मागील लेख चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १ यामध्ये आपण चाळीशीनंतरच्या कामजीवनाविषयी अस्तिवात असणारे गैरसमज पाहिले. तसेच पुरुषाच्या कामजीवनातील होणारे बदल पाहिले. या लेखात चाळिशीनंतर स्त्रियांच्या कामजीवनात काय बदल होतात व इतर काही महत्वाच्या बाबींवर माहिती घेऊयात.
स्त्रीच्या कामजीवनातील बदल
स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजग्रंथीत इस्ट्रोजन हे संप्रेरक निर्माण होते. स्त्रीच्या कामजीवनात या संप्रेरकाला फार महत्व आहे. वयाच्या पंचेचाळीस वर्षांदरम्यान स्त्रीबीजग्रंथीतून स्त्रीबीजनिर्मिती व इस्ट्रोजेननिर्मिती एकाएकी थांबते. त्यामुळे स्त्रीच्या कामजीवनातील बदल झटकन घडून येतात.
चाळिशी उलटली तरी पुरुषाप्रमाणे स्त्रीचाही कामप्रतिसाद टिकून राहतो. जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री संभोगक्षम राहू शकते. मात्र पूर्वीप्रमाणे तिलाही कामउद्दीपना सावकाश येते. योनिमार्गाची प्रसरणशीलता कमी होते. कामपूर्तीवेळी होणारे फरक आता कमी होतात. कामपूर्तीत पूर्वीसारखा आनंद मिळत नाही. योनिमार्ग शुष्क होतो. त्याची लवचीकता कमी होते. त्याची लांबीरुंदीही घटते. कामसलिलनिर्मिती पूर्वीइतकी होत नाही.
स्त्रीच्या कामजीवनात वैयक्तिक फरक खूप प्रमाणात आढळतो. पुरुषाचा कामआनंद वयाच्या १८ ते २५ वर्षांदरम्यान शिगेला पोचतो; तर स्त्री कामआनंदाची परिसीमा वयाच्या तिशीनंतर गाठत असते. पतीशी भावनिक नाते जुळणे, कामउद्दीपना व कामपूर्ती यांचा अनुभव घेणे यातून तिची संवेदनक्षमता वाढत असते.
मुळातच तिची कामइच्छा पुरुषाहून खूप कमी
योनिमार्ग शुष्क असल्यामुळे स्त्रीला संभोग वेदनादायक होतो. तिच्या स्त्रीबीजग्रंथीतील इस्ट्रोजेन संप्रेरक कमी होत जाते, तसतसे तिच्या अधिवृक्क ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन संप्रेरक स्रवू लागते. या संप्रेरकामुळे तिच्या ओठावर मिशी व हनुवटीवर दाढी येते. याच संप्रेरकामुळे तिची कामइच्छा वाढते. परंतु मुळातच तिची कामइच्छा पुरुषाहून खूप कमी असल्यामुळे ही किंचित वाढ नगण्य ठरते. शिवाय संभोग वेदनामय असल्यामुळे ती संभोगाचे प्रसंग टाळते.
‘आता यापुढे सेक्स बंद‘
काम हा पुरुषाच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो, तर स्त्रीला तो एक ऐच्छिक विषय असतो; परंतु काळ पुरुषाची कामवासना पोखरून काढतो व स्त्रीची कामवासना अबाधित राखतो. पुरुषाच्या कामइच्छेला ओहोटी लागते. तशी स्त्रीच्या कामइच्छेला ओहोटी लागत नाही (मुळात तिला कामइच्छा फार कमी असते). तरीही दोन मुले झाली, चाळिशी उलटली किंवा गर्भाशय काढून टाकला तर ‘आता यापुढे सेक्स बंद’ असा ती हुकूम सोडते. समाजाचीही तशी अपेक्षा असते. संभोगाशिवाय वर्षानुवर्षे ती आनंदाने जगू शकते. पुरुष मात्र पूर्वीपेक्षा कामइच्छा कमी झालेली असली तरी तो अस्वस्थ होतो. अधून मधून संभोग अनुभवावा असे मनापासून त्याला वाटत असते. पण जागेच्या अडचणीमुळे किंवा पत्नीच्या नकारामुळे संभोगाची संधीच त्याला मिळत नाही. तो हिरमुसतो. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून हस्तमैथुनाद्वारे कामतृप्ती अनुभवतो.
