शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. मागील भाग लैंगिकता व संस्कृती ११ – कालिदास : कुमारसंभव या पूर्वार्धात आपण कुमारसंभवची अर्धी कथा पाहिली आहे. या उत्तरार्धात पुढील कथा पाहुयात…..
कालिदासाच्या लेखी काम हा कामदेव आहे, कारण मानवनिर्मितीची स्त्रीपुरुषसमागम ही मूळ प्रेरणा तो देतो. तिला पोषक असा देहसौंदर्य व सृष्टिसौंदर्याचा आविष्कार तो करवितो. हे सौंदर्य इंद्रियांना अवगत होणारे सत्य आहेच पण ते शिव, पवित्र आहे, असे ‘कामा’ला देवत्व देण्यातून सूचित होते. कालिदासाला उमेच्या देहसौंदर्याचे वर्णन करण्यात संकोच वाटत नाही.कालिदासानंतर हजार वर्षांनी आलेले गोस्वामी तुलसीदास मात्र काम हा खलदलाचा नायक समजतात आणि राम त्याचे भंजन करो असे विनवतात.
कामदेव हा इच्छा रूपात आहे तर रती ही त्या इच्छेची पूर्ती आहे. कामदेवाची राख झालेली पाहताच रती जिवाच्या आकांताने विव्हळते.“तुझ्याशिवाय जिणे माझे व्यर्थ आहेच, पण इथे सारेच कसे विमनस्क झालेत. ज्यांना देहसौख्याची लालसा आहे, त्यांना तुजवीण ते मिळणार कसे ?आभाळी ढगांचा गडगडाट होत असताना रात्रीच्या काळोखात कोण मीलनोत्सुक युवतींना त्यांच्या प्रियकरांकडे घेऊन जाईल? तुझ्याशिवाय चंद्र उगवेल, पण खिन्नपणे, कारण त्याचे स्वागत करणारी प्रेमी युगुले आता सापडणार नाहीत. कोकिळेच्या सुरावर आंब्याचा मोहर डोलेलसुद्धा, पण त्याचे मदनबाण आता होतील कसे? तुझ्या कामक्रीडेच्या आठवणींनी मी अजून थरारुन जाते. तू माळलेली फुले अजून माझ्या अंगांगांवर आहेत. माझे डावे पाऊल रंगवण्याआधीच तू निघून गेलास.तुलाच ते पुरे करावे लागेल. अप्सरांनी तुला जाळ्यात ओढण्याआधीच मी अग्नीत उडी घेते. कारण पतिवियोगानंतर रती क्षणभर देखील जिवंत राहिली हा कलंक मला नको आहे. तुझा जिवाभावाचा सखा वसंत कुठे गेला? शिवाच्या क्रोधाग्नीतून निदान तो तरी वाचावा.” रतीचे आलाप ऐकून वसंत ऋतू तिच्या समोर प्रकट होतो. शोक अनावर होऊन ती वसंताला सांगते की मला देखील अग्नीच्या स्वाधीन कर, कारण माझे जगण्याचे प्रयोजनच आता उरले नाही.
रती अशा तऱ्हेने वसंताची विनवणी करीत असताना आकाशवाणी होते, ती अशी:
“फार काळ तुमची ताटातूट राहणार नाहीये. तुझ्या नवऱ्याच्या ज्या कृत्यामुळे त्याची ही गत झाली ते समजून घे. पूर्वी एकदा ब्रह्मदेवाच्या मनात चलबिचल झाली. आपल्या मुलीबद्दलच त्याच्या मनात वासना उत्पन्न झाली, तीवर त्याने यत्नपूर्वक काबू मिळविला. पण हे कामदेवामुळे घडले म्हणून त्यानेकामदेवाला शाप दिला, त्याचा हा परिणाम आहे. आता जेव्हा शिव पार्वतीचा हात धरून अग्नीभवती फेरे घालील, तेव्हा आपले सौख्य मिळणार या विश्वासाने तो कामदेवाला पुन्हा जिवंत करील.”
या रूपकांमधून उलगडते ते कामप्रेरणेबद्दलचे समाजमनातले द्वंद्व: एकीकडे समाजधारणेसाठी आवश्यक संततिसंवर्धन, त्यासाठी स्त्रीपुरुष आकर्षण आणि प्रेमव्यवहार याना मोकळीक मिळावी. तीच प्रेरणा निषिद्ध संबंधातून कुटुंबव्यवस्थेच्या मुळावर येणार नाही यासाठी तिला काबूत ठेवण्याची गरज. ज्या समाजात कुटुंबव्यवस्थेबद्दल असुरक्षितता जास्त तिथे कामप्रेरणेवरची नियंत्रणे कडक असण्याची शक्यता अधिक.मुळात देव मानलेला काम गोस्वामी तुलसीदासांच्या काळात खलदलातला पहिला खलनायक ठरला असावा तो यामुळेच.
