काही दिवसांपूर्वी ठाण्यात प्राची झाडे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात एका तिच्याच ओळखीच्या तरुणाने चाकूने वार करून हत्या केली. अशा घटना वरचेवर घडत असतात. प्रेमात समोरच्या व्यक्तीने दिलेला नकार पचवणं, तो त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे हे मान्य करणं यासाठी समाजात, कुटुंबात वातवरणनिर्मिती होण्याची गरज आहे.
२००१ साली मी शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिकात ‘एकतर्फी प्रेमातून (याला प्रेम म्हणू शकत नाही खरंतर.) हत्या’ या विषयावर एकांकिका लिहिली होती. एवढी वर्षे उलटली…फक्त नावं बदलली; रिंकू पाटील, अमृता देशपांडे, आता प्राची झाडे. मध्यंतरीही बरीच नावं येऊन गेली. मुलीने नकार दिला की तिला संपवायचं ही तरुणांची मानसिकता मात्र बदललेली नाही. मुलीचा खून करण्यापर्यंत एवढं बळ कुठून येतं या विशीच्या मुलांच्यात?
मुळात प्रेम म्हणजे काय याची समज तरुण पिढीत तयार होत नाही, कारण आपल्या ‘सुसंस्कृत’ समाजात प्रेम, सेक्स हे विषय वर्ज्य. त्यामुळं हे नातं विश्वास, बांधिलकी, समज, परस्पर संमती आणि सन्मानाच्या पायावर उभं असतं याची शिकवण कुठून मिळणार? शिवाय आई-वडील, इतर नात्यांत, समाजात त्या गोष्टी प्रकर्षाने शिकविल्या जात नाहीत किंवा त्या अधिक हिंसक, तुटलेल्या अवस्थेत दिसतात. अगदी लग्नसंबंधात होणारी शारीरिक जबरदस्तीही कायद्यानं ‘गुन्हा’ म्हणजे ‘बलात्कार’ ठरत नाही. मुलीचा जन्म, शिक्षण, तिचं करिअर, लग्न या कशातच तिची संमती घेतली जात नाही आणि हे चक्र लग्नानंतरही शरीरसंबंध, मूल हवी की नको, किती, करिअर इ. याबाबतीत सुरू राहतं. शिवाय तिच्यावर ‘समर्पित’ भूमिकेचे लहानपणापासून संस्कार केले गेल्याने तीही मूग गिळून हे सगळं सहन करत असते. दुसरीकडं मुलं आणि पालकांच्यात तितकासा संवाद नाही. त्यामुळंं मुलं, त्यांचं घराबाहेरील आयुष्य, सामाजिक वर्तन, मित्र-मैत्रिणी, वैचारिक, भावनिक वाढ, त्यांचे ताणतणाव या बाबींवर घरात चर्चाच कितीशा होतात? मुलांची लैंगिकता, त्याबद्दलची त्यांची समज, त्यांची निवड या गोष्टी तर आणखी दूरच्या. मुलांनी शालेय शिक्षण घ्यावं यावर सगळ्याच घटकांनी लक्ष केंद्रित केलंय. मात्र त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे डोळेझाक करून. आई-वडील कामावर जाणाऱ्या कुटुंबात मुलांचा वाढणारा एकटेपणा व खेळ आणि तत्सम गोष्टी आयुष्यातून हद्दपार झाल्याने मिळणारा फावला वेळ ड्रग्ज, पोर्नोग्राफी, सोशल मीडिया अशा फुक्या दुनियेत व्यतीत करून ‘स्व’ ची भलतीच प्रतिमा तयार करणाऱ्या तरुण पिढ्यांसोबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. बोट दाखवेल ती महागडी वस्तू वेळेच्या बदल्यात देणाऱ्या आई-वडिलांनी आपण आपल्या पाल्याचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत हे समजून घेतले पाहिजे.
आपल्या सर्व धर्मांनीही स्त्रीला पुरुषाची ‘दासी’ म्हणून पुरुषाशिवाय तिला मुक्ती नाही, ती पुरुषापेक्षा हीन आहे हेच सांगितलंय. गोपिकांचा पाठलाग, त्या आंघोळ करताना त्यांचे कपडे पळवून नेणं या प्रकारांचं उदात्तीकरण करून सर्वसामान्य आणि सर्वमान्य केलं गेलं. दुसरीकडे सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावून आणि द्रौपदी आणि इव्हला माणसांच्या विनाशास कारणीभूत मानलं गेलं. कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक संस्कारात, मीडियामधून ‘पुरुष हे पुरुष असतात,’ म्हणून दाखविली जाणारी पुरुषाची ‘रंगेल’ आणि ‘आक्रमक, ‘हिंसक’ प्रतिमा पुरुषांना ‘खरं पुरुष’ बनायला भाग पाडते. आपल्या व्यवस्थेत पुरुषाला तो स्त्री आणि तिसऱ्या जेंडरपेक्षा कसा वरचढ आहे हे सिद्ध करावं लागतं. एखादी मुलगी प्रेमात कशी ‘मिळवायची’ याचे धडेच सिनेमासारख्या माध्यमातून दिले जातात. उदा. हिरोइन/मुलगी प्रेमाला नकार देत असेल तरी तिचा पाठलाग करणे, तिला धमकावणे, भावनिकरीत्या ब्लॅकमेल करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, तिच्याशी लगट करणे, तिच्या कुटुंबीयांना इजा पोहोचविणे, लग्नानंतर तिला त्रास देणे, असे लैंगिक छळाचे प्रकार सर्रास दाखवले जातात. हे सगळं झालं की हिरोइन त्याला ‘मिळते.’ ‘अगर तू मेरी नही हुई तो तुझे मै और किसीकी भी नहीं होने दुंगा’ हा आपल्या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग. हे जे दिसतं तेच समाजात रुजतं.
हे समोर असताना एखादी मुलगी एखाद्या मुलाला नकार कसा देऊ शकते? आणि तो नकार स्वीकारून पचवणारा ‘खरा पुरुष’ कसा असणार? स्त्रीवर मालकी हक्क गाजवणं, तिच्या लैंगिकतेवर नियंत्रण मिळवणं, एखादी स्त्री ऐकत नसेल तर तिच्यावर जबरदस्ती करणं किंवा तिला संपवणं, तिच्यावर अॅसिड फेकून तिला विद्रूप करणं, तिचे अश्लील फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं, लहान मुलींवर पाशवी अत्याचार करून त्यांचा जीव घेणं ही मानसिक विकृती नाही, हे सत्तेचं उन्मादक प्रदर्शन आहे.
मुळातच कुठल्याही मुलानं मुलीचा खून करणं ही वरवर पाहता काही सेकंदात घडणारी गोष्ट वाटते. पण ते एक चक्र आहे, ज्याची पाळेमुळे दैनंदिन आयुष्यात आहेत. जागतिकीकरण, चंगळवाद यामुळं कशाचेच मोल वाटेनासं झालंय. लहानपणपासून स्त्रियांशी, मुलींशी सन्मानानं वागायला हवं, निर्णयात त्यांचीही भागीदारी तेवढीच महत्त्वाची आहे हे मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं तरच चित्र पालटू शकतं. त्यासाठी घरातल्या पुरुषांनी आपली पुरुषप्रधानतेमुळे येणारी ‘सत्ता’ सोडून स्त्रियांशी आणि सर्वांशीच आदरानं वागायला हवं. रागावर नियंत्रण किंवा मला माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट नाही मिळाली तर मी अयशस्वी होत नाही, यावर काम व्हायला हवं.
मानसिक आजारांना ओळखणं, स्वीकारणं आणि त्यावर उपचार यावर भर द्यायला हवा तरच त्यातून मुलींना त्रास देण्याची आणि ‘आत्मक्लेश’ ‘पश्चाताप’ म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. पुरुषसत्ताक पद्धतीचे तोटे फक्त स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांना आणि सकल समाजाला भोगावे लागतात. वास्तविक छेडछाड, पाठलाग, शेरेबाजीसारख्या किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी हे कायदेशीर गुन्हे आहेत. मात्र ‘मुलगे/पुरुष असेच वागणार’ आणि ‘स्त्रिया/मुली’ सहनशील असल्याने सहन करणार’ अशा सामाजिक मनोभूमिकेमुळे मुलांना असं हिंसक वागायला एक प्रकारे प्रोत्साहनच मिळतं. स्त्रीची एकूणच प्रतिमा जी माध्यमे, धर्म, शिक्षण, शासनव्यवस्था इ. व्यवस्थांमध्ये दाखवली जाते, प्रत्यक्षात त्यातून त्यांचे शोषण केले जाते ते थांबले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलणं, कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणं, मुलींच्या सहभागाची संधी देणं ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. मुलींवरील अत्याचार ही मुलींची समस्या न मानता ती अख्ख्या समाजाची जबाबदारी आहे असे मानून त्यात पुरुषांनाही बरोबर घेतलं गेलं तर या एकतर्फी भावनेतून होणाऱ्या हत्या थांबतील.
मुलीने आपला नकार ठाम शब्दात व्यक्त करणं आणि त्या ‘नो मिन्स नो‘ विचार आणि स्वीकार मुलांनी व समाजाने करणं गरजेचं आहे. त्यासाठी तरुणांचा एकमेकांशी मोकळा संवाद व्हायलाच हवा.
याच अंगाने मुंबईत ‘मावा’ सारख्या संस्था मुले आणि पुरुषांसोबत काम करतात. त्यांनी जवळजवळ नऊ जिल्ह्यांमध्ये संवादक तयार केले आहेत जे तरुणाशी संवाद साधतात. त्यामुळं इतरांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील स्त्रियांशी वागण्यात खूप बदल झाल्याचं ही मुलं आवर्जून सांगतात.
सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात स्त्रियांनी आपली मानसिकता बदलत झेप घेतली, पण ती झेप पचविण्याची मानसिकता पुरुषांनी त्या वेगाने बदलली नाही. त्यामुळं या बदललेल्या सक्षम स्त्रीचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी पुरुषांनी करण्यावाचून आता पर्यायही नाही. आता पुरुषानं ‘माणूस’ बनण्याची आणि स्त्रीला स्त्रीपेक्षा ‘माणूस’ म्हणून वागविण्याची वेळ आली आहे. ‘हे माझ्या मुलीच्या बाबतीत होत नाही ना!’ असं म्हणत डोळ्यासमोर मुलीचा खून होत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या समाजाला अशा प्रकारच्या हिंसा रोखण्यात पुढाकार घ्यावा लागेल. ती त्यांची जबाबदारी तर आहेच, पण हे वादळ त्यांच्या स्वत:च्या उंबरठयावर येऊन कधी आदळेल हे सांगता येणार नाही.
एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणं ही जगातील अत्यंत छान भावना असते; मात्र प्रेमात ती व्यक्ती मिळालीच पाहिजे आणि नाही मिळाली तर माझ्यात काही कमी नसून समोरच्या व्यक्तीला आपलं नातं मान्य नाही, एवढाच त्याचा मर्यादित अर्थ घेणं गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार होणार नाही हे माहीत असूनही तिला आपलं मानून तिच्या नात्याला जपणं हे प्रेम आहे. त्याची वेदना जरूर असते, मात्र तिला थोपवता येऊ शकतं. खरं प्रेम एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकतं, आता ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीपेक्षा जास्त छान व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्की येऊ शकते हा आशावाद नक्कीच खरा आहे. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तिला इजा करण्याचा विचारही मनाला शिवत नाही याला ‘प्रेम’ म्हणतात.
लक्ष्मी यादव
laxumi@yahoo.co.in
लेख साभार : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/learn-to-digest-the-rejection/articleshow/65367106.cms
No Responses