- मागील दोन लेखांकांमध्ये आपण निरोध वापरण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत माहिती घेतली. त्यामध्ये पुरुषांनी वापरायचे निरोध व महिलांनी वापरायचे निरोध याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण जरा कमी माहिती असलेला पण महत्वाच्या निरोध बाबत माहिती घेऊयात त्याचे नाव आहे डेंटल डॅम.
डेंटल डॅम आहे तरी काय ?
मौखिक संभोग (Oral Sex) सुरक्षित करण्यासाठी एक साधन वापरले जाते ज्याला ‘डेंटल डॅम’ असे म्हटले जाते. डेंटल डॅमला आपण तोंडाचा कंडोम देखील म्हणू शकतो. खरं तर हा लेटेक्सचा किंवा पॉलीयुरेथेनचा (रबरचा) चौरस किंवा आयताकृती तुकडा असतो, जो योनीमार्गावर, गुदावर किंवा तोंडावर लावून मौखिक संभोग केल्यास लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
पण याला वापरणार कोण?
ज्याप्रमाणे विभिन्नलिंगी (स्त्री-पुरुष) जोडिदार लैंगिक संबंधांच्या वेळेस याचा वापर करु शकतात, तसेच समलिंगी (लेस्बियन – गे), बायसेक्सुअल किंवा कुठल्याही प्रकारची लैंगिक ओळख असणा-या व्यक्ती याचा वापर करु शकतात. सोबतच हातांसाठी लेटेक्स ग्लोव्हज (रबराचे पातळ मोजे) वापरणंही महत्वाचं ठरु शकतं, कारण बोटांना काही जखमा असतील तर योनी/गुदाच्या माध्यमातुनही संसर्ग पसरु शकतो. तेव्हा मौखिक संभोग/ मुखमैथुन किंवा डिजिटल सेक्स (योनी किंवा गुदव्दाराला लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करण्यासाठी हाताची-पायाची बोटे किंवा हात वापरणे) करताना लिंगसांसर्गिक आजारांच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लेटेक्स ग्लोव्हज व डेंटल डॅम लक्षात ठेवून वापरणं गरजेचं आहे. कारण संबंध ठेवताना फक्त लिंगाचाच वापर होत नाही ना! तेव्हा सुरक्षित राहणं महत्वाचं! अन हो जर सेक्स टॉईज वापरत असाल तरीही निरोधचा वापर करणं तेवढंच गरजेचे आहे, त्यामुळे लिंगसांसर्गिक आजारांचा धोका कमी होतो.
संभोगासाठी डेंटल डॅम वापरायचे कसे?
– डॅमचे पॅकेट काळजीपूर्वक उघडा, कात्रीने कापू नका. शेजारी दाखवल्याप्रमाणे हाताने फाडू शकता.
– डॅमला छिद्र किंवा इजा झालेली नाही हे शोधणे गरजेचे आहे, अन्यथा वापर करुन याचा काही परिणाम नाही होणार.
– डॅम योनी किंवा गुदाच्या जागेवर ठेवा. मौखिक संभोगादरम्यान डॅम जागेवरुन हलू नये म्हणून त्याला धरणे गरजेचे असते.
– मौखिक संभोगानंतर, डॅम कागदात बांधा आणि कच-याच्या डब्यात फेकून द्या.
कुठे मिळतील अन फ्लेवर आहेत का यामध्ये ?
निरोधप्रमाणे डेंटल डॅम सुद्धा वेगवेगळ्या फ्रुट-फ्लेवर मध्ये विकत मिळतात. ज्याप्रकारे निरोध मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात, तसे हे सहज उपलब्ध नाहीत. ऑनलाइन ऑर्डर करुन ते मिळू शकतात. परंतू यांची किंमत जास्त असल्याने सामान्य नागरिकांना परवडत नाहीत. पण ज्यांना डेंटल डॅम वापरायची इच्छा आहे त्यांच्याकरीता निरोध पासून डेंटल डॅम तयार करण्याची एक साधी पद्धत आहे.
निरोधपासून डेंटल डॅम कसा तयार करणार?
– कंडोमचे पॅकेज काळजीपूर्वक उघडा.
– कंडोम काढा आणि पूर्ण उलगडा.
– कंडोमची टिप कापून टाका तसेच कंडोमच्या खालची बाजू देखील कापून टाका.
– कंडोमच्या एका बाजूला उभे कापा.
– झाला डेंटल डॅम तय्यार !!!
– योनिवर किंवा गुदव्दाराला झाकण्यासाठी सपाट ठेवा.
डेंटल डॅम बाबतचे काही गैरसमज
– कधीही पाहिले नाहीत व वापरले नाहीत
वर माहिती दिलीच आहे, वापरुन पाहिल्याशिवाय कसा कळणार! पहा अनुभव घेऊन
– हे वापरायला खूपच किचकट असतात.
यात काहीच किचकट नाही. साधा रबराचा तुकडा आहे. लैंगिक संबंधांच्याआधी सहजपणे योनीवर किंवा गुदावर ठेवायचा तर आहे, ओढायचा नाही की ताणायचा नाहिये. अन हवं तर जोडिदार धरुन ठेवेलच की!
– हे फक्त समलिंगी महिलांसाठीच असतात.
असे काही नाही आहे, वर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही लिंगाचे व कुठल्याही लैंगिक ओळखीचे (sexual orientation) चे लोक मुखमैथुन वा गुदामैथुन करताना वापरु शकतात.
– तुमच्याकडे डेंटल डॅम नसतील तर तुम्हाला लिंगसांसर्गिक आजारांच्या संसर्गाचा धोका आहे.
लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग निरोध वापरुन वा इतर मार्गाने टाळता येतात हे आपल्याला माहिती आहेच. वर सांगितल्याप्रमाणे डॅम तयार करणे सोपे आहे. तेव्हा घाबरण्याची काही गरज नाही.
– डेंटल डॅम मुळे सगळा मूड जातो.
असं काही होत नाही. खरं तर, डॅम वापरुन अजुन नाविन्यपूर्ण पद्धतीने संभोग करण्याचे मार्ग सापडतील. तेव्हा मूड नाही तर सुरक्षितता महत्वाची, जिथे माहित असूनही निरोध वापरला जात नाही, तिथे डेंटल डॅम तर लांबची गोष्ट. पण सुरुवात तरी करूया.
आनंदी राहा, सुरक्षित राहा!!!
चित्र व माहिती साभार : https://www.plannedparenthood.org/planned-parenthood-pacific-southwest/blog/dental-dams-unwrapped
5 Responses
चांगली माहिती आहे, धन्यवाद !
Sir पहिल्यांदा सेक्स करताना फक्त स्त्रियांचं blood जातो का की पुर्षाचा पण जातो
पहिल्यांदा सेक्स करताना दोघांपैकी कुणाचे ही रक्त जाऊ पण शकतं अन नाही पण. रक्त जावेच असं काही नियम नाही. त्यामागची कारणं समजुन घेऊयात.
मुलींच्या योनिमार्गात एक पडदा असतो. तो पातळ किंवा जाड असू शकतो (हा पडदा जर फाटलेला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असं समजलं जातं). पण कधी कधी खेळताना, सायकल चालवताना, पाळीमध्ये टॅम्पोनचा वापर केला तर अशा विविध कारणांनी हा पडदा फाटू शकतो. अन मग सेक्सच्या वेळी रक्त येत नाही. लैंगिक उत्तेजनेमुळे योनिमार्ग ओलसर होतो आणि लिंग आत सहजपणे जाते व रक्तस्राव होत नाही.(अनेक मुलांचा असा समज असतो की लग्नाच्या पहिल्या रात्री संभोगानंतर मुलीच्या योनिमार्गातून रक्त आलं नाही तर ती व्हर्जिन नाही, पण हे खरं नाही).
मुलग्यांच्या बाबतीत कधी कधी शिश्नाची शीर तुटण्याने रक्तस्राव होऊ शकतो, म्हणजे नेमकं काय व का होतं ते पाहुयात?
शिश्नाच्या खालच्या बाजूला, शिश्न मुंडाला चिकटलेला सैलसर त्वचेचा पदर (शिश्नबंध-Frenum) असतो. तो जर आखूड असेल व प्रथम संभोगाच्या वेळी, स्त्रीचा योनिमार्ग कोरडा असतानाच उतावळेपणानं शिश्नाचा योनीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर असा प्रसंग उद्भवू शकतो. क्वचित एखाद्याला प्रथम संभोगाच्या वेळी हा अनुभव येतो, प्रत्येकालाच असा अनुभव येत नाही हे लक्षात घ्या.
त्यात धोक्याचं काही नसतं. साध्या उपचारानं बरं वाटतं.
Very Good Initiative….I am here after ashutosh bhuptakar sir talk on vicharvedh channel.
Thanks… are you read this? https://letstalksexuality.com/category/what-is-sexuality/
ashutosh sir wrote some articles on sexuality and culture.