लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे

2,911

साभार – डॉ. मोहन देस, पालकनीती (सप्टेंबर-ऑक्टोबर 2009)

लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय…
लैंगिकता म्हणजे काय हे समजण्यासाठी लैंगिकतेबद्दल शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण लैंगिकता शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय हा प्रश्न राहतोच. डॉ. मोहन देशपांडे यांनी त्यांचे हे काही विचार मांडले आहेत. लैंगिकता शिक्षणाची विभागणी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये केली गेली आहे… त्याविषयी

1) प्रजनन विज्ञानात्मक भाग
यामधे प्रामुख्यानं प्रजनन व त्या संदर्भातील वैज्ञानिक तथ्ये सांगितली जातात. प्रजननाविषयीची संपूर्ण वैज्ञानिक माहिती, पौगंडावस्था, हार्मोन्स, शारीर-मानसिक बदल, आरोग्य, मासिक पाळी, स्वच्छता, एच्.आय्.व्ही. लिंग सांसर्गिक आजार इत्यादि विषय यात येतात. या भागामधे अर्थातच मुख्यत… वैद्यकीय माहितीवर भर दिला जातो. एकूण लैंगिक शिक्षणातून या भागाला अगदी वेचून वेगळं काढण्याची परंपरा तशी जुनी आहे. (काही तज्ज्ञांच्या मते फार पूर्वी भारतीय संस्कृतीमधे दिलं जाणारं लैंगिकता शिक्षण अनेकस्पर्शी होतं आणि ते मोकळेपणानं दिलं जायचं. त्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या विज्ञानाचा भागही असायचा) बहुधा अलीकडे विज्ञानाचं श्रेष्ठत्व जेव्हा सिद्ध होऊ लागलं तेव्हा याचं वेगळेपणही सिद्ध झालं असावं. पण हा भाग वेगळा करून पाहण्याची आणखीही एक रीत म. गांधींनी सांगितली होती. त्यांनी केवळ प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवण्याची शिफारस केली होती. बाकीच्या वेळी ब्रह्मचर्याचा अवलंब करावा असं सांगितलं. एका अर्थानं लैंगिकतेला संपूर्णत नाकारण्याचीच ही भूमिका आहे.

2) मनोरंजनात्मक भाग
याला काही लोक शरीररंजन असंही म्हणतात. पण फक्त शरीराचं रंजन कसं होणार? यासाठी मनाचीही नितांत गरज असते. याचं स्वरूप मुख्यत… रंजनात्मक, स्वप्नाळू आणि अनेकदा सवंग (Titillating) असतं. लैंगिकतेच्या एकूणच मानुष संवादाच्या अभावामुळे या क्षेत्राची विशेष चलती आहे. रंजनच करायचं (आणि टी.आर.पी. वाढवायचा !) म्हटल्यावर प्रचलित रूढ विचारांना धक्का देणं, मुळातून विचार करायला लावणं मूलभूत प्रश्र्न विचारणं वगैरे गोष्टी या क्षेत्राला सहसा परवडत नाहीत. म्हणून या भागामधे पुरुषप्रधानता, पुरुषी आक्रमकता, लैंगिक हिंसा, बाईचं उपभोग्य स्थान, प्रचलित स्त्री-पुरुष देहाच्या सौंदर्य कल्पना, सौंदर्य स्पर्धा, पूर्वापार चालत आलेले लैंगिकतेचे भीषण आविष्कार, स्वामित्व, मालकी हक्क, लैंगिक व्यवहारातील “व्यापारी’ वृत्तीचा सहज स्वीकार, व्यसनांचा व व्यसनांमुळे “वाढणाऱ्या’ लैंगिक शक्तीचा पुरस्कार, लैंगिक टॉनिक्सचा प्रचार, स्त्रीच्या लैंगिक आविष्कारांचे दमन किंवा छचोरच दर्शन यांची रेलचेल असते. उपभोग हा या रंजनाचा गाभा असतो. आपल्याला हवं ते लैंगिक समाधान आणि हवं तितकं प्रेमदेखील विकत मिळू शकतं, ते तसं नाही मिळालं, तर थोडंफार दमन करून जबरदस्ती करून मिळवता येतं अशी अंधश्रद्धा या क्षेत्रानं पसरवली आहे. पण हे एकच “शिक्षण क्षेत्र’ असं आहे की जिथं संवादी वातावरण निर्माण होतं (किंवा तसा भास तरी नक्की होतो) मुलामुलींना हे क्षेत्र अतिशय आकर्षक वाटतं. प्रौढांनाही हे क्षेत्र अतिशय आकर्षित करत असतं.

3) सृजनात्मक भाग
सृजनशील माणसाचं मन कुमारवयीन मनासारखं असतं असं सार्थपणे म्हटलं जातं. एका अर्थानं खरे कलावंत, साहित्यिक, वैज्ञानिक, संशोधक त्यांच्या कुमारवयाच्या बाहेर आयुष्यभर येतच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. प्रचंड अस्वस्थता, ऊर्जा, स्वप्निल जगणं, वास्तवाचं नीटसं भान नसणं, व्यवहार नीट न सांभाळणं, (काही वेळा ही मंडळी नको तेवढा पै-पैचा हिशेबही करतात) एकलकोंडेपणा, उसळणारा उत्साह, अहंकार (पण कधी नको एवढे नम्र), भविष्यवेधी, बंडखोर, धाडसी, लॅटरल थिंकिंग (जगावेगळा विचार) करणारी, अति प्रेमळ, डोळ्यात सतत कारणाशिवायही अश्रू असणारी अशी असतात. आत्म-पीडन ही देखील त्यांची वृत्ती असू शकते. समाजात मान्य असलेल्या अनेक गोष्टी/विचार यांना मान्य नसतात. यांची लैंगिक अवस्थाही अनेकदा पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांसारखीच असते. संयम, विवेक, बंधने नको असतात.
काही कलावंतांना तर कला-निर्मितीच्या वेळी लैंगिक पूर्ततेचा (ऑरगॅझमचा) अनुभव येतो ! अनेक कुमारवयीन मुलं अतिशय सृजनशील असतात. परंतु अनेकांची सृजनशीलता वयात येण्याआधीच मारून टाकली जाते. पौगंडावस्थेतील लैंगिकतेचा व सृजनात्मकतेचा इतका जवळचा संबंध असतो हे अनेकदा आपण विसरून जातो !

4) अध्यात्माचा भाग
सर्वसाधारणपणे अध्यात्म आणि लैंगिकता यांचं फार सख्य नाही असं मानलं जातं. लैंगिकतेच्या अैहिकतेला प्रखर विरोध हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य मानलं जातं. परंतु मधुराभक्ती (मीराबाई) आणि आधुनिक काळातले “ओशो’ (रजनीश) यांनी स्त्री-पुरुष नात्याचं विविधरंगी उत्कट दर्शन आपल्याला दिलं आहे. राधा- कृष्णाचं नातंही असंच रंगवून सांगण्याचा विषय आपल्या कवींनी, लेखकांनी मानला. उर्दू गझलमधलं काव्य तितकंच उत्कट आहे, गझलमधे अनेकदा देवाला प्रेयसीचं रूप देऊन काव्यनिर्मिती केलेली दिसते. या साऱ्या कलावंतांनी, संतांनी नात्याचं हे सौंदर्य खरोखरच पाहिलं असेल, अनुभवलंही असेल. पण ते मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी त्यांना अध्यात्माचा आधार घ्यावा लागला की काय असं वाटतं. वास्तवात खरोखर उतरू शकणाऱ्या नातेसंबंधातल्या अतीव उत्कट सौंदर्याचा, सखोल अनुभवाचा आणि त्यातून मिळू शकणाऱ्या “समाधी’चा आणि प्रचंड स्व-भानाचा थांग नीट लागत नाही म्हणूनही कदाचित आध्यात्मिकतेमधे तो शोधावा लागला, असंही असेल. हा विषय तसा जटिल आहे आणि यातून वादही निर्माण होऊ शकतात. परंतु यातला अतिशय हृद्य, मानुष आणि सृजनात्मक गाभा आपल्या लैंगिकता संवादामधे निश्र्चित उपयोगी पडू शकतो, एवढं मात्र इथं नमूद करावंसं वाटतं.

5) नातेसंबंधांचा भाग
लैंगिकता म्हणजे एक अनेक पदरी नातं असतं आणि हे पदर सूक्ष्म असतात. त्यामुळे यात नातेसंबंधाचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जायला हवा. पण सध्याच्या लैंगिक शिक्षणामधे नातेसंबंधांबद्दल नीटसं, सविस्तर आणि सगळं बोललंच जात नाही. खरं तर लैंगिकता संवादाची बैठक (मांड ! आणि मांडामांडही) या भागावर असायला हवी. लैंगिकतेचं नातं अधिक संवादी व्हायला हवं असेल तर आत्ताच्या लैंगिकतेच्या नात्यांचा मागोवा घ्यायला हवा. हे नातं स्वत…शी देखील असतं. स्वप्रतिमेशी असतं. दुसऱ्याशी असतं. दुसऱ्याच्या प्रतिमेशीही असतं. परंतु आज पारंपरिक पुरुषकेंद्री, लिंगभाव संवेदनशील नसलेली नातीच मुलांसमोर येत राहतात. ही नाती उथळ, खोट्या प्रतिमा जपणारी, केवळ उपभोग हे मूल्य असणारीच ठळकपणे पुढे येतात.
देह-मनावरचा मालकी हक्क ¸ सांगणारी, कधी कधी फसवणूक, अत्याचार आणि असमानतेचं आणि शोषणाचं मूल्य सहज पोटात घेणारी नाती पाहत पाहतच आपली मुलं मोठी होतात. या नात्यांबद्दलचं शिक्षण मुद्दामून वेगळं द्यावं लागत नाही. ती नाती मुलामुलींच्या समोर इतक्या प्रत्ययकारी रीतीनं येत राहतात की ती शिकण्यासाठी वेगळे धडे, पुस्तकं लिहावी लागत नाहीत. शिक्षणाचे सर्वच प्रांत हे शिक्षण सहजपणे आणि न कळत मुलांना देत असतात. प्रचलित नातेसंबंधांकडे डोळसपणानं पाहता यायला हवं. त्यातल्या त्रुटी, उणिवा काढून टाकायच्या असतील आणि भीषण चुका टाळायच्या असतील तर त्याबद्दल सविस्तर बोलणं झालं पाहिजे.

असा संवाद झाला तर मुलांच्या पुढच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुकर होतील. असं झालं तर स्वत…शी, स्व-शरीराशी, स्वप्रतिमेशी एक सुसंवादी नातं तयार होऊ शकेल. स्त्री- पुरुषांचं किंबहुना कोणाही दोन व्यक्तीचं नातं (लैंगिक नातंही) सन्मानावर आधारलेलं असेल. मैत्री, आकर्षण, प्रेम (आणि मोह) यांचं मानवी स्वरूप अनुभवता येईल (आज यात कमालीची भेसळ झालेली दिसते, ही नाती व्यापारीकरणाकडे झुकलेली दिसतात). मानवी देह-मनाच्या सौंदर्याची नवी परिमाणं रुजतील. ही परिमाणं अधिक सुंदर असतील. यातलं एक परिमाण विविधता हे असेल. ही परिमाणं आंतरिक सौंदर्याला अधिक देखणेपण देणारी असतील. यात स्पर्धा, मापं, तुलना, न्यूनगंड असणार नाही. फसवणूक, अत्याचार, शोषण इत्यादीबद्दल तीव्र तिरस्कार निर्माण होऊ शकेल. परस्पर आधाराचं नवं मूल्य रुजेल. मनोरंजनाच्या क्षेत्रामधे प्रसारित केल्या जाणाऱ्या, किंवा अधिक दृढमूल केल्या जाणाऱ्या विपरीत मूल्यांशी संघर्ष कसा करावा हे उमजेल. निर्णयक्षमता अधिक डोळस होईल. “नाही’ कुठे आणि कसं म्हणावं हे समजेल. लैंगिकतेकडे आजारासारखं पाहणं थांबेल. एच्.आय्.व्ही./एड्सच्या विरोधात नेमकं काय करायचं हे कळेल. सृजनात्मक नात्याच्या आधारानं एकमेकांना सर्वांगानं फुलवणारं, सतत विकास पावणारं, स्पर्धाविरहित संवादी नातं खरोखरच प्रस्थापित होऊ शकतं असा विश्र्वास निर्माण होईल, आणि त्यासाठी कोणते प्रयत्न कसे करायला हवेत हेही उमजेल.

(संपादित)

Comments are closed.