एका नात्यातून बाहेर निघून दुसऱ्या नात्यात जाण्याचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतात, म्हणूनच याविषयी चर्चा घडवून आणणारा ‘एका नात्यात असताना दुसरं कुणी आवडलं तर जुनं नातं तोडायला काहीच हरकत नाही.’ हा पोल आपण वेबसाईटवर काही दिवसांपूर्वी प्रकाशित केला होता. या पोलवर ७३ टक्के लोकांनी हे त्यांना अमान्य असल्याचं, तर १८ टक्के लोकांनी हे मान्य असून असं करायला काहीच हरकत नाही असं उत्तर दिलं. अशा परिस्थितीत काय करायला हवं हे माहित नसल्याचं ९ टक्के लोकांनी नोंदविलं.
बहुतांश लोकांना दुसरं कुणीतरी आवडलं म्हणून सध्याचं नातं तोडणं हे मान्य नसल्याचं सांगितलं आहे. आपल्या सामाजिक सांस्कृतिक परिवेशात नातेसंबंधाना विशेष महत्व दिलं गेलं आहे, हेच यातून पुढं येतं, आणि त्यातही आपण इथं विशेषत: ज्या प्रेमाच्या, व्यक्तिगत नात्याबद्दल बोलतो आहोत ते नातेसंबंध ही सुंदर, हवीहवीशी, मायेची पाखर घालणारी, परस्परांना समृद्ध करणारी गोष्ट आहे. नात्यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे ताण येत असतो, वाद होतात, विचार जुळत नाही. पण प्रत्येकवेळी नातं संपवणं हा पर्याय असू शकत नाही. नातेसंबंध ही वाटतं तितकी सोपी आणि सहजतेने (कॅज्यूअली) घेण्यासारखी गोष्ट नाही. म्हणूनच प्रत्येकाची नात्याबद्दलची संकल्पना, अपेक्षा, कमिटमेंटची व्याख्या ही वेगळी असते. त्याबद्दल स्वतःला आणि नात्यातील व्यक्तीला स्पष्टता असणं गरजेचं आहे तसेच नात्यात आपल्यासोबत इतरही व्यक्ती ‘इन्वोल्व्ह’ असतात याचं भान असायला हवं.
प्रत्येक व्यक्तीच्या नात्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात, त्यानुसार व्यक्ती नातं जोडत असते. कमिटेड नातं (नात्याचे काही नियम तयार करणं आणि ते स्वीकारणं), ओपन नातं (यामध्ये जोडीदारांना इतर व्यक्तींसोबत डेट करणं किंवा लैगिक संबंध ठेवणं मान्य असतं, लॉंग डीस्टन्स रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप (लग्न न करता एकत्र राहणं), लग्नाचं नातं (कायदेशीररीत्या विवाह करून एकत्र राहणं) असे काही नात्यांचे प्रकार असतात. प्रत्येक नात्याचे त्या नात्यातील दोघांनी मिळून ठरविलेले आपापले काही नियम, बांधिलकी असते आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे.
नात्यातून बाहेर पडण्यासाठी जी कारणं दिली जातात त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.
‘ती काळी आहे’, ‘त्याला दाढी येत नाही’, ‘त्याला इंग्रजी बोलता येत नाही’ ‘ती साडी नेसत नाही, जीन्स घालते’ या कारणांवरून देखील काही लोक नातं तोडताना दिसतात. अशावेळी साहजिकच ‘आधी ती गोरी होती आणि आता अचानक काळी झाली का?’ किंवा ‘आधी दाढी येत होती आणि आता अचानक यायची बंद झाली का?’ असे प्रश्न पडतात. नातं जोडत असताना तुम्हाला जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, याबद्दल स्पष्टता हवी. अशा कारणांमुळे नातं तोडताना, आधी हे माहित असताना आपण नातं का जोडलं याचा विचार करावा. खरंतर नातं तोडताना ही कारणं असूच शकत नाहीत असं मला वाटतं. ज्यावेळी खरं कारण काय आहे हे जोडीदाराला सांगता येत नाही, त्यावेळी लोकं अशी कारणं देताना दिसतात. अशी कारणं देऊन नातं तोडणं हे समोरच्या व्यक्तीसाठी अतिशय दु:खद अनुभव असू शकतो.
‘तो ओला टॉवेल बेडवर टाकतो, मला अजिबात आवडत नाही’, ‘तिला नीट स्वयंपाक येत नाही’, अशा तक्रारी आपण अनेक ‘कपल्स’मध्ये ऐकत असतो. पण यांसारख्या कारणांवरून जर एखादी व्यक्ती नातं तोडत असेल, तर तिला परिपूर्ण जोडीदार मिळणं अशक्यच आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतोच. एकमेकांचा त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुण-दोषांसकट स्वीकार करणं आणि समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास होऊ नये, यासाठी स्वतःच्या काही सवयी बदलणं, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेऊन परस्परांनी एकमेकांशी पूरक होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं.