यूज इट, ऑर लूज इट
डॉ. मास्टर्स व जॉन्सन या लैंगिकता तज्ज्ञांच्या मते जी दांपत्ये चाळिशीनंतर कामजीवन अनुभवत नाहीत, त्यांच्या जननेंद्रियांची कार्यक्षमता कमी होत जाते. पुरुषाची लिंग-ताठरता कमी होते व स्त्रीचा योनिमार्ग कोरडा होत जातो. ‘वापरा नाही तर गमवा’ (यूज इट, ऑर लूज इट) हा निसर्गाचा नियम असतो. जी दांपत्ये चाळिशीनंतर (रजोनिवृत्तीनंतरही) आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शरीरसंबंध ठेवतात, त्यांना कामउद्दीपन व्यवस्थितपणे होते, दोघांतही कामसलिलनिर्मिती होते व कामआनंदही लाभू शकतो. सर्वांचेच शरीरसंबंधाचे प्रमाण सारखे असेल असे नाही. कुणी पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा शरीरसंबंध ठेवतो. पण मूळ बाब अशी की जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री-पुरुष दोघांचीही संभोगक्षमता टिकून राहते.
दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन
एकूण, चाळिशी उलटली म्हणून कुणी कामजीवन टाळावे असे निसर्ग सांगत नाही. कामजीवन हे प्रजोत्पादनाचे एकमेव साधन आहे हे खरे, पण त्याचबरोबर दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन आहे. जवळीक निर्माण करणारे आहे, तसे ताणमुक्त करणारे आहे. प्रीती व्यक्त करणारे आहे. तसे तृप्ती देणारे आहे. शिवाय मनोरंजनाचे साधनही आहेच.
सौंदर्याचा आस्वाद घेणे, आनंद घेणे यात पाप मानायचे काय कारण?
वयस्कर दांपत्याने कामजीवनाबाबतीत टाईमटेबल बनवू नये. दोघांचे शरीर सुदृढ असले, मने प्रसन्न असली तर निसर्ग खुणावत असतो. हे ‘वाह्यात चाळे’ की निसर्गाची हाक, हे दांपत्याने ठरवायचे असते. पण समजा, दोघांनी मनसोक्त कामअनुभव घेतला तर पाप, ‘चळ’ मानण्याचे काय कारण? तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील काकाजी म्हणतात, ‘‘सौंदर्याचा आस्वाद घेणे, आनंद घेणे यात पाप मानायचे काय कारण? पाप बळजबरीत आहे, सक्तीत आहे, परिणामांची जिम्मेदारी नाकारण्यात पाप आहे. खुशीत पाप नाहीय, श्याम!” तसे हा खुशीचा मामला मानावा.
जवळीक निर्माण होणे फार महत्वाचे
हा आनंद अनुभवायचा असेल तर मानसिक ताण नसावा, शरीर सुदृढ ठेवावे. हिल स्टेशनवर किंवा ट्रिपला जावे, पतिपत्नीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी दोघांनीही प्रयत्न करावा. भांडणे टाळावीत, एकमेकांचे कौतुक, भेटवस्तूंची देवघेव यामुळे जवळीक निर्माण होते. पुरुषाने मद्यसेवन व धूम्रपान टाळावे. शरीरसंबंधावेळी कामसलिल कमी प्रमाणात असल्यास के वाय जेली, मुखरस, पाणी किंवा जॉन्सन बेबी ऑईल वापरावे. संगीतातील खयालाप्रमाणे एकेक सूर वाढवीत जेवढी उंची गाठता येईल तेवढी गाठून त्यावर तृप्त असावे. आता तारसप्तकात गेल्यास गाणे बेसूर होण्याची शक्यता ध्यानात घ्यावी.
हे तरुणांनी नक्की लक्षात घ्यावे
तरुणांनी चाळिशी ओलांडलेल्या दांपत्यांना एकांताची संधी द्यावी. रविवारी संध्याकाळी तरुण दांपत्याने मुलांसकट फिरायला गेल्यास घरातील ज्येष्ठ दांपत्यास संधी मिळू शकते. तसेच स्त्रीने सहकार्य द्यावे. पतीला नाउमेद करू नये. कारण पती हा ‘आपलं’ माणूस असतो. बाबांना बाल्कनीत व आईला स्वयंपाकघरात झोपायला सांगून त्यांची ताटातूट करणे हा ज्येष्ठ दांपत्यावर अन्याय असतो.
तरुण म्हणून तुम्हाला चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत काय वाटते? आजपर्यंत आपले काय विचार होते अन या लेखानंतर काय विचार आहेत. खाली कमेंट मध्ये नक्की लिहा.
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses