तोडूया साचेबध्द प्रतिमा – “की अँड का” च्या निमित्ताने – निहार सप्रे

“स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते – द सेकंड सेक्स, सिमोन द बोव्हुआर

सिमोन द बोव्हुआर यांच्या या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलाय जो आपल्याला एका क्षणात लिंगभाव व्यवस्थेमागील चाणाक्ष राजकारण दाखवतो. कोणत्याही व्यक्तीचे लिंग जैविकदृष्ट्या स्त्रीचे असले तरी ती व्यक्ती समाजव्यवस्थेमध्ये जशा पद्धतीने वाढवली जाते, त्यातून त्या व्यक्तीचा लिंगभाव ठरतो. ‘स्त्री’नं कोणती कामं करावीत, तिचे फक्त समाजातीलच नव्हे तर तिच्या स्वतःच्या घरातील स्थान काय असावे, या शक्तिशाली पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये तिची “जागा” काय असावी हे सर्व तिचे लिंग नाही तर “समाज तिला कशा पद्धतीने घडवतो” यावर ठरतं आणि त्यातूनच निर्माण होते लिंगाधारित समाजव्यवस्था आणि कामाची विभागणी.

जगातील बहुतांश समाजांमध्ये लिंगाधारित कामाची विभागणी दिसून येते. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ती जास्त दिसून येते त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्या संपूर्ण समाजाची भिस्त उभी आहे ती एका शक्तिशाली पुरुषसत्ताक व्यवस्थेवर. ‘पुरुषसत्ताक व्यवस्था’ आपल्या समाजरचनेचा ताकदवर पाया आहे आणि त्यामुळं आपल्या समाजात लिंगाधारित कामाची विभागणी मोठ्या प्रमाणात असणं हेदेखील ओघानं येतंच. लिंगाधारित कामाच्या विभागणीचा आणखी एक साईडइफेक्ट म्हणजे आपल्या मनात तयार होणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या साचेबध्द प्रतिमा आणि त्या प्रतिमांना आपल्या मनात खोलवर रुजायला वाव मिळतो, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला अशा साचेबध्द प्रतिमांबद्दल जणू शिक्षणच दिलं जातं असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, आजही जेव्हा कॉलेजवयीन तरुण मुला-मुलींशी बोलताना त्यांना प्रश्न विचारला जातो की, “मुलगा म्हणजे काय आणि मुलगी म्हणजे काय?” मुलगा म्हणजे न रडणारा आणि मुलगी म्हणजे सतत रडणारी… मुलगा म्हणजे घरी कमावून आणणारा आणि मुलगी म्हणजे घर सांभाळणारी, घराला घरपण देणारी… मुलगा म्हणजे ताकदवर आणि मुलगी म्हणजे नाजूक… नटणारी… मुलगा म्हणजे पालकांचं, आपल्या बहिण भावाचं रक्षण करणारा, कठोर व्यक्ती आणि मुलगी म्हणजे हळव्या मनाची, सुरवातीला पालकांचा, बहीण भावांचा मानसिक आधार आणि नंतर आपल्या पतीचा किंवा त्याच्या पालकांचा मानसिक आधार ठरणारी… मुलगा म्हणजे नटवेगिरी नं करणारा आणि मुलगी म्हणजे नटवी…

या सर्व साचेबध्द प्रतिमा मुळात समाजातून, समाजाच्या मूल्यांमधून आल्या असल्या तरी त्यांना खतपाणी घालण्याचं महत्वाचं काम करतो तो मिडीया. चित्रपट किंवा जाहिरातींमधून दाखवल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रतिमा आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात. कारण त्या खूप प्रभावी पद्धतीने, पटतील अशा मांडलेल्या असतात. त्यामुळे अशा साचेबध्द प्रतिमा आणखी घट्ट करण्यासाठी जसा मिडिया कारणीभूत ठरतो, तसा या प्रतिमा तोडण्यासाठीदेखील मिडिया खूप मोलाची कामगिरी करू शकतो.

काही महिन्यांपूर्वी आलेला आर. बल्की यांचा ‘की अँड का’ हा चित्रपटदेखील अशाच साचेबध्द प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न करणारा हा सिनेमा आहे. चित्रपट तसा ठीकच आहे किंवा चित्रपटात लक्षात राहील असा एकही प्रभावी सीन नाही, परंतु संकल्पनेच्या पातळीवर हा चित्रपट नक्कीच वेगळ्या पठडीत मोडणारा चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही.

चित्रपटाची कथा आहे एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या, महत्वाकांक्षी ‘किया’ (करीना कपूर) आणि एका मोठ्या बिल्डरचा, काहीही काम न करणारा, बिलकुल महत्वाकांक्षी नसणारा एकुलता एक मुलगा, ‘कबीर’ (अर्जुन कपूर) यांची. दोघांची भेट विमानात आणि एका विचित्र परिस्थितीत होते, नंतर मैत्री होते आणि नंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण या सर्व प्रोसेसमधून कबीर आणि किया जात असताना त्या दोघांच्या माध्यमातून एक प्रेक्षक म्हणून आपल्या लक्षात येतं की, कबीर हा इतर मुलांसारखा टिपिकल “पुरुष” नाही तर वेगळाच विचार करणारा, अत्यंत संवेदनशील असा मुलगा आहे. तो कियापेक्षा लहान आहे, त्याची आयुष्यात कोणतीही अॅम्बिशन नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला “हाऊसहजबंड” व्हायचं आहे आणि या निर्णयामागं ‘त्याला काही जमत नाही’ हे कारण नसून तो त्याचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे कबीरनुसार त्याची आई नुसती हाउसवाईफ नव्हती तर ती एक आर्टिस्ट होती, ती घरी बसून काहीच न करता तिच्या नवऱ्याने कमावलेले पैसे उडवत नव्हती तर तिने तिच्या जीवाचे रान करून, कष्ट करून त्याचे घर बनवले, सजवले आणि त्यामुळे ती कार्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या, पैसे कमावून घरी आणणाऱ्या कोणापेक्षाही कमी नव्हती तर त्यापेक्षाही वरचढ, एक चांगली कलाकार, एक चांगली व्यक्ती होती.

हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात कोणत्याही हाउसवाईफ बद्दल असेच बोलले जाते की हाउसवाईफ काय करतात? तर त्या घरी बसून असतात, नवऱ्याच्या कमाईवर जगतात आणि काही काम करत नाहीत. पण हे म्हणत असताना आपला समाज सोयीस्कररित्या हे विसरतो की कोणतीही हाउसवाईफ घरात बसून रहात नाही तर ती तितकेच कष्ट करते जितके तिचा नवरा करत असेल. किंबहुना ती कदाचित तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कष्ट करत असेल आणि तेही निस्वार्थीपणे, कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय. पण केवळ आर्थिक बाजू बघणाऱ्या समाजाला हे समजत नाही आणि त्यातून घरी असणाऱ्या स्त्रीला दुय्यम स्थान देण्याचं कृत्य समाजाकडून होतं. कबीर आणि किया देखील जेव्हा लग्न करायचे ठरवतात आणि कबीरच्या घरी त्याच्या वडिलांना त्यांचा निर्णय कळवण्यासाठी जातात तेव्हा अर्थातच त्याच्या वडिलांचा त्याच्या निर्णयाला विरोध होतो. त्या प्रसंगामधून देखील प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणीव होते की आपण आपल्याच समाजाने बनवलेल्या ‘साचेबध्द प्रतिमा’ आणि पुरुषसत्ताक मूल्यांच्या गाळात किती खोलवर रुतलोय. खरा मर्द असणं म्हणजे त्याला महत्वाकांक्षा हवी, त्याने त्याच्या बायकोला, कुटुंबाला पोसायला हवं, त्यांची सुरक्षा करायला हवी आणि जो पुरुष बायकोच्या कमाईवर जगतो तो षंढ! कबीरच्या वडिलांच्या अशा विचारांना ऐकून आपल्याला प्रेक्षक म्हणून समजू शकतं की त्याचे वडील एका अशा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या समाजाला एखादा ‘मुलगा’ हाऊसहजबंड असणं हे पचणं कठीणच आहे! कबीरची त्याच्या आईच्या कामाबद्दलची संवेदनशीलता दाखवणारा एक छान सीन चित्रपटाच्या सुरवातीच्या भागात आहे. एकदा बोलण्याच्या ओघात कीया कबीरला गंमतीने म्हणते, “अगर तुम अपने पिताजी जैसे सपने देखोगे तो अपने मम्मी जैसे घर पे कैसे बैठोगे?” त्यावर कबीर प्रचंड संतापतो आणि त्याची आई घरी बसून न राहता तिने कशा पद्धतीने घर उभं केलं, ती आर्टिस्ट होती आणि ते कौशल्य आपण कोणीच समजू शकत नाही कारण आपण सगळे एका जुनाट, साचेबध्द समाजाचे शिकार आहोत आणि केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणं म्हणजे सर्व काही मिळालं याबद्दल आपल्याला एक प्रकारचा गर्व आहे याबद्दल तिला खूप ओरडतो. त्याचा राग बघून, त्याची त्याच्या आईबद्दलची तिळतीळ बघून कीया देखील गडबडते, तिला आपण चुकीचं बोललो याबद्दल वाईट वाटतं आणि कबीरच्या वेगळ्या विचारांविषयी तिला आदर निर्माण होतो, ती कबीरवर खऱ्या अर्थी प्रेम करू लागते.

या सर्व घटनांनंतरदेखील जेव्हा कीया आणि कबीर लग्न करतात तेव्हा देखील कीयासारख्या मुलीला सर्वांसमोर “तिचा पती हाऊसहजबंड आहे” हे कबूल करणं कठीण जातं. पण त्यामागचं कारण समजण्यासारखं आहे. कोणत्याही समाजात आणि खासकरून आपल्या समाजात रूढार्थानं ‘सेटल’ होणं याचा अर्थ आहे काहीतरी काम करून कमावणं, आर्थिकदृष्ट्या सेटल होणं आणि घर चालवणं. त्यात समाजात पुरुषांकडून तर केवळ तीच अपेक्षा केली जाते. पण कबीर तर हाऊसहजबंड असतो आणि कीया, घरातली ‘स्त्री’ ही त्यांच्या घरातली कमावती व्यक्ती असते त्यामुळे ऑफिसमध्ये ‘माझा पती हाऊसहजबंड आहे’ हे तिने कबूल करणं म्हणजे कुठेतरी तिचा पती काहीच काम न करता, तिच्या कमाईवर घरात बसून नुसतं खातो असं समजणाऱ्या लोकांना चर्चा-चर्वण करायला, गॉसिप करायला वाव देण्यासारखं आहे. म्हणून ती ऑफिसमध्ये खोटं बोलते की, कबीर घरातून काम करतो आणि तो लेखक आहे. हे ऐकून कबीरला वाईट वाटतं. तो तिला विचारतो की तिला त्याची लाज वाटते का? कीयाला त्याचा प्रश्न ऐकून वाईट वाटतं आणि एका पार्टीमध्ये ती सर्वांसमोर कबूल करते की कबीर हाऊसहजबंड आहे आणि ते त्याला काही जमत नाही म्हणून नव्हे तर तो त्या दोघांनी स्वीकारलेला मार्ग आहे जेणेकरून ती मुक्तपणे संचार करू शकेल.

चित्रपटाच्या अंताकडे जाताना आपल्याला प्रेक्षक म्हणून हेही जाणवतं की, कोणत्याही नात्यांमध्ये तयार होणारी हेवा, स्वार्थ, दुःख, एकमेकांना गृहीत धरल्यामुळे तयार होणारे तणाव आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे मानवी भाव-भावनांचे कंगोरे आहेत आणि ते नैसर्गिक आहेत. त्या सर्वाचा आपल्या नात्यांवर परिणाम होतो, परंतु जर का आपण त्या गोष्टींकडे समजूतदारपणाने पाहिलं तर नाती केवळ टिकूनच रहात नाहीत तर आणखी फुलतात. आपण एकमेकांच्या आणखी जवळ येतो, आपल्यातलं प्रेम आणखी वाढतं.

