भाग दुसरा – कालिदास : कुमारसंभव
शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. या कथावस्तूची भुरळ कालिदासाला पडण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न साहजिक आहे. शतपथ ब्राह्मण, एकाहून अधिक पुराणे आणि रामायण-महाभारत या सर्वांमध्ये या कथानकाचा उल्लेख आलेला आहे. या कथानकाला एक विलक्षण पार्श्वभूमी आहे.
दक्ष आणि प्रसूती यांची कन्या सती, ती तपश्चर्या करून शिवाची आराधना करते. राजकन्येचा एका पर्वतनिवासी पुरुषाशी विवाह होतो, हे काही दक्षाला पसंत पडत नाही. तो जावयाला मनोमन स्वीकारत नाही. महायज्ञाची संधी साधून दक्ष जावयाला निमंत्रण देत नाही. त्यामुळे संतप्त झालेली सती यज्ञस्थानी येते. पित्याबरोबर तिचे वादंग होते आणि ती यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण करते. हे वृत्त समजताच शिवाचा क्रोध अनावर होतो आणि त्याच्या तांडवनृत्याने दक्षादींचा नि:पात होतो. पुढे हिमवान व मेनावती यांच्या पोटी सती उमेच्या रूपाने जन्म घेते. येथून पुढे कुमारसंभवाचे कथानक सुरू होते.
पत्नीवियोगानंतर शिव पर्वतशिखरांवर तपश्चरण करण्यात गढून गेलेला असताना इकडे देवांना तारकासुर भंडावून सोडत होता. देव आपला अधिपती इंद्र याच्या समवेत ब्रह्माकडे जातात. ब्रह्मा त्याना सांगतो की शिवाचा पुत्रच तारकासुराचा वध करू शकेल. आता हे घडायचे तर शिवाचा विवाह होणे आले. तो तर तपश्चर्येत गुंतलेला. म्हणजे त्याचे लक्ष तपश्चर्येतून बाहेर काढणे आले. मग त्याचे मन अनुरूप स्त्रीवर जडणे आवश्यक आणि विवाहोत्तर त्या दोहोंना समागमसुख लाभले तर संतती प्राप्त होण्याची शक्यता, त्यात परत पुत्र होणे…..या सर्वात जर तपोभंगाने कोपायमान होऊन पुन्हा शिवतांडव घडले तर ते महाभयंकर होईल! देवांनी ही जोखीम पत्करायचे ठरविले आणि पुढे जे होते, ते कुमारसंभव या महाकाव्यात आपल्याला वाचायला मिळते. या रूपरेषेवरून हे लक्षात येऊ शकते की देवांच्या रूपाने समाजमानस तर पार्वतीच्या रूपाने स्त्री व शिवाच्या रूपात पुरुष यांचे भावविश्व आणि परस्परसंबंध आणि त्यातले ताणतणाव यांचे एका मोठ्या पटावरचे चित्रण या कथावस्तूत होऊ शकते. कालिदासासारख्या महाकवीने हे आव्हान पेलले खरे, पण गेल्या दीडहजार वर्षांत साहित्यविश्वाची मात्र त्याने तारांबळ उडवून दिली.
महाकाव्य म्हटले की त्याचे कमीत कमी आठ सर्ग असले पाहिजेत. कुमारसंभवाचे सतरा सर्ग आहेत. पण त्यातले कालिदासाने लिहिलेले किती याबद्दल वाद होते. साहित्य अकादमीने १९६२ साली सर्व सतरा सर्ग असलेली आवृत्ती प्रकाशित करून त्यावर पडदा टाकला. जवळजवळ दोन डझन हस्तलिखित प्रतींमध्ये संपूर्ण सतरा सर्ग सापडत नाहीत. एकोणिसाव्या शतकातील बहुतेक मुद्रित प्रती या सातव्या सर्गापर्यंत येऊन थांबतात. याचे एक कारण आठव्या सर्गात वर्णिलेला शिव पार्वती यांच्या समागमाचा विषय हा नंतरच्या काळातील रसिकवर्गाला जड गेला. याचे कारण लैंगिकतेबद्दलच्या कल्पना जशा कालिदासाच्या काळात होत्या किंवा असाव्यात (आपल्या अनुमानाप्रमाणे), तश्या त्या नंतरच्या काळात राहिल्या नाहीत. कुमारसंभवाची कथावस्तूच अशी की लैंगिकता व शृंगाररसाला टाळून ती पुढेच जाऊ शकत नाही. त्याशिवाय दुसरे कारण म्हणजे स्थलकालसापेक्ष अशा सांस्कृतिक इतिहासाचे संदर्भ गाळून त्याला अनादी अनंत अशा अवकाशात नेऊन ठेवले की व्यक्तिरेखांचे दैवतीकरण सुलभ होते. अशा दैवतांचे सर्व काही आचारविचार हे जणू मानवी पातळीवर असूच शकत नाहीत. नंतरच्या दीड हजार वर्षांत मोठ्या प्रमाणावर दैवतीकरण झाल्याने ‘कुमारसंभव’ महाकाव्याला या प्रवृत्तींचा सामना करावा लागला.
सतीवियोगाने भग्नहृदय झालेला शिव हा हिमशिखरावर तपश्चर्येत गढून गेला. तिकडे ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेला तारकासुर धुमाकुळ घालत होता व देव उद्विग्न होऊन त्याचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत होते. इंद्र देवांना घेऊन ब्रह्मदेवाकडे जातो. ब्रह्मदेव त्यांना सांगतो की हिमकन्या उमा हिला शिवापासून जो पुत्र प्राप्त होईल, तोच तारकासुराचा नि:पात करण्यासाठी समर्थ असेल. इंद्र मग काम व रती यांना कामास लागण्याची आज्ञा करतो. इकडे सतीचा पुनर्जन्म हिमवान आणि मेना यांच्या पोटी होतो. हिमवान हा वंशवृद्धीच्या हेतूने पत्नीशी रममाण होतो आणि मैनाक हा पुत्र निपजतो. त्यानंतर सती पुनर्जन्म घेते. तिचे नाव पर्वतकन्या म्हणून पार्वती ठेवण्यात येते. नंतर ती जेव्हा तपश्चर्येकडे वळते तेव्हा तिच्या आईच्या तोंडून उद्गार निघतो, उ मा! (नको ग). त्यानंतर तिला उमा हे नाव पडते.
कालिदास या पहिल्या सर्गात चातुर्याने शृंगाररसाची पेरणी करतो. हिमालयाचे वर्णन करताना तिथल्या लोकांकडे तो निर्देश करतो. गुहेत निवास करणारे गिरिजन परतून खट्याळपणे आपल्या स्त्रियांची वल्कले फेडतात, तेव्हा त्या लाजून गुहेकडे पळतात आणि तिथे खाली उतरलेल्या ढगांच्या मागे लपतात. या स्त्रिया मंद लयीत चालतात, कारण त्यांना आपल्या पुष्ट अवयवांचा भार सांभाळावा लागतो.
उमा लहानाची मोठी होते. पूर्वजन्मातले सारे ज्ञान आपसूक तिच्यात उतरू लागते. यौवनसुलभ सौंदर्याच्या खुणा तिच्या शरीरावर उमटू लागतात. हंसदेखील तिच्या चालीवर मोहित होऊन तिच्यासारखी लय पकडण्यास उत्सुक असतील. जवळजवळ दहा श्लोक तिच्या देहावयवांचे सौंदर्य वर्णन करण्यात कालिदास कारणी लावतो. आज ज्या अत्यंत खाजगी समजल्या जातील, अशा नाभिप्रदेशातल्या नाजुक सौंदर्यखुणांचे कालिदास वर्णन करतो. पण त्याच्या लेखी सौंदर्य शारीरिक आहे तरी केवळ तेवढेच नाही. उमेचे बोलणे इतके मधुर की कोकिळेचा स्वरही त्यापुढे कर्कश वाटावा. हरिणींनी तिच्याकडून नेत्रकटाक्ष शिकले असावेत की काय असे वाटण्याइतके ते मनोरम आहेत. सौंदर्यासाठी निसर्गातल्या ज्या काही उपमा असतील त्या तिच्या ठिकाणी एकवटल्या आहेत, जणू विधात्याने एकाच निर्मितीत साऱ्या सौंदर्याचा अनुभव यावा असे योजले असावे. योग्य वेळेस दोन सख्या सोबतीस देऊन उमेचा पिता तिला तपश्चर्येस बसलेल्या शंकराच्या सेवेस धाडतो. फुले आणणे, पाणी भरणे, जागा स्वच्छ करणे अशी कामे ती करू लागते.
दुसऱ्या सर्गात देव ब्रह्मदेवाकडे जाऊन तारकासुराच्या विध्वंसकारी विस्ताराचा नायनाट कसा करायचा याबद्दल गाऱ्हाणे मांडतात. तेव्हा ब्रह्मा आपणच तारकासुराला वर दिला असल्याने त्याला आपण थांबवू शकत नाही, असे सांगतात. मात्र शंकर-पार्वती यांच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो तारकासुराला संपवेल, असा उपाय त्यांना सांगतो. इंद्र मग कामदेवाला पाचारण करतो.
शंकर तपश्चर्येत आणि उमा त्याच्या सेवेत, तरी त्याचे चित्त तिच्याकडे आकर्षित व्हावे कसे? देवांचा हेतू राजकीय, शंकर संसाराकडे पाठ फिरवून समाधी लावून बसलेला, तर त्याच्या सेवेत समर्पित वृत्तीने गुंतलेली उमा. तारकासुराच्या शक्तीचा उगम ईश्वरकृपेतून आणि त्याची समाप्ती होणार स्त्रीपुरुषांच्या मधुरतम समागमातून निर्माण होणाऱ्या संततीकडून! कामप्रेरणेचे हे जीवनदायी तसेच सर्वस्वहारी रूप कालिदास आपल्यापुढे ठेवत आहे.
कामदेव आपल्या उपजत चतुराईने इंद्राचे अंतरंग उलगडतो. “सांग देवा, तुझ्यासाठी काय करू? तुझ्या इच्छेविरुद्ध कुणी जन्ममृत्यूच्या चक्राला कंटाळून मोक्षाच्या वाटेवर चालू पडला आहे काय? थांबा, भुवया उडवून रमणींच्या तिरप्या कटाक्षांनी त्याला तत्काळ जेरबंद करून टाकीन, मग जाईल कुठे तो? कुणी जर आपणास धूर्त डावपेचांनी नमवू पाहात असेल, तर मी फक्त लालसेचे पीस त्याच्या अंगावरुन हलकेच फिरवणार, मग वासनेच्या महापुरात तो कसा वाहून जातो ते पाहा. तुझे मन जडले असले एखाद्या पुष्ट प्रौढेवर, तर तिने आपले हात अगदी मोकळेपणे तुझ्या गळ्यात घालावे असे तुला वाटतेय का? तुझा कुण्या ललनेने अव्हेर केला असेल तर तसे सांग, बघ कोमल पानांच्या शय्येवर तिला कसे तळमळत ठेवतो! तुझ्या वज्राला थोडी विश्रांती दे, मग बघ माझ्या बाणांनी विद्ध झालेले पुरुष प्रियतमेच्या रागाने थरथरणाऱ्या ओठांची देखील धास्ती घेतील.”
इंद्र मान डोलावतो आणि कामदेवाला सांगतो की ‘खरेच जिथे तपस्व्यांच्या सामर्थ्यापुढे माझे वज्र निष्प्रभ होते, तिथे तू सहज संचार करतोस. तेव्हा आत्मानुसंधानात गढलेल्या शिवाचे चित्त तेथून काढून सेवेत गुंतलेल्या उमेला वश करून घेण्याकडे लाव. यश हवे आहे, तेव्हा अशी अचाट कामे करावी लागणार आणि ते तूच करू जाणे! उगाच नाही देवांना तुझा हेवा वाटत!’
