‘दिल्ली में महफूज जगह की तलाश दो ही तरह के लोग करते हैं, जिन्हें प्रेम करना है और जिन्हें प्रेम करते हुए लोगों को देखना है. घबराहट में दोनों इतनी तेजी से उठे कि पास की झाड़ियों में भी हलचल मच गई. प्रेमियों को लगा कि पुलिस आ गई है. उसका कहा याद रहा – यह कैसा शहर है? हर वक्त शरीर का पीछा करता रहता है.’
“इश्क में शहर होना” हे रवीश कुमारच्या नाटकाचं गमतीशीर नाव वाचल्यापासून हे नाटक पुण्यात कसं बघायचं हा प्रश्न पडला होता. कोल्हापूरच्या सर्जनशाळेच्या संचाने पुण्यात याचे प्रयोग करायचे घोषित केल्यावर काहीतरी करून एक प्रयोग गाठला. हा प्रयोग न चुकवल्याचा आनंद झाला.
स्थित्यंतर आणि स्थलांतर या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी अटळ आहेत. माणसाचं एखाद्या शहरात स्थलांतर अनेक कारणाने होतं पण शहारानुरुप सवयी, अपेक्षा, दर्जा, वेग अशा बाबींत स्थित्यंतर होणं ही तुलनेनं हळू घडणारी प्रक्रिया आहे. या स्थित्यंतराच्या काळातच, माणूस अनेकदा ऐन जवानीत असतो आणि त्यामुळे त्याचं होणारं शारीर आणि मानसिक स्थित्यंतरसुद्धा एकाच वेळी घडत असल्याने हे दोन पेड असे थेट वेगळे करता येत नाहीत.
हे नाटक हाच दुवा नेमका पकडत. पटण्यासारखा शहरातून एकदम दिल्लीसारख्या बहुआयामी शहरात आल्यावर एका तरुणाचा प्रवास आपल्याला इथे दिसतोच. खरंतर त्या तरुणाचा असा प्रवास न दिसता एकूणच अशा तरुणांच्या अनेक छोट्या छोट्या कथांच्या धाग्याने तो आपल्यापुढे उभा रहातो.
तरुण जोडप्यांसाठी प्रेम असणं हे अनेकदा पुरेसं नसतं. ते व्यक्त करण्यासाठी शब्दासारख्या कृत्रिम माध्यामापेक्षा शारीरिक जवळीक साधून प्रेम व्यक्त करण्याचे थेट शस्त्र उपलब्ध असते. एकमेकांना कवेत घेणे, एकमेकांच्या केसांशी निर्हेतुक चाळे करणे इथपासून ते चुंबन घेणे वगैरे सोपस्कारांपर्यंत अनेक मार्गाने हे प्रेम व्यक्त केले जाते हे आपण सगळे जाणतो. या नाटकात यातील बहुतांश बाबी दाखवल्या असल्या तरी नाटकाचा तोल ढळत नाही. दोन व्यक्तींमध्ये असणारं आकर्षण आणि त्याचं शारीरिक पर्यवसान या बाबी अत्यंत सामान्य आहेत आणि त्या तशाच नाटकात येतात.
बाकी शहर दिल्ली असो वा मुंबई किंवा पुणे, अशा काही जागा असतात ज्या या प्रेमवीरांच्या लाडक्या असतात. पण तिथूनही त्यांना हटकले किंवा हाकलले जाते. इतक्या मोठ्या शहरांत परस्परसंमतीने शांतपणे चार खाजगी घटका काढता येऊ नयेत हेच मुळात आपल्या समाजाच्या कोत्या आणि अनारोग्यपुर्ण वागण्याचं दर्शन आपल्याला या नाटकात दिसतं.
तर असो. या नाटकात या सगळ्या “नॅनो प्रेमकथांना” साजेसा अवकाश, मध्ये सुयोग्य वेळ देत प्रेक्षकांपुढे ज्याप्रकाराची पात्रांची बसायची रचना, नेपथ्य वापरुन हे नाटक येते त्यामुळे या सगळ्या सुट्या धाग्यांचा, ठिगळांचा नुसता संचय न होता त्याला छान गोधडीचे रूप येते.
एकुणात केवळ इश्कातच नव्हे तर रोजच्या जगण्यात मुरलेले शहर दाखवण्यात नाटक यशस्वी झाले आहे. आणखी प्रयोग कधी होतील, कुठे होतील कल्पना नाही. पण झाल्यास नक्की बघा अशी शिफारस!
-ऋषिकेश
———————–
नाटकाच्या विचारणेसाठी खालील क्रमांकावर संंपर्क करावा.
सत्पाल – 9921785563, जयदीप – 7028191009
https://www.facebook.com/sarjanshala.kolhapur/
No Responses