कालिदास आपल्याला आठवण करुन देतो की ढग हे चमकून प्राणघातक वीजही पाडतात आणि जीवनदायिनी वृष्टीही करतात. निसर्गप्रेरणांचा प्रवाह कसा नियमित करायचा हे आपण ठरवायचे. अन्यथा त्या प्रवाहाचा लोंढा विनाशकारी ठरू शकतो.
आकाशवाणी रतीला आश्वासन देते की तिचा पती परत येईल आणि ती दोघे परस्परात पुन्हा रममाण होतील. कामप्रेरणेचे शाश्वत अस्तित्व यामधून सूचित होते.
इकडे कामदहनामुळे खिन्न झालेल्या उमेने तपश्चरणाचा निर्णय पक्का केला. अलंकार आणि भरजरी वस्त्रे यांची जागा रुद्राक्षमाळा आणि वल्कले यांनी घेतली. कालिदासाची प्रतिभा पाहा किती उच्च कोटीची की तो म्हणतो, उमेने आपली लयबद्ध चाल वाऱ्यासंगे डोलणाऱ्या लतावेलींना दिली तर आपले घायाळ कटाक्ष हरिणींना देऊन टाकले. उमेने कठोर तप आरंभिल्यावर आजुबाजूचा परिसर बदलून गेला. पशुपक्षी भांडेनासे झाले, तिच्या भवती रेंगाळू लागले. तिच्या चेहऱ्यावर निराळे तेज तळपू लागले. केवळ पाणी पिऊन ती निरनिराळ्या ऋतूंना तोंड देत आपली तपश्चर्या चालू ठेवीत होती. या काळात ती पाने देखील ग्रहण करीत नसे. मोठमोठ्या तपस्व्यांना जमणार नाही, असे कठोर व्रत ती आचरीत होती. अशा वेळेस एक साधुपुरुष तेथे येता झाला. पार्वतीने उठून त्यांना बसण्यास आसन दिले आणि अत्यंत आदराने त्यांना प्रणाम केला.
साधुबुवांनी तपश्चर्येस लागणारी समिधा, पाणी, गवत इत्यादी साधने जवळपास आहेत ना याची चौकशी केली. तू शरीराला पेलवेल अशा बेताने तप करावेस, कारण शरीर हे पहिले धर्म करण्याचे साधन आहे, असे तिला बजावले. तू पाणी घालून निगा राखतेस त्या वेलींना पालवी फुटतेय ना, हेही विचारून झाले. तुझ्या हातून गवत खायला उत्सुक असणाऱ्या हरिणींविषयी तुला प्रेम वाटते ना, याची बुवांनी खातरजमा करून घेतली. मग ते म्हणाले,” तू तर कमाल केली आहेस. एक तर आमचा विश्वास आहे की इतके स्वर्गीय सौंदर्य ज्यांच्याजवळ असते, त्यांच्याकरवी कुठली वावगी वा दुष्कृत्ये घडूच शकत नाहीत. त्यात तू तपश्चर्येत भल्याभल्यांना मागे टाकलेस. त्तू धर्मावर दृढ राहिली असल्याने अर्थ आणि काम यांना तुझ्या ठायी बिलकुल थारा नाही.”एवढे बोलून बुवा आपल्या मूळ हेतूकडे वळले.
“हे बघ मुली, तू माझा नम्रतेने आदरसत्कार केलास खरा, पण मला तू मित्र समजायलाही अडचण नाही.
तुला एक कुतूहलापोटी विचारतो. नसेल योग्य वाटत तर नको उत्तर देऊ. तुझ्या पायाशी वैभव लोळतंय, सौंदर्य झळकतंय, मग हे तप करून आणखी काय तुला प्राप्त करून घ्यायचे आहे?काही विपरीत घटना घडली तर लोक तपश्चर्येकडे वळतात. पण तुझ्या बाबतीत असे काही घडले किंवा कुणी घडवले असेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. आणि तशी तू मनाने खंबीर दिसतेस!तू पतीच्या शोधात नक्कीच नसावीस. कारण रत्न का कुठे स्वामीच्या शोधात असते? बरं तुझ्या नजरेत एखादा पुरुष भरला असता तर तुझी ही तपाने सुकून गेलेली कळा पाहून तो नक्की कळवळला असता आणि तुझ्यापासून दूर राहणे त्याला कसचे जमते? अर्थात असे होऊ शकते की तुझ्यावर प्रेम करणारा पुरुष स्वत:ला लपवत असेल. कारण एकदा का तू त्याच्या नजरेस पडलीस तर मग तो पुरता भान हरपून बसेल. तर आता ही तपश्चर्या थांबव. याच्या निम्म्याने तप करतीस तरी एव्हाना तुझा मनोरथ पूर्ण होऊन पती तुजभोवती पिंगा घालत असता. लवकर कळू दे मला कुणाला तू वरलेस मनोमन!”