कामप्रेरणेचे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील मध्यवर्ती स्थान इंद्र आणि कामदेवाच्या या संवादातून कालिदास आपल्यापुढे स्पष्ट करतो. संसारनिवृत्तीकडे वळलेल्या तपस्वीजनांना परत संसारात आणायचे, स्त्रीपुरुषांना एकमेकात रममाण करून समाजाचे सातत्य कायम राखायचे आणि स्त्रीसौंदर्याचा वापर करून सत्तेच्या राजकारणाची चढलेली धुंदी उतरवायची, याकडे कालिदास निर्देश करतो.
तपोभूमीकडे वसंत ऋतूला सोबत घेऊन कामदेव व रती प्रस्थान ठेवतात. झाडांना पालवी नि कोकिळेला कंठ फुटतात. पशूपक्षी आपापल्या जोडीदारांसमवेत प्रियाराधनास सुरुवात करतात. वसंताच्या आगमनाची चाहूल लागल्यावरही शिव आपले चित्त विचलित होऊ देत नाहीत. नंदी गणांना शांतता राखण्याचा इशारा करतो. सारे अरण्य स्तब्ध होते. कामदेव हलकेच तपोवनात प्रवेश करतो. ध्यानमग्न शिवाची मूर्ती त्याला निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दीपज्योतीपेक्षा स्थिर भासते. समाधी लावून बसलेल्या त्या धीरगंभीर मूर्तीकडे पाहून कामदेवाचे अवसान गळते. इतक्यात आपल्या दोन सख्यांसमवेत उमा नेहमीच्या सेवेसाठी फुले-पाने घेऊन तपोभूमीकडे येताना त्याला दिसते आणि आपले अंगीकृत काम पार पडणार, असा हुरूप त्याला येतो. वसंताच्या आगमनाने फुललेल्या वेलींवरची सुंदर फुले उमेने माळलेली असतात. चालताना वारंवार कमरेवरून ओघळू पाहणारे वस्त्र सावरताना होणारी तिची हालचाल फार मोहक दिसत असते. नंदी हळूच तिच्या आगमनाबद्दल शिवाला सागतो. खुणेनेच शिव अनुमती दर्शवतो. कामदेव झाडाआड टपून आपला मदनबाण धनुष्याला लावून वाट पाहत आहे त्या नेमक्या क्षणाची! उमा वाकून शिवासमोर फुले ठेवते, नमन करते आणि निमिषमात्र नजर उचलते. “तुला अनन्यप्रेम करणारा पती मिळो” असा आशीर्वाद तिला देऊन त्याच क्षणी शिव डोळे उघडतो. ही संधी साधून कामदेव शिवाच्या दिशेने एकामागून एक बाण सोडतो. उमा पुष्करबीजांची माळ शिवाला अर्पण करते. ती घेण्यास शिव हात पुढे करणार इतक्यात संमोहन नावाचा बाण कामदेव सोडतो. उमेचा गोंधळ उडतो आणि ती चेहरा वळवून शिवाशी नजरानजर टाळते. त्यामुळे शिवाचे लक्ष तिच्या लालचुटूक जिवणीकडे जाते. हे सारेच कमालीचे मोहक असल्याने शिवाचे चित्त विचलित होते. पण पुढच्याच क्षणी तो स्वत:ला सावरतो. उजव्या बाजूस धनुष्य बाण घेऊन सज्ज झालेला कामदेव त्याच्या दृष्टीस पडण्याचा अवकाश की तिसऱ्या नेत्रातून आगीचा लोळ निघतो आणि कामदेवाला भस्मसात करतो.
स्त्रीपुरुषांच्या मनात खोलवर असलेली कामप्रेरणा जागृत होण्यासाठी परस्परांचे सहज हावभावही कसे पुरेसे असतात याचे मनोज्ञ चित्रण कालिदासाने या प्रसंगात घडविले आहे.
(पुढे चालू)
Photo Courtesy : manikandanmural
No Responses