मला चांगला मोबाईल मिळाला म्हणून मी हा टाकून देऊन तो घेईन अशा पद्धतीने नात्यांकडे बघू नये. नवीन नातं चांगलं मिळत असेल तर जुनं सोडायला काही हरकत नाही, असा जर नात्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन असेल तर कधीच कोणाला परफेक्ट माणूस मिळणार नाही. आयुष्यात आलेली नवीन व्यक्ती सध्याच्या जोडीदारापेक्षा दिसायला, आर्थिक, सामाजिक, लैंगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सरस आहे, हे देखील नातं संपविण्याचे कारण असू नये. नात्याकडे बघताना उपयुक्ततावादी किंवा चंगळवादी दृष्टीकोन ठेवणं योग्य नाही, कारण आयुष्याच्या टप्प्यावर असं सध्याच्या व्यक्तीपेक्षा सरस कोणीतरी भेटतच जाईल आणि स्थिर नातं तयार होणं अवघड आहे. नात्यातील अस्थिरतेचा सामना करणं सोपं नाही त्यातून अनेक मनो-सामाजिक प्रश्न तयार होऊ शकतात.
‘दोन व्यक्ती एकत्र आल्या, की भांड्याला भांडं लागणारच’ असं आपण अनेकदा नात्याविषयी ऐकत, बोलत असतो. वाद, भांडण, नात्यात ताण-तणाव येणं अगदी स्वाभाविक आहे. कोणत्याही नात्यामध्ये चढ-उतार हे असतातच. प्रत्येकजण कधी न कधी आपल्या जोडीदाराशी भांडतोच. भांडणं अगदी स्वाभाविक असतात असंच अनेकांना वाटतं. मात्र या भांडणांकडे लक्ष द्यायला हवं. नात्यात दुरावा येत असल्याचे हे लक्षण असू शकतं. योग्यवेळी संवाद साधून हे भांडण मिटलं तर मात्र नातं अजून छान होऊ शकतं, बंध अधिक घट्ट होऊ शकतात. जोडीदारासोबत संवाद साधत, प्रसंगी विश्वासू, खात्रीशीर आणि नि:पक्षपाती अशा व्यक्तींची मदत घेणं कधीही चांगलं. मात्र ही भांडणं करत असताना आपल्याकडून समोरच्या व्यक्तीचा अनादर, एखाद्याला कमी लेखनं, हिंसा आणि शोषण तर होत नाही ना, याची दक्षता घ्यायला हवी. नात्यामध्ये यापैकी कोणत्याही गोष्टीचं समर्थन करू नये.
एक जोडीदार आस्तिक तर दुसरा नास्तिक, एकाला साधं राहणं आवडतं तर दुसऱ्याला फॅशनेबल, एक एका पक्षाचा तर दुसरा दुसऱ्या पक्षाचा अशा जोड्या आपण अनेकदा पाहतो. दोन व्यक्तींमध्ये परस्परविरोधी मतं, आवडीनिवडी असू शकतात. असं असूनही परस्परांच्या मतांचा आदर ठेऊन, एकमेकांच्या आवडी-निवडी स्वीकारून, आपली मतं, आवडी-निवडी एकमेकांवर न लादता अनेकजण आनंदाने एकत्र आयुष्य जगू शकतात.
अनेकदा मुलं-मुली प्रेमाची, लग्नाची कमिटमेंट देतात आणि ऐनवेळी आमच्या घरचे तयार होणार नाहीत म्हणून मध्येच साथ सोडून देतात. अशावेळी दुसऱ्या जोडीदाराला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये कमिटमेंट देत असताना त्याचा अर्थ समजून घेणं आणि ती निभावणं गरजेचं आहे.
जोडीदाराला मुल होत नाही किंवा एखादा आजार झाला यांसारख्या काही वैद्यकीय अडचणींमुळे लोक त्या नात्यातून बाहेर पडतात हे देखील योग्य नाही. कमिटेड नात्यांमध्ये दोघांनी एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेणं अपेक्षित असतं त्यामुळे अशी कारणं देऊन मध्येच साथ सोडणं योग्य नाही असाच प्रसंग आपल्यावर आला असता तर, याचा विचार जरूर करावा.
लहानपणापासून मुलगा आणि मुलगी म्हणून वेगवेगळी शिकवण दिली जाते. मुलांना घरकाम करण्यास शिकविलं जात नाही. आजकाल अनेक ठिकाणी दोन्ही जोडीदार आर्थिक जबाबदारी घेत असताना दिसतात. मात्र पुरुषांचा घराकामामध्ये सहभाग दिसत नाही. एकाच जोडीदारावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्याने नात्यामध्ये ताण येण्याची शक्यता असते. यांवर संवाद होऊन दोघांनी एकमेकांचा कल, आवड ओळखून समान जबाबदाऱ्या घेणं गरजेचं आहे.
नात्यामध्ये दोघांचं स्वतंत्र अस्तित्व असणं, स्पेस असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर ते अबाधित ठेऊन नात्यासाठी दोघांचीही नातं टिकविण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी हवी.
बऱ्याचदा असं होतं, की तुमची आणि तुमच्या जोडीदाराची काहीच चूक नसते. पण इतरांचा हस्तक्षेप आणि आसपासची परिस्थितीच अशी असते, की त्यामुळे तुमच्या नात्यात ताण येऊ शकतो. अशावेळी एकमेकांवर दोषारोप करून, परिस्थितीला बळी न पडता नात्यातून तडकाफडकी बाहेर पडण्यापेक्षा, ठामपणे एकमेकांसोबत घट्ट उभं राहून परिस्थितीवर मात केली तर नातं अधिक भक्कम होऊ शकतं.
नाती बदलत जातात, कारण दोन्ही व्यक्तींमधे बदल होत असतो. एकत्र आनंद मिळतो ही अवस्था संपून एकत्र जबाबदारी घेण्याची वेळ येते. मग परस्परांचे गुणदोष पुढे येतात. पण प्रेमामध्ये, नात्यामध्ये एकमेकांना पुढे घेऊन जाणं असतं, सावरणं असतं. जमत नाही म्हणून सोडून देणं नसतं. म्हणूनच व्यक्ती म्हणून निखळपणे जोडीदाराचा स्वीकार होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जोडीदारासाठी आपल्यातील त्रासदायक स्वभाव आणि दोष कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
नातं गृहीत धरून चालत नाही, ते जाणीवपूर्वक जपावं लागतं, फुलवावं लागतं, अन्यथा नात्यामध्ये तगमग, घुसमट नि ताटातूट होण्याची शक्यता वाढते. इतर कुणाचे आकर्षण वाटू लागतं. मनमोकळा संवाद, एकमेकांच्या गुण-दोषांचा स्वीकार, एकमेकांचं कौतुक करणं, दाद देणं, भावना व्यक्त करणं, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखून जोडीदारासाठी आणि नात्यासाठी स्वतःमध्ये बदल करणं, जबाबदारीची जाणीव आणि तडजोडीची तयारी याची कोणतंही नातं घट्ट आणि आनंदी होण्यासाठी मदत होते.
या पोलच्या निमित्ताने, या विषयावर चर्चा घडवून आणणे हाच उद्देश होता. पोलवर मत नोंदवत असताना फक्त पर्याय निवडता येतो, मात्र याविषयी ‘मान्य, अमान्य किंवा माहित नाही’ याव्यतिरिक्त बरंच काही तुम्हाला वाटत असेल, अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच तुम्हाला याविषयी आणखी काय वाटते, लेखात मांडलेल्या कोणत्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का किंवा तुम्हाला काय पटलेले नाही याविषयी या लेखाखाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा.
अगदी शुल्लक कारणांवरून पहिल्या नात्यातून बाहेर पडून, ब्रेक अप करून दुसऱ्या नात्यामध्ये जाणं, इतकं कॅज्यूअली नात्याला घेऊ नये हे जरी खरं असलं, तरी कोणत्याही दोन व्यक्तींनी आयुष्यभर एकमेकांसोबत असमाधानी राहून नातं चालू ठेवण्यापेक्षा ब्रेक-अप करणं, नातं संपवणं हा एक पर्याय असू शकतो. ब्रेक अप कधी व कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले जातात,अन अशा बऱ्याच बाबी आपण पुढच्या एका लेखात पाहणार आहोत.
5 Responses
सुंदर लेख. एकमेकांना समजून घेऊन नातं जपण फार महत्त्वाचं असत. ह्या लेखातून नक्कीच समाजप्रबोधनाला चालना मिळेल.
नक्कीच!
आपल्या सारख्या वाचकांच्या प्रेमाच्या जोरावर हे काम चालू आहे, धन्यवाद!!
Nate todnya peksha, natyala ani sanbandhit vyktila vel dena garjecha ahe. Time is the solution mhantat na tasach kahitari. Anyways, it is very good artical.
नात्यात दूरावा तेव्हा च ये तो जेव्हा दूसरा माणूस येऊन त्या नात्यात गैरसमज निमार्ण करून देतो आणी समाजा मदे असे बरेच बेकपप होण्याच मूख्य कारण आहे! संवाद होने खूप गरजेचे आहे त्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात
एकदम बरोबर ✊