पार्वतीच्या इशाऱ्यावर तिची सखी साधुबुवांना सांगते की पार्वतीचे चित्त साक्षात शंकराकडे आकर्षित झाले असून कामदेव ज्या वेळी जळून खाक झाला त्या वेळेस त्याच्या हातातील बाण हिच्या हृदयात जाऊन बसला. तेव्हापासून हिचे चित्त थाऱ्यावर नाही. किन्नर शिवाच्या स्तुतिपर गीते गाऊ लागले की हिला रडू कोसळत असे. झोपेत उठून “शिवजी, कुठे चाललात आपण” असे ओरडे. हाताने त्यांचे चित्र रेखाटून त्यांच्याशी बोलायची. मग शिवाला प्रसन्न करुन घेण्याचा एकमेव मार्ग म्हणून हे तप तिने आरंभले.आम्ही तिची ही अवस्था पाहत आहो. पण आम्हाला हे कळेनासे झालेय की शिवजी हिच्यावर प्रसन्न होणार आहेत किंवा नाही, आणि केव्हा.
साधुबुवा सांगतात, “तो शिव ना, चांगलाच ओळकतो मी त्याला. छे छे मी कधीच त्याला पसंत करणार नाही. त्याचे सारे उद्योग मला ठाऊक आहेत. तू तुझा हात त्याच्या सापाने वेटाळलेल्या हातात देणार? तुझ्या तलम रेशमी वस्त्राची गाठ रक्ताने माखलेल्या हत्तीच्या कातड्याबरोबर मारणार? फुलांच्या पायघड्यावर पडणारी तुझी नाजुक पावले काय स्मशानातल्या राखेने माखणार? त्याच्या मिठीमुळे चितेच्या राखेने तुझ्या अंगांगावर ( मूळ: स्तनांवर) लावलेला चंदनलेप काळवंडणार?आणि मग तू स्वार कशावर होणार तर हत्ती नाहीच त्या म्हाताऱ्या नंदीवर! व्वा, काय पण तुझा वर! लोक आधीच त्याच्या मस्तकावरच्या चंद्रकोरीची कीव करतात आता तिच्या जोडीला तुझ्या सारखी चंद्रमुखी जाऊन बसणार! छान!
साधुबुवांकरवी कालिदास दोन गोष्टींकडे निर्देश करीत आहे. पर्वत दऱ्याखोऱ्यात राहणारे गिरिजन हे निसर्गापासून बचाव करीत पण निसर्गाशी मेळ राखत जीवन जगतात, त्यांचे जीवन कष्टमय आणि प्राथमिक गरजांभोवती केंद्रित झालेले आहे. नागर समाज शेतीतील वरकड उत्पादनाच्या पायावर श्रम विभागणी करून प्रगत सोयीसुविधांनी युक्त जीवन जगत आहे. विवाह ही कल्पना येथे आहे आणि आकर्षण-प्रेम यांच्या जोडीला सांसारिक सुविधा हव्यात हे सूचित इथे केले जात आहे:”तू प्रेम करत्येस खरी पण एकूण जीवनमानातला फरक लक्षात आलाय का तुझ्या?” नागर हे उच्च आणि गिरिजन हे निम्न स्तरावर अशी तुलना ही गर्भित आहे.
बुवांचे वाक्ताडन चालू असताना पार्वतीचा पारा चढतो. ती बुवांचे आक्षेप खोडून काढते. “तुमच्यासारख्या (नागरवृत्तीचा) पूर्वग्रह असणाऱ्यांना शिव कसा राहतो, काय, कसे आणि कशाकरिता असे जगतो हे समजणार नाही. एक लक्षात घ्या की सर्वशक्तिमान इंद्र हा देखील त्याच्यापुढे नतमस्तक होतो. तेव्हा तुमचे काहीही मला ऐकायचे नाही. ही मी चालले..” असे म्हणून ती वळते तोच साधुरूपातील शिव प्रकट होऊन तिला मिठीत घेतो.
नंतरच्या सर्गात सप्तर्षींकरवी शिव हिमवानाकडे पार्वतीसाठी मागणी घालतो आणि विवाह निश्चित होतो. येथे गमतीचा उल्लेख असा येतो की शिवजी विवाह करणार या वृत्ताने ऋषिमंडळी निर्धास्त होतात. तोपर्यंत आपण तप करीत असूनही विवाहित असल्यामुळे त्यांच्यात अपराधीपणाची भावना होती. साक्षात शिवजी आता विवाह करीत असल्याने ते ओझे दूर झाल्यासारखे त्यांना वाटते. सांसारिक शरीरसंबंध आणि ज्ञानसाधना या परस्परविरोधी गोष्टी मानण्याचा तत्कालीन प्रवाद त्यातून सूचित होतो.
पुढल्या सातव्या सर्गात कालिदास विवाहसोहळ्याचे तपशीलवार वर्णन करून खिळवून ठेवतो. सरस्वती वधुवराना आशीर्वाद देते, वराला नेमक्या शब्दात संस्कृतमधून तर वधूला सहज समजेल अशा बोलीभाषेतून! देवांच्या विनंतीवरून कामदेवाला पुन्हा जीवित केले जाते, कारण त्याच्या शापाचे मूळ नाहीसे झाले आहे.
आठव्या सर्गाचे नामकरण दोन प्रकारे केलेले दिसते. काही आवृत्तीमध्ये उमासुरतवर्णन तर इतरांमध्ये संभोगवर्णन असे केले आहे. एवढ्यावरुन कालिदासाच्या धाडसाची कल्पना यावी. जर शत्रूचा नाश करण्यासाठी एका शक्तिशाली पुत्राची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्रिमूर्तींपैकी शिवाकडे मागणी केली आहे, आणि तपोभंगासाठी शिवाने कामदेवाला निमिषार्धात जाळून टाकले आहे तर अशा उग्रप्रकृती देवत्वामध्ये मानवसुलभ कामप्रेरणेचे पैलू कसे व्यक्त करायचेहे कालिदासापुढचे आव्हान आहे. देवत्व ही कल्पना आहे,तर मनुष्यत्व हे अनुभवगम्य वास्तव आहे. या दोहोमध्ये कामप्रेरणा कुठे आणि कशी बसते हे पाहू या.
उमा पार्वती ही कामक्रीडेमध्ये अजाण आहे, जिला ‘मुग्धा’ असे म्हटले जाते. कलाकलाने खुबीने शिव तिला तयार करीत जातो. तिला हळुहळू शिवाचे प्रणयाराधन आवडू लागते आणि त्याच्याकडून शिकलेल्या क्रीडा आता तीच त्याला गुरुदक्षिणा म्हणून देऊ लागते. हिमवानाच्या प्रासादात महिनाभर राहिल्यावर मेरु, मंदार, कैलास या पर्वतांवर दोघे भ्रमण करतात. मलयगिरी व नंदनवनात वास्तव्य करून गंधमादन पर्वतावर येतात. तिथे पार्वती शिवाजवळ पहुडली असताना तो तिला सभोवतालच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करुन सांगतो. त्यात चक्रवाक, हत्ती, मोर इ.यांच्या हालचालींचे मनोज्ञ चित्रण येते. त्यात कमळ मिटत असताना निमिषभर रेंगाळते जणू एखादा भ्रमर प्रेमी यावा आणि आत शिरुन रात्रभर बंदिस्त व्हावा, असे तर कमळाला वाटत नसेल ना? चंद्रोदय होत असताना शिवाला तिथे पार्वती आणि तिच्या सख्या दिसू लागतात.“तू जर चंद्रप्रकाशाचे जमिनीवरचे कवडसे उचलू शकलीस तर केशकलाप बांधण्यासाठी ते सुंदर दिसतील.” गंधमादनावरील देवता तिथल्या कल्पवृक्षापासून केलेले मद्य घेऊन येते. ‘तुला तर खरं असल्या कामोत्तेजक पेयाची गरज नाही, परंतु देवतेचा मान राखावा’.तिची भीड चेपल्यावर ती सहजच आपल्या प्रियतमाच्या मिठीत येते. तो पाहात राहतो आणि डोळ्यांनीच तिला पिऊन टाकतो.ते दोघे एकमेकात इतके रममाण होतात की त्यांना दिवसरात्र यांनी काही फरक पडत नाही.कालिदासाची प्रतिभा अशी की तो अतिशय सूचक उल्लेख करून आपल्या पर्यंत सारे काही पोचवतो. पहाटवाऱ्याची झुळुक येते. वस्त्र जागेवरून किंचित ढळतं, मांडीवर निघालेला नखाचा ओरखडा रात्रीची आठवण करून देतो….निसर्गातले, जगण्यातले सारेसारे सत्य, शिव आणि सुंदर या अलौकिक उत्कट प्रेमामध्ये अनुभवाला येते, असे कालिदास सूचित करतो.
कामप्रेरणा मानवसुलभ खरी पण तिची पूर्ती प्रेमाला, समागमसुखाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकते, हे कालिदासाच्या कुमारसंभवात दिसून येते.
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses