नकार द्यायचाय पण देशील कसा?

0 1,858

तुमची मित्राची निवड चूकू शकते. काही दिवसांच्या मैत्रीनंतर त्याचे खरे स्वरुप तुमच्या लक्षात येते. मैत्री आवरती घ्यावी, असे तुम्हाला वाटू लागते. जन्माचा जोडीदार म्हणून हा मित्र अयोग्य आहे, असे तुम्ही ठरवले तर यात काहीही गैर नाही. काही दिवस जवळीकीचे संबध आल्यानंतर त्याची तुम्ही पारख केली व त्याला अयोग्य ठरवलेत याचा अर्थ तुम्ही त्याला खेळवलेत, झुलवलेत असा होत नाही. मैत्री करावी अशी तुमची इच्छा नसतांना कोणी मुलगा तुमच्या मागे लागला आहे. तुमच्या सहजच्या बोलण्या हसण्यातून, त्याच्याकडे बघण्यातून तो निराळा अर्थ काढत आहे असा प्रकार असेल तर तुम्ही वेळेवारी सावध व्हायला हवे.

लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीकडे एक सहावे ज्ञानेंद्रिये (सिक्स्थ सेन्स) असते…

लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीकडे एक सहावे ज्ञानेंद्रिये (सिक्स्थ सेन्स) असते, तुमच्याकडेही ते आहेच. त्यामुळे आपल्याशी बोलणारा माणूस ‘सभ्य’ आहे की त्याचा अंत:स्थ हेतू वाईट आहे हे आपोआपच जाणवते, सहजपणे समजते. स्त्री अनेकदा या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते.  त्यामागे अनेक कारणे असू शकतात. तो माणूस तुमचा ‘बॉस’ आहे, तुमचा शिक्षक, परीक्षक, पी एच डी. चा गाईड, असा कोणी आहे वा नातेवाइकांपैकी आहे, तुमच्यावर त्याने कधी काही उपकार केले आहेत किंवा त्याच्याकडून मदत लागण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत ती व्यक्ती प्रत्यक्ष काही करत नाही तोवर तुम्ही तुमचा आतला आवाज दडपून ठेवता. त्याकडे दुर्लक्ष करीत राहता त्याची वाईट नजर टाळीत राहता वा काही वेळा आतल्या आवाजाच्या भरवशावर कृती करुन उगाच तमाशा कशाला करायचा असा सावध पवित्राही तुम्ही घेता. अशा व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करता, तथापि असे काहीही नसेल, या व्यक्तीची नजर वाईट आहे असे तुम्हाला आतून जाणवत असेल, तर कटाक्षाने त्याला टाळा, सहज म्हणून सुध्दा संपर्कात येऊ नका.

एवढे करुनही तो मागे लागला तर मात्र जोरदार आवाज उठवा, शक्य आहे की याबद्दल लोक तुम्हालाच उलटी नावे ठेवतील, कांगावाखोर म्हणतील पण तरीही दडपण न बाळगता या मुलाबद्दलची तक्रार जवळच्या जबाबदार व्यक्तीकडे करा. मित्र मैत्रिणी, घरातील मोठी माणसे, शिक्षक यांना ही गोष्ट कळू द्या. इतका बोलबाला झाल्याने तो बदलेल, नाद सोडेल, निदान तुम्हाला इजा करण्याची हिंमत तरी नक्कीच करणार नाही. शिक्षक किंवा वडीलधारी मंडळी नंतर त्याचे समुपदेशन देखील करु शकतील, त्यामुळे त्याचेही आयुष्य योग्य दिशेने जाऊ लागेल.

नकार अधिकाधिक सुयोग्य प्रकारे पोहोचायला हवा.
  • दोन्ही बाजूंनी वाढत गेलेली मैत्री आहे व ती तुम्हाला संपवायची आहे, तर हा नकार अधिकाधिक सुयोग्य प्रकारे तुमच्या मित्रापर्यंत पाहोचायला हवा.
  • प्रथम तुम्हाला यासंबंधास पूर्ण विराम द्यायचा आहे याबाबत ठाम निर्णय घ्या. काय काय घडत गेले व तुम्ही या निर्णयाप्रत का आलात याची नीट नोंद करा.
  • त्याच्या कोणत्या प्रवृत्ती, कृती तुम्हाला आवडल्या नाहीत, त्याने त्यात बदल करण्याचा केलेला प्रयत्न कसा फसला, तुमच्या दोघांच्या आवडी-निवडी, विचार एकमेकांशी मिळते जुळते नाहीत हे तुमच्या कसकसे लक्षात येत गेले हे सर्व मुद्दे लिहून काढा.
  • तुम्ही मैत्री संपवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहात हे हळू हळू, टप्या टप्याने त्याला कळू द्या, जाणवू द्या.
  • तुमच्या नकारातून तो अपमानित, व्यथित वा क्रोधित होता कामा नये, याची काळजी घ्या. म्हणून नकार अचानकपणे जाहीर करणे टाळा.
  • नकाराचा त्याने संतुलितपणे स्विकार करावा, अशा प्रकारे नकार द्या. त्याची दुसऱ्याशी तुलना करुन नकार देऊ नका. शिवाय नकार गुळमुळीतपणे न देता ठामपणे द्या.
  • नकाराचा निर्णय घेतेवेळी व निर्णय कृतीत उतरवतांना, वडीलधारी अनुभवी व्यक्ती, समुपदेशक यांची मदत घ्या.

प्रेमप्रकरणातून घडणारे खून, अत्याचार यास प्रतिबंध करायचा, तर मुलींनी सजग राहणे व बोलते होणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

संदर्भ : पुस्तक “मी माझीच” – मीना देवल

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.