लैंगिकता म्हणजे?

0 1,881

लैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता असेल तर काही जणांना मनाप्रमाणे राहणं, कपडे घालणं, व्यक्त होणं म्हणजे लैंगिकता असू शकेल. असे सर्व अनुभव, विचार, अपेक्षा आणि मान्यतांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होत असतो.

लैगिकतेचे अनेक पैलू लक्षात घेणारी एक व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

लैंगिकता म्हणजे आपण माणूस असण्याचा गाभा आहे. लिंग, लिंगभाव, लिंगावर आधारित ओळख आणि भूमिका (स्त्री, पुरुष,, इत्यादी), लैंगिक कल, सुख, लैंगिक नाती आणि संबंध व प्रजनन अशा अनेक गोष्टींचा समावेश लैंगिकतेमध्ये होतो. लैंगिकता विविध माध्यमातून व्यक्त होते आणि विविध प्रकारे अनुभवली जाते. विचार, स्वप्नं, इच्छा, विश्वास, दृष्टीकोण, मूल्यं, वागणं, प्रचलित रीती, भूमिका आणि नातेसंबंध या सर्वातून आपली लैंगिकता व्यक्त होते आणि आपल्याला लैंगिकतेचा अनुभव येतो. या सगळ्याचा जरी समावेश होत असला, तरी यातील प्रत्येक घटक आपल्याला अनुभवाला येईल किंवा प्रत्येक घटक आपण व्यक्त करू असं मात्र नाही.

जीवशास्त्रीय, सामाजिक, मानसिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, नैतिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि अध्यात्मिक बाबींचा एकमेकांशी कसा संबंध आहे, त्या एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात त्याचा लैंगिकतेवर परिणाम होत असतो.

(जागतिक आरोग्य संघटना, २००२)

प्रात्येकासाठी लैंगिकतेचा अनुभव वेगळा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपली लैंगिकता वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. प्रत्येकासाठी लैंगिकतेचा अर्थ वेगळा असू शकतो. एकाला जे पटेल ते दुसऱ्याला पटणार नाही किंवा एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने लैंगिक विचार, वर्तन करेल ते दुसऱ्यापेक्षा वेगळं असू शकतं. म्हणूनच लैंगिकतेची एक सरळ, साधी सोपी व्याख्या करणं अवघडच आहे. त्यामध्ये वैविध्य असायला पाहिजे आणि वेगळेपणाबद्दलचा आदर देखील.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.