भारतामध्ये जसजसा ‘विकास’ होत आहे तशी स्तनाच्या कर्करोगामध्ये दर वर्षी 1 % इतकी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2002 मध्ये भारतामध्ये 80,000 स्त्रियांना स्तनाचा कर्करोग झाला होता. स्तनाचा कर्करोग हा सर्वात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये दुसऱ्या क्रमांकांवर आहे. सर्वात जास्त प्रमाण हे ग्रीवेच्या कर्करोगाचे आहे. भारतामध्ये शहरी भागात एक लाख स्त्रियांमागे 15 ते 20 जणींना स्तनाच्या कर्करोगाची लागण होते. ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण एक लाख स्त्रियांमागे 6-8 इतके आहे. स्तनाचा कर्करोग जास्त करुन मध्यम आणि उच्च मध्यम वर्गामध्ये आढळून येतो.
स्तनाच्या कर्करोगासाठी आता पर्यावरणातील घटकदेखील जबाबदार मानले जातात. जास्त औद्योगीकरण झालेल्या देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण इतर देशांपेक्षा पाचपट आहे. पर्यावरणातील घटक (हवा, पाणी, अन्न, क्ष किरणांशी संपर्क, इत्यादी) हा धोका वाढवत आहेत.
- वय 50 पेक्षा अधिक असणे
- एका स्तनाला कर्करोग होऊन गेला आहे
- एकाहून अधिक जवळच्या नातेवाईकांना (आई, मावशी बहीण) कर्करोग होऊन गेला आहे.
- पहिले मूल तिशीनंतर झाले
- मूल झाले नाही किंवा अंगावर पाजले नाही
- आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त, आहार समतोल नाही
- तणावपूर्ण आयुष्य
वर उल्लेख केलेल्या कारणांना सामोऱ्या जाणाऱ्या सर्वच स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होईल असे नाही. तसंच यापैकी कोणतेच कारण नसलेल्या स्त्रियांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रियांपैकी फक्त 30% स्त्रियांमध्येच वरील कारणे आढळतात. पाळी गेल्यानंतर कधी कधी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एच आर टी) सुचवली जाते. यामधील कृत्रिम इस्ट्रोजनमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता मात्र वाढत असल्याचं दिसलं आहे. पर्यावरणातील रासायनिक प्रदूषणकारी घटक आणि प्लास्टिक इत्यादीच्या निर्मितीतून तयार होणारे घटक स्त्री आणि पुरुषांमध्ये लैंगिक संप्रेरकांच्या कामात अडथळा आणतात हे सिद्ध झालं आहे.
स्वतःच्या स्तनाची नियमितपणे पाहणी केल्यास कर्करोगाचे सुरुवातीचे बदल लक्षात येऊ शकतात. काही लक्ष देण्यासारखे बदल –
- स्तनामध्ये टणक पण न दुखणारी गाठ, काही रुग्णात गाठ मऊ असू शकते
- स्तनाच्या विस्तारात आणि आकारात बदल दिसून येतो.
- स्तनाच्या त्वचेच्या स्पर्शात आणि रंगात बदल, स्तनाच्या बोंडांमध्येही असाच बदल दिसून येतो (बारीकसा खड्डा किंवा सुरकुत्या)
- बोंडातून लालसर स्राव बाहेर येतो. कधी कधी पिवळसर असतो.
- बाजूच्या कडा सुजतात
स्त्रियांमध्ये स्तनाला सूज येण्याचे प्रमाण बरेच दिसते पण दर वेळी ती सूज कर्करोगाची नसते.
औद्योगीकरण, खतं, कीटकनाशकं, इत्यादीचा अनियंत्रित वापर आणि हवा, पाणी, अन्नाचं प्रदूषण कर्करोगाच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे. त्याला आळा घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचसोबत आहार-विहाराशी संबंधित काही गोष्टी उदा. असंतुलित, चरबीयुक्त आहार, वाढतं धूमपान्र आणि मद्यपान टाळल्यास आपण स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करु शकतो.
- चरबीयुक्त आहार टाळा. जीवनसत्त्वं, खनिजं देणारी ताजी फळं आणि भाज्यांचं आहारातील प्रमाण वाढवा.
- नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
- मद्यपान टाळा, कमी करा. तंबाखूचं, मिश्रीचं सेवन टाळा.
- गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्या. गोळ्यांचा अनियंत्रित वापर कर्करोगाला निमंत्रण देतो.
- तरुणपणापासूनच महिन्यातून एकदा पाळीनंतर स्वतः हाताने स्तन तपासा.
- 35 वर्षाच्या पुढील स्त्रियांनी स्तनांची वैद्यकीय तपासणी (मॅमोग्राफी) करुन घ्यावी.
- मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, प्लॉट ए 2, एमआयडीसी, चिखलठाणा, औरंगाबाद 431210
- नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल, आगळगाव रोड, बार्शी 413401
- वानलेस हॉस्पिटल, मिरज मेडिकल सेंटर, मिरज 416410
- टाटा मेमोरियल हॉस्पिटल अर्नेस्ट बोर्ज मार्ग, परेल, मुंबई 12
- बॉम्बे हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, 12, मरीन लाइन्स, मुंबई 400020
- राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, मानेवाडा रोड, नागपूर 440003
- मॅलिग्नंट डिसीझ ट्रीटमेंट सेंटर, कमांड हॉस्पिटल, पुणे 411040
- श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, संजीवन मेडिकल फाउंडेशन, सांगली रोड, मिरज 416410
- श्री सिद्धेश्र्वर कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, होटगी रोड, सोलापूर 413003
संदर्भ: तथापिच्या ‘संजीवनी- स्त्रिया आणि आरोग्य प्रशिक्षण पुस्तिका’ या संसाधनातून साभार.
No Responses