लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १

“सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे, आपल्याकडे इथे ती मिळते का?’ किंवा ”कृत्रिम लिंग कुठे मिळेल?” अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात. लैंगिक सुख देणा-या खेळण्यांची (Sex Toys) आपल्या देशात (इतर देशांसारखीच) खूप मागणी आहे. अशा उपकरणांची गरजही आहे.

अनेकांनी वयाची पंचविशी ओलांडली तरी लैंगिक अनुभव घेतलेला नसतो. संभोग करायची तीव्र इच्छा असते, पण लग्न झाल्याशिवाय लैंगिक अनुभव घ्यायचा नाही अशी आपली संस्कृती असल्यामुळे अनेकांच्या लैंगिक इच्छांचा कोंडमारा होतो. त्यांची लैंगिक सुखाची गरज काही अंशीतरी ही उपकरणं वापरून किंवा अश्लील वाङ्मय बघून पुरी होते.

लग्न होऊन काही वर्ष गेल्यानंतर आपल्या एकाच जोडीदाराबरोबर तीच ती प्रणयक्रीडा करायचा कंटाळा येतो. शरीरही पूर्वीसारखे ताबडतोब साथ देत नाही. तारुण्यात लैंगिक उत्तेजना देण्यास कल्पनाशक्ती पुरी असायची ती आता पुरी पडत नाही. पूर्वीसारखी ‘पॅशन’ नसते. ती यावी म्हणून संभोगात नावीन्य आणण्याची गरज वाढते. यासाठी काहीजण अश्लील वाङ्मयाचा आधार घेतात तर काहीजण लैंगिक उपकरणांचा वापर करतात.

लग्न न झालेल्या प्रौढ व्यक्तीला किंवा विधवा व्यक्तीला लैंगिक जोडीदार मिळणं कठीण असते. अशा वेळी काही अंशीतरी आपली गरज पूरी करण्यासाठी लैंगिक उपकरणांचा वापर करता येतो.

लैंगिक उपकरणांच्या कार्यानुसार त्यांची विविध गटात विभागणी करता येते. काही उपकरण ही लैंगिक समस्येवर उपाय म्हणून वापरली जातात उदा. ‘व्हॅजिनिस्मस’ साठी योनी ‘डायलेटर’ उपकरणाचा वापर केला जातो. काही उपकरणं लैंगिक शिक्षणासाठी वापरली जातात. उदा. लैंगिक शिक्षण देताना उत्तेजित लिंगावर कंडोम व्यवस्थितपणे कसा चढवायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कृत्रिम लिंगाचा वापर करता येतो. काही उपकरणं लैंगिक उत्तेजनेसाठी/सुखासाठी वापरली जातात. उदा. कत्रिम लिंग इत्यादी. ही विभागणी अगदी ढोबळपणे केली आहे, कारण काही उपकरणं अनेक वर्गात बसू शकतात.

 

वैद्यकीय उपकरणं

योनी डायलेटर

‘व्हॅजिनिस्मस’ समस्या सोडवण्यासाठी योनी डायलेटचा वापर केला जातो. कमरेच्या भागाला रेडिएशन दिलं असलं तर योनी आकुंचन पावू शकते किंवा योनीची शस्त्रक्रिया झाली तर योनी आकुंचन पावण्याची शक्यता असते. अशी अनेक कारण आहेत, ज्याच्यासाठी योनी डायलेटर या उपकरणाचा उपयोग होतो. हे उपकरण रबर, प्लॅस्टिक किंवा सिलिकोनचं बनवलेलं असतं. या डायलेटरचे वेगवेगळे आकार असतात. हे उपकरण डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे योनीत घालायचं असतं.

 

‘सक्शन पंप’, ‘कॉक रिंग’

ज्यांच्या लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते अशांना ‘सक्शन पंप’ चा वापर करता येतो. लिंगावर पंपची टयूब लावून हा पंप सुरू केला की पंप टयूबमधील हवा ओढून घेतो. हवा ओढली गेल्यामुळे टयूबमध्ये पोकळी (व्हॅक्यूम) तयार होते व त्यामुळे लिंग उत्तेजित होते. लिंग उत्तेजित झाल्यावर, लिंगातील रक्तपुरवठा कमी होऊ नये म्हणून लिंगाच्या देठावर एक रबराची ‘कॉक रिंग’ चढवली जाते. मग पंप काढून संभोग करता येतो. वीर्यपतन झालं की ही रिंग काढली जाते. या सक्शन पंपाची एक मोठी अडचण – लैंगिक इच्छा झाली की हे उपकरण वापरून लिंग उत्तेजित करायच्या कालावधीत ‘मूड’ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही वेळा सक्शन पंप न वापरता लिंग उत्तेजित झाल्यावर लिंग ‘कडक’ राहावं म्हणून नुसती ‘कॉक रिंग’ लिंगाच्या देठावर बसवली जाते. वीर्यपतन झालं की ही रिंग काढली जाते.

सावधान‘कॉक रिंग‘ ही दहा-पंधरा मिनिटांच्या वर लिंगावर चढवू नये. रक्तप्रवाह फार काळ बंद राहिला तर लिंगातील पेशी मरायला लागतात.

रबर लवचीक असतं म्हणून ‘कॉक रिंग’ ही रबराची असावी. (धातूची ‘कॉक रिंग’ अजिबात वापरू नये). रबरी ‘कॉक रिंग’ला कडा असाव्यात. या कडा पकडून उत्तेजित लिंगावरून ही रिंग काढण्यास सोपं जातं. अशा कडा नसल्यास लिंगाची उत्तेजना जात नाही तोवर ही रबराची रिंग काढणं अवघड होतं.

अँड्रो पेनिस

‘अँड्रो पेनिस’ म्हणून एक उपकरण अमेरिकेत उपलब्ध आहे जे लिंगाची लांबी काही प्रमाणात (अंदाजे दीड इंच) वाढवण्यास मदत करते असा निर्मात्यांचा दावा आहे. ते दररोज काही तास शिथिल लिंगावर बसवायच असत. ते शिथिल लिंग ताणून ठेवून लिंगाची लांबी वाढवते. तसंच लिंगाला खूप बाक असेल (कॉर्डी) तर हे उपकरण वापरून तो बाक कमी करण्यास मदत करते असा निर्मात्यांचा दावा आहे.

 

इरॉस थेरपी

ज्या स्त्रियांना काही विशिष्ट शारीरिक आजारांमुळे लैंगिक उत्तेजना येण्यास अडचण येत असेल अशांना या उपकरणाचा फायदा होऊ शकतो, असा निर्मात्यांचा दावा आहे. हे उपकरण त्यांच्या बाह्य जननेंद्रियांवर लावून वापरायचं असतं. हे उपकरण एका हलक्या सक्शन पंपासारखं काम करते. या उपकरणाचा आठवड्यातून तीन ते चार वेळा वापर करण्याने जननेंद्रियांतील रक्तप्रवाह वाढतो व त्यांना संभोगात लैंगिक सुख मिळण्याचे प्रमाण वाढते असा निर्मात्यांचा दावा आहे.

पेनाईल इम्प्लांट

ज्या पुरुषाचे लिंग उत्तेजित होण्यास अडचण येते अशांना शस्त्रक्रिया करून ‘पेनाईल इम्प्लांट’ बसवता येते. या उपकरणाच्या आधारे लिंगाला ताठरता येते. या उपकरणाचे विविध प्रकार आहेत. ही शस्त्रक्रिया करून घेतलेल्या फार थोड्याजणांना समाधानकारक परिणाम मिळतो.

 

लैंगिक सुखाची साधनं

कृत्रिम लिंग

कृत्रिम लिंग हे लाकूड/रबर/प्लॅस्टिकचं बनवलेलं असते. ते योनीत किंवा गुदात घालून लैंगिक सुख मिळवता येतं.

व्हायब्रेटर 

हे उपकरण कृत्रिम लिंगासारखंच असतं पण त्याच्या आत एक मोटर व बॅटरी असते. मोटर सुरू झाली की व्हायब्रेटरला कंपनं येतात. हा व्हायब्रेटर शिस्निकेला, वृषणांना, लिंगाला लावून, योनीत किंवा गुदात घालून लैंगिक सुख मिळतं.

रबराची बाहुली

जशी हवेची उशी असते तशी स्त्रीच्या आकाराची हवेनं फुगवता येणारी रबराची बाहुली असते. ती बाहुली हवेने फुगवून तिच्या योनीत लिंग घालून संभोग करता येतो.

एनल बीड्स

 ही प्लॅस्टिक किंवा रबर किंवा स्टीलची, तीन ते आठ मण्यांची माळ असते जी योनीत किंवा गुदात घालून विविध वेगानं बाहेर ओढायची असते. त्या मण्यांच्या घर्षणातून स्त्रीला/पुरुषाला लैंगिक सुख मिळतं.

पेनिस स्लीव्ह

हे नळीसारखं उपकरण असतं ज्याच्यावर नक्षी असते वा मणी बसवलेले असतात. हे उपकरण लिंगावर चढवलं जातं. यामुळे योनीमैथुनात स्वीकृत जोडीदाराला जास्त घर्षण जाणवतं.

निप्पल क्लॅम्प

स्तनांची बोंडं उत्तेजित करण्यास हे ‘चिमटे’ स्तनांच्या बोंडांवर बसवले जातात.

या प्रकारची खूप वेगवेगळी व इथे नमूद न केलेली लैंगिक उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही त्याबाबत तुमच्या परीने माहिती मिळवू शकता.

पुढील भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत कुठे मिळते व विकत  घेताना काय पाहावं, कुठले चांगले बॅंड आहेत, वापरताना काय काळजी घ्यावी इत्यादी खूप सारी माहिती घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे लैंगिक उपकरणे व भारतीय कायदा याबाबतही जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहित असणारी व तुम्हाला भावणारी कोणती लैंगिक उपकरणे आहेत?  आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

संदर्भ :

पुस्तक ‘मानवी लैंगिकता’, लेखक – बिंदूमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट

चित्र साभार :

http://hsc4233jz.blogspot.com/2017/04/the-inside-scoop-on-penile-pumps.html

https://middlesexmd.com/pages/use-vaginal-dilators

https://en.wikipedia.org/wiki/Cock_ring

https://www.amazon.com/Evolved-Novelties-Vibrating-Penis-Sleeve/dp/B00M6E3L22

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Riyaz says:

    सकशन पप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap