ब्रेक अप कधी करावा?

मागील लेख  तू नहीं तो और सही…. यामध्ये आपण पाहिलं की,  नातं गृहीत धरून चालत नाही, ते जाणीवपूर्वक जपावं लागतं, फुलवावं लागतं, अन्यथा नात्यामध्ये तगमग, घुसमट नि ताटातूट होण्याची शक्यता वाढते. इतर कुणाचे आकर्षण वाटू लागतं. मनमोकळा संवाद, एकमेकांच्या गुण-दोषांचा स्वीकार, एकमेकांचं कौतुक करणं, दाद देणं, भावना व्यक्त करणं, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखून जोडीदारासाठी आणि नात्यासाठी स्वतःमध्ये बदल करणं, जबाबदारीची जाणीव आणि तडजोडीची तयारी याची कोणतंही नातं घट्ट आणि आनंदी होण्यासाठी मदत होते. 

… पण काही वेळा  नात्यामधून बाहेर पडणं सुद्धा गरजेचं ठरु शकतं.  याबाबत भाष्य करु शकतील  अशा काही बाबी या लेखात आपण पाहणार आहोत.   

पहिलं नातं तोडून दुसऱ्या नात्यात जाणं हा अनेकांसाठी तणावपूर्ण, निराशाजनक, भावनिकदृष्ट्या थकवणारा (इमोशनली ड्रेन करणारा) अनुभव असू शकतो; म्हणूनच विचारपूर्वक, सामंजस्याने आणि नात्याबद्दलची स्पष्टता ठेऊन असे निर्णय घेणं गरजेचं असतं.

अगदी शुल्लक कारणांवरून पहिल्या नात्यातून बाहेर पडून, ब्रेक अप करून दुसऱ्या नात्यामध्ये जाणं, इतकं कॅज्यूअली नात्याला घेऊ नये हे जरी खरं असलं, तरी कोणत्याही दोन व्यक्तींनी आयुष्यभर एकमेकांसोबत असमाधानी राहून नातं चालू ठेवण्यापेक्षा ब्रेक-अप करणं, नातं संपवणं हा एक पर्याय असू शकतो. फक्त आपण त्या नात्यामध्ये आहोत, लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल, घरच्यांना काय वाटेल म्हणून स्वतःची आणि जोडीदाराची घुसमट करत, ओढून-ताणून एखाद्या नात्यामध्ये कमिटमेंट दिली आहे म्हणून आयुष्य काढणे हे देखील योग्य नाही.

खाली दिलेल्या आणि यांसारख्या काही गोष्टी तुमच्या नात्यात घडत असतील, तर तुम्हाला यावर  सजगपणे थोडा विचार करायला लागू शकतो. कारण अशा  परिस्थितीत बहुतांश लोक वेगळा व्हायचा विचार करतात. 

1. हिंसक नाते- जेव्हा तुम्ही हिंसक नात्यामध्ये आहात किंवा तुमचा जोडीदार तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण/कंट्रोल ठेवत असेल.

2. जोडीदारास त्रासदायक असणाऱ्या सवयी- व्यसन किंवा पोर्न पाहून लैंगिक संबंध करायला लावणे यांसारख्या काही सवयींचा जोडीदाराला त्रास होऊ शकतो. जोडीदाराने वारंवार जाणीव करून देऊन देखील समोरची व्यक्ती बदलण्यास तयार नसेल.

3. एकतर्फी नाते- नातं टिकवणं हे एकट्या जोडीदाराची जबाबदारी नसते. नातं एकतर्फी झाले असेल आणि ते टिकविण्यासाठी तुम्हाला एकट्यालाच तुमची ताकद पणाला लावावी लागत असेल.

4. चिटिंग/ फसवणूक– एखाद्या कमिटेड रिलेशनशिपमध्ये परस्पर संमतीने ठरविलेले नात्याचे नियम मोडणे म्हणजे चिटिंग किंवा फसवणूक अशी फसवणुकीची सरळ सोपी व्याख्या करता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला फसवत आहात किंवा जोडीदार तुम्हाला फसवत असेल.

5. फसवणुकीवर आधारलेलं नातं – बऱ्याचदा खोटं बोलून नातं जोडलं जातं. उदा. लैंगिक कल किंवा आजाराची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवणं, आधीचा विवाह लपवून ठेवणं.

6. संवादातील ‘सं’ संपला आणि फक्त ‘वादच’ राहिला– तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामधील संवाद संपला असेल. सतत भांडण होत असेल. त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यामागचे कारण, प्रोब्लेम्स शोधण्याचा प्रयत्न केला तरीदेखील भांडण चालूच राहत असेल. आजकाल टी.व्ही., मोबाईल आणि सोशल मिडियाचा अतिरिक्त वापर यामुळे नात्यामधील संवाद कमी झाला आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन नाती वाचवायला हवीत.

7. नकोसा असहनीय बदल– तुम्ही जेव्हा नाते सुरु केले आणि तुमचे सध्याचे नाते यांत नकोसा बदल झाला आहे आणि तुम्हाला तो सहन करणे शक्य नाही.

8. तुमचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, मत- तुमचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, मत याला जर नात्यामध्ये किंमत नसेल.

9. माझे तुझ्यावर प्रेम आहे– प्रत्येकवेळी ‘आय लव्ह यू’ म्हणावे असे नाही पण आपल्या वागण्या-बोलण्यातून, कृतीतून, घेतलेल्या काळजीतून जोडीदाराविषयी असणारे प्रेम व्यक्त करणे गरजेचे आहे. प्रेम व्यक्त करणं ही कला आहे आणि ती शिकता येते. प्रेम हा तुमच्या नात्याचा बेस असेल तर ही कला शिकून घेणं गरजेचं आहे.

10. ‘यह’ भी जरुरी है- विशेष काहीही कारण नसताना तुमचे लैंगिक नात्यामध्ये तणाव आला असेल किंवा लैंगिक नाते संपले असेल.

11. मी माझे सर्वस्व दिले आहे- योनिसुचीतेला अधिक महत्व दिले असल्याने हा प्रकार दिसतो. फक्त एखाद्या पुरुषासोबत सेक्स केला म्हणून ते हिंसक/नकोसे नाते पुढे चालू ठेवणे योग्य नाही. तसेच ‘तू माझ्याशी सेक्स केलास म्हणून तू आता ब्रेक अप करू शकत नाहीस’ हे शस्त्र वापरून बाहेर पडणाऱ्या जोडीदाराला ओढूनताणून थांबवून ठेवण्यात देखील अर्थ नाही.

नात्यांमध्ये घडणा-या  काही गोष्टी आपण वर पाहिल्या. या  वा आणखी काही असहनीय बाबीही नात्यांमध्ये असू शकतात.  शेवटी  प्राप्त परिस्थितीला समजुन उमजुन निर्णय घेणे हे आपल्याच हातात आहे. 

नात्यातून बाहेर पडताय? काय काळजी घ्याल?    

एका नात्यातून बाहेर पडण्यापूर्वी आपण एकत्र का आलो, नात्याचा पाया काय आहे, त्यामागे काय विचार आणि नैतिक आधार होता याचा विचार जरूर व्हावा. नात्यातून बाहेर पडण्याआधी या नात्याने आपल्याला काय दिले आणि आपण त्या नात्याला काय दिले  याचा विचार करणे आवश्यक आहे.

ओढून-ताणून, रडत-कढत चालू ठेवलेल्या नात्यातून स्वतःला, जोडीदाराला आणि संबंधित लोकांना त्रास आणि त्रासच होत असतो अशावेळी असमाधानाने एकत्र राहण्यापेक्षा बाहेर पडणे कधीही चांगले. मात्र अशाप्रकारे नात्यातून बाहेर पडत असताना त्याविषयीची स्पष्टता असावी. तसेच स्वतःला आणि जोडीदाराला कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत सामंजस्याने, शक्य असल्यास गोष्टी क्लिअर करून बाहेर पडावे. फक्त नात्यामध्ये ताण आहे आणि त्याकाळात दुसरं कोणीतरी आवडलं म्हणून ब्रेक अप करून बाहेर पडणं अडचणीचं ठरू शकतं. म्हणूनच आधीचं नातं तोडणं आणि नवीन नात्यामध्ये पडणं या दोन्ही गोष्टींसाठी दोघांनीही पुरेसा वेळ घेणं गरजेचं आहे. ते न केले तर पुन्हा नवीन नाते त्याच जुन्या वाटेने जाण्याचा धोका असतो. 

अशा प्रकारच्या प्रसंगात जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल तर खालील लिंक मध्ये  दिलेल्या हेल्पलाईन वर संंपर्क करा.

इथे तुमच्या मनातील सर्व प्रश्न तुम्ही विचारू शकता, मन मोकळे करून बोलू शकता.  या भेटी संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क असतील. 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap