नात्यांमधले दबाव, नियंत्रण ओळखणे
प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये हक्काच्या किंवा मालकीच्या भावनेचा शिरकाव फार बेमालूमपणे होत असतो. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर बिंबवलं जात असतं. सिनेमांमधून, प्रेमकथांमधून, मालिकांमधून अशाच प्रकारे प्रेमसंबंध दाखवले जातात. प्रेमाच्या नात्यामध्ये एकमेकांवर हक्क असण्याची संकल्पना रंगवली जाते आणि त्यातून एकमेकांवर हक्क आणि त्यातून नियंत्रण येतं. ज्या व्यक्तीवर आपला हक्क आहे ती आपल्या मनाविरुद्ध वागू शकत नाही किंवा वागलेली आपल्याला आवडत नाही. माझ्या मर्जीविरोधात तिने किंवा त्याने असं केलंच कसं हे प्रश्न एखाद्या नात्यात यायला लागले की दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य कमी व्हायला लागतं.
खाली काही प्रसंग किंवा वाक्यं दिली आहेत. त्यामध्ये नात्यामध्ये असेलल्या नियंत्रणाची वेगवेगळी रुपं दिसतील.
- माझ्या मैत्रिणीने साडी नेसलेली मला फार आवडते आणि मला आवडते म्हणून तिने साडीच नेसली तर त्यात काय वाईट?
- मी बाहेरगावी गेले तरी दर अर्ध्या तासाला मी कुठे आहे आणि काय करतीये ते माझ्या बॉयफ्रेंडला कळवते. त्याला माझी फार काळजी वाटते म्हणूनच त्याने मला असं सांगितलं असेल ना?
- पूर्वी मी माझ्या मित्रांबरोबर महिन्यातून एकदा तरी ट्रेकला जायचो. पण आता मी फक्त माझ्या बायकोबरोबरच बाहेर जातो. माझ्या वेळावर फक्त तिचा एकटीचाच हक्क आहे ना…
- मी कॉलेजमधून थेट घरी जाते. बाकी कुणाबरोबर वेळ घालवत बसलेलं माझ्या वडलांना अजिबात आवडत नाही.
- मी कोणत्याही मित्राच्या मोटरसायकलवर मागे बसून गेलेलं माझ्या नवऱ्याला चालत नाही. म्हणून बहुतेक ठिकाणी तो मला सोडायला येतो.
- माझ्या फोनवर येणारे सगळे कॉल्स आणि एसएमएस माझा भाऊ तपासतो. म्हणून माझा नंबर मी कुणाला देत नाही. माझ्या काळजीपोटीच तो हे करतो.
- माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींबरोबर बोललेलं माझ्या गर्लफ्रेंडला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आजकाल मी तिच्यासोबत असताना त्यांचे फोनही घेत नाही.
- माझा प्रियकर माझ्याकडून शरीर संबंधांची मागण करतो. प्रेमामध्ये त्याचा हा अधिकार आहे, असं त्याचं म्हणणं आहे.
नात्यांमधला हक्क अशा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो. या नियंत्रणामुळे जर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे राहता येत नसेल, वागता येत नसेल, मोकळेपणाने हिंडता फिरता येत नसेल, इतरांशी नाती प्रस्थापित करता येत नसतील तर ते नियंत्रण आहे आणि आपल्या मोकळेपणावर किंवा स्वातंत्र्यावर गदा आणते हे समजून घ्या. असं नियंत्रण कोणत्याही नात्यासाठी घातकच असतं.
अशा प्रकारच्या प्रसंगात जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल तर खालील लिंक मध्ये दिलेल्या हेल्पलाईन वर संंपर्क करा.
इथे तुमच्या मनातील सर्व प्रश्न तुम्ही विचारू शकता, मन मोकळे करून बोलू शकता. या भेटी संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क असतील.
No Responses