कबीर हाऊसहजबंड आहे हे पसरल्यावर वेगवेगळ्या सामाजिक संस्था, टीव्ही चॅनल्स त्याचे विचार ऐकून घ्यायला त्याला बोलावू लागतात. त्यातून त्याची प्रसिद्धी वाढू लागते. दुसऱ्या बाजूला किया तिच्या कामात व्यस्त झालेली असते आणि कुठेतरी कबीरला सर्वार्थानं गृहीत धरू लागलेली असते (जे बहुतांश वेळा घरात असणाऱ्या गृहिणींबरोबर त्यांचे काम करणारे ‘पती’ करत असावेत!) शिवाय कबीरच्या प्रसिद्धीमुळे कीयाच्या मनात त्याच्याबद्दल जेलसी (हेवा) निर्माण होऊ लागलेली असते आणि त्यात भर पडते कीयाच्या आईच्या आजारपणाची. कोणत्यातरी कार्यक्रमासाठी कबीर बाहेरगावी गेलेला असताना कीयाची आई आजारी पडते, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. कबीरला बातमी कळल्यावर तो लगेचच परत येतो. कीयादेखील परदेशी गेलेली असते. तीही तातडीनं परत येते पण कबीरच्या आधी आणि कबीर तिच्या आईला सोडून बाहेरगावी गेला होता हे कळल्यावर ती कबीरवर खूप संतापते. तिची जेलसी, कबीरच्या प्रसिद्धीबद्दल तिला वाटणारा राग, त्याला गृहीत धरल्यामुळे त्याच्या कामाबद्दलचा तिच्या मनात निर्माण झालेला अनादर हे सर्व काही ती कबीरला उलट सुलट बोलून बाहेर काढते. तिला त्याने फसवलंय, तो स्वार्थी आहे, त्याने तिचा वापर स्वतः प्रसिध्द होण्यासाठी करून घेतला, मुळात त्याला काही करायचे नव्हते त्यामुळे त्याने तिच्याशी लग्न केले आणि हाऊसहजबंड होण्याचे नाटक करून तिच्या पैशांवर जगत राहिला असे वेडेवाकडे आरोप ती त्याच्यावर करते. हे सर्व ऐकून कबीरच्या संवेदनशील मनाला ठेच पोचते आणि तो घर सोडून निघून जातो. तेव्हा कीयाची आई, एक स्त्री… कीयाला समजावते की समाजात, नात्यांमध्ये आपण एकमेकांना जेव्हा गृहीत धरू लागतो तेव्हा गोष्टी गडबडतात आणि खासकरून तेव्हा जेव्हा एक व्यक्ती कमावती असते आणि दुसरी त्याला/तिला सपोर्ट करत असते. अशा वेळी बऱ्याचदा कमावत्या व्यक्तीला सपोर्ट करणारी व्यक्ती दिसत नाही, तो/ती, तिला/त्याला गृहीत धरू लागतात आणि जेव्हा सपोर्ट करणारी व्यक्ती थोडीशी बाहेर पडते तेव्हा कमावत्या व्यक्तीचा ईगो दुखावला जातो आणि त्या व्यक्तीमध्ये सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीबद्दल जेलसी, आपली शक्ती कमी होण्याबद्दलची भावना निर्माण होते. या भावना निर्माण होणं नैसर्गिक आहे कारण आपण माणूस आहोत परंतु त्या भावनांमधून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होईल असं बोलणं, वागणं किंवा त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होईल अशी कृती करणं चुकीचं आहे. कीयाला तिची चूक समजते आणि ती कबीरची माफी मागून त्याला परत घरी घेऊन येते.

या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. एक म्हणजे साचेबध्द प्रतिमा या आभाळातून आलेल्या नसून आपणच बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा प्रयत्नांनी आणि समजूतदारपणे वागल्यास आपण त्या प्रतिमा तोडूही शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये कोणी एकानेच समजूतदारपणे वागून चालत नाही तर दोघांनीही समजुतीने वागणे गरजेचे असते आणि त्यासाठी एकमेकांबरोबर निकोप संवाद साधण्याची, एकमेकांचा आदर करण्याची गरज असते. एकमेकांबद्दल वाटणारा हेवा, स्वार्थ, एकमेकांना गृहीत धरणं हे मानवी मनाचे कंगोरे आहेत, त्या नैसर्गिक भावना आहेत. जर आपण त्या भावनांना ढील दिली तर त्या त्रासदायक ठरू शकतात पण जर आपण त्या भावनांवर कंट्रोल ठेवला तर आपण अनंतकाळ एकत्र राहू शकतो, एकमेकांवर प्रेम करू शकतो, एकमेकांचा आदर करू शकतो आणि एका निकोप, संवेदनशील समाजाची निर्मिती करू शकतो.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. kharade suvarna says:

    the review of the movie ki and ka is good.thank you .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap