मित्र मैत्रिणींनो,
मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असू शकते का? मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का? ‘ती आपल्या प्रेमात आहे असा मुलांचा/मित्रांचा गैरसमज होऊ नये म्हणून ‘मुलींनी मुलांपासून जरा लांबच रहावे’ याविषयी तुम्हाला काय वाटते? आपल्याला एखाद्याविषयी प्रेमभावना असेल तर तशीच भावना समोरच्या व्यक्तीची देखील असलीच पाहिजे, हा अट्टाहास योग्य आहे का?
या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही या संदर्भातील अनेक घटना तुमच्या आजूबाजूला पहिल्या असतील. अनुभवल्या असतील. आपल्या एक मित्र, आदित्य (नाव बदलले आहे) त्याचा अनुभव आपल्याला सांगितला आहे. तो नक्की वाचा आणि तुम्हाला काय वाटते ते सांगा.
“पण मी तुझा तसा कधी विचारच केला नाही, आपण चांगले फ्रेंड्स राहूयात ना ” ती असं म्हणताच माझा चेहरा उतरला. तिला पाहिल्यापासून ते या क्षणापर्यंत सगळं काही मला वाटत होतं तसंच घडत गेलं होतं. पहिल्यांदा मला वाटलं तिनं फक्त एकदा वळून पहावं, ते झालं.
मग वाटलं तिनं एक स्माईल द्यावी, तेही झालं.
त्यांनतर वाटलं तिनं बोलावं, ती बोलली.
मग वाटलं, तिनं भेटावं, ती भेटलीसुद्धा.
सगळं अगदी मनासारखं घडत होतं.
ती तासंतास गप्पा मारायची, सगळं सगळं शेअर करायची. मला वाटलं तिचं प्रेमच आहे माझ्यावर. म्हणून मी तिला प्रपोज करायचं धाडस केलं.
तिच्यासाठी मात्र मी असं अचानक ‘ माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं म्हणणं धक्कादायक होतं.
ती म्हणाली, “तू खूप स्मार्ट आणि चांगला मुलगा आहेस. मला तुझ्याशी बोलावसं वाटतं पण एक मित्र म्हणून.”
मुलांसोबत मैत्री करणं ठीक आहे पण तिला लग्नाचा विचार इतक्यात करायचा नव्हता. आईवडिलांना सोडून जाणं, लग्नाआधी मिळणारं स्वातंत्र्य तिला गमवायचं नव्हतं. आजकालच्या जगात ‘मुलांसोबत मैत्री करणं अगदी कॉमन आहे’ असं ती म्हणायची.
तिला आई वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नव्हतं. प्रेमात पडून ‘पळून’ (?) गेलेल्या मुलींच्या आईवडिलांची तगमग, समाजात वावरताना होणारे त्यांचे अपमान, हे सगळं तिला तिच्या आई वडिलांसोबत व्हायला नको होतं. म्हणूनच ती त्यांच्या आनंदासाठी व इज्जतीसाठी पारंपारिक पद्धतीने लग्न करणार होती.
मी म्हणायचो, जर तिला माझ्याबद्दल प्रेम नव्हतं तर तिनं इतकं रिलेशन पुढे जाऊ द्यायला नकोच होतं, तिला मी फोन नंबर विचारला तेव्हा तरी तिने नकार द्यायला हवा होता, फोनवर तासंतास बोलायला तरी नको होतं, माझ्यावर हक्क दाखवायला नको होतं. मुळात सर्वात पहिल्या दिवशी माझ्याकडे पाहून स्माईलच द्यायला नको होती.
तिला आता दुसरं कुणीतरी आवडू तर लागलं नसेल ना? तिनं मला का फसवलं ? मी तिच्यासाठी एक दोन वर्ष वाया घालावले ते ती परत करणार आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन जायचे.
आम्ही दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर होते आणि आपली बाजू पटवून देण्याच्या प्रयत्नात होतो. अधूनमधून होणाऱ्या भेटीत हाच मुद्दा निघायचा आणि दोघांत कडाक्याचं भांडण व्हायचं.
मी तिला नको नको ते बोलायचो. इतकंच काय तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचो. तिला मात्र हे घाणरडे आरोप नवे होते.
माझंही एक नवीन रुप तिच्यासमोर येत होतं. ‘मी दिसतो इतका सभ्य नाही’ असं तिचं माझ्याविषयी मत झालं. मलाही ती पूर्वीसारखी गोड न वाटता चारित्र्यहीन वाटायला लागली.
मला वाटतं की, चूक आमच्या दोघांचीही होती. प्रेम असल्याशिवाय मुलगी बोलूच शकत नाही असा माझा गैरसमज. तिला पाहिल्यानंतर दुसऱ्याच मिनीटाला मी तिचं ‘बायको’ म्हणून चित्र रंगवलं तसंच तिनेही आपल्याला ‘भावी नवरा’ म्हणून चित्र रंगवलं असणार असा मी विचार करत होतो. ‘मला जशी ती आवडली तसाच तिलाही मी आवडलो असणार’ अशी मी माझी समजूत करून घेतली होती. तिनंही माझ्या इतक्या जवळ येण्याआधी विचार करायला हवा होता. मी तिच्याविषयी फक्त एक मैत्रिण म्हणूनच विचार करत असेल, हे तिनं गृहीत धरायला नको होतं. आम्ही दोघंही आपल्या दोघांना जे वाटते तेच खरं आहे असं समजायला लागलो. जेव्हा एकमेकांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे आले तेव्हा ते एकमेकांना खोटे वाटायला लागले. ‘तू माझा विश्वासघात केलास’ असं आम्ही दोघंही म्हणायला लागलो. उरला प्रश्न सोबत घालवलेल्या क्षणांचा. एका क्षणी ‘ते दिवस सगळ्यात मस्त होते’ असं वाटायचं तर दुसऱ्याच क्षणी ‘ते दिवस’ फसवणुकीचा भाग वाटून अतिशय राग यायचा.
प्रेमाविषयीचे तुमचेही अनुभव आम्हाला सांगा. तुमच्या इच्छेविरुद्ध आणि परवानगी शिवाय तुमचे नाव कुठेही उघड केले जाणार नाही. तुम्हालाही छान मोकळं झाल्यासारखं वाटेल आणि तुमच्या अनुभवातून इतरांनाही काहीतरी शिकायला मिळेल…
अगदी मोकळेपणाने आणि बिनधास्त लिहा…. ही तुमची हक्काची जागा आहे…
4 Responses
खूप छान लेख आहे.तरुणाचे होणारे गैरसमज दूर होण्यास मदत होते…
धन्यवाद… प्रतिक्रिया देत जा…
Thanks so much
Maja Khup motha gairsamj dur zhala ahe
तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, तुम्हाला आवडलेली माहिती इतरांना ही पाठवा त्यांचे ही गैरसमज दूर करण्यास मदत करा.