबद्दल विचाराल तर आमच्या कम्युनिटीमध्ये पहिला सेक्स म्हणजे बऱ्याचदा रेपच असतो. बऱ्याचदा मित्रच इमोशनल शोषण करून सेक्स करतात. तोही रेपच असतो पण सेक्स जेव्हा मर्जीनं केला असेल तर छान वाटतं. हिजडा कम्युनिटीमधील व्यक्तीसोबत जे पुरुष संबंध ठेवतात ते बऱ्याचदा विवाहित असतात आणि आपल्या पत्नीच्या मासिक पाळी मध्ये त्यांना स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नाही म्हणून ते कम्युनिटीमधील व्यक्तीसोबत संबंध ठेवायला येतात. असं होणं हे फक्त आमच्या समुदायाच्या व्यक्तीसोबतच  नाही तर कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ शकतं त्यामुळं आज आपल्याला गरज आहे ती नात्यांचा खरा अर्थ जाणून घेण्याची.

प्रश्न – हिजडा लैंगिक ओळख असणाऱ्या व्यक्तींना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं?

शब्दवेडी दिशा: आपण वेगळे आहोत, आपल्याला समाज स्वीकारणार नाही या भावनेतून येणारं डिप्रेशन किंवा इतर मानसिक त्रास, जसं की सेक्शुअल गरज पूर्ण न होणं, त्यातून आत्महत्या करणं असे प्रॉब्लेमदेखील आहेत. बरेच लोक आपली लैंगिक ओळख समाजापुढे कबूल करायला घाबरतात किंवा काही कारणास्तव स्वीकारत नाहीत आणि लग्न करतात, मुलांना जन्म घालतात पण आनंदी रहात नाहीत. मग लपून छपून दुसऱ्या पार्टनरबरोबर सेक्स करतात, त्यातून बऱ्याचदा एच. आय. व्ही. होण्याची संभावना असते. कम्युनिटीमध्ये लोक खुश राहतातच पण मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे समाजाचा दृष्टीकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असे प्रॉब्लेम येत राहणार. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हिजडा कम्युनिटीतील लोकांना वेगळी ओळख मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे लोक कोणालाही हिजडा म्हणतात, मग तो गे असो, लेज्बिअन असो, बायसेक्शुअल असो किंवा आणखी कोणी असो. त्यामुळं होतं काय की आम्ही एकमेकांना नावं ठेवत बसतो आणि एकमेकांशी भांडत बसतो.

दुसरा प्रॉब्लेम आहे शिक्षणाचा. लिंगबदल केलेल्या व्यक्तीकडून सरकार इतकी सगळी कागदपत्र आणि प्रूफ मागतात की हैराण व्हायला होतं. पॅन कार्ड, आधार कार्ड काढायला त्रास होतो त्याचं मुख्य कारण आहे वेगळी आयडेंटिटी नसणं. आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे हिजडा असणं हे समाजामध्ये तितक्या सहजासहजी स्वीकारलं जात नाही. एखाद्या हिजड्याचं दुःख ऐकून लोक दुःखी होतात, त्यांना वाईट वाटतं पण म्हणून जर का त्यांच्याच घरात एखादी अशी व्यक्ती जन्माला आली किंवा अशा व्यक्तीचा स्वीकार करायला त्यांना सांगितलं तर मात्र लोक ते करत नाहीत.

प्रश्न – लैंगिक विविधतेला समाजामध्ये मान्यता मिळावी म्हणून काय करायला पाहिजे ?

शब्दवेडी दिशा: जर आपल्याला हिजडा किंवा LGBT कम्युनिटीमधल्या व्यक्तीला समाजप्रवाहामध्ये आणायचं असेल तर पहिल्यांदा तर गरजेचं आहे बघताच क्षणी एखाद्या व्यक्तीबद्दल मग ती व्यक्ती आपला भाऊ, बहिण असो, आजूबाजूच्या इतर व्यक्ती असोत, शेजारपाजारचे लोक असोत, त्यांच्याबद्दल जजमेंटल न होणं. त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्याशी बोलून, त्यांना समजून घेऊन मग त्यांच्याबद्दल आपलं मत बनवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्यापाशी येऊन स्वतःच्या लैंगिकतेबद्दल मोकळी होत असेल तर त्या गोष्टीचा इश्यू न करता ती गोष्ट प्रायवेट ठेवली पाहिजे. किंवा भलेही त्या व्यक्तीला त्याच्या पालकांनी, नातेवाईकांनी नाकारलं असलं तरी तिला आपण, एक मित्र म्हणून सपोर्ट केला पाहिजे. कायद्यानुसार होमोसेक्शुअॅलिटी, ट्रान्सजेन्डर, हिजडा कम्युनिटीमधील व्यक्तींमधील संबंध हा गुन्हा आहे. जेव्हाही एखादं आंदोलन होतं किंवा मार्च काढला जातो तेव्हा वैयक्तिक पातळीवर आपण एक व्यक्ती म्हणून कम्युनिटीमधील लोकांच्या बाजूनं उभं राहू शकता.

मित्र-मैत्रिणींनो, मुलाखत वाचून काय वाटलं ते नक्की कळवा. 

शब्दांकन : निहार सप्रे

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap