नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ म्हणजे जातीपाती, गरीब श्रीमंती अशी बंधनं न मानता मनमोकळं जगू पाहणाऱ्या एकमेकांवर उत्कट प्रेम करणाऱ्या प्रेमिकांची कथा. या चित्रपटामध्ये प्रस्थापित जातीव्यवस्था, पुरुषप्रधानता, सरंजामी व्यवस्था, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच भेदाभेद यावर आधारित समाजाचे राजकीय, जातीय, आर्थिक आणि सामाजिक वास्तव अगदी स्पष्टपणे मांडले आहे.
चित्रपटामध्ये नायिका आर्ची (अर्चना पाटील) आणि नायक परश्या (प्रशांत काळे) या नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रेमी युगुलाचं जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेलं उत्कट प्रेम, सल्या (सलीम) आणि लंगड्या (प्रदीप) यांच्यासारख्या जिगरबाज दोस्तांची त्यांना मिळालेली साथ, निरागस मैत्री, आर्ची आणि परश्या प्रेमाला कुटुंबियांची आणि एकंदरीत समाजाची प्रतिक्रिया, विरोध, तो विरोध डावलण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्यानंतर स्वतंत्र आयुष्य सुरु करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, हे सगळं या चित्रपटात मांडलं आहे.
या चित्रपटातील नायिकेच्या (आर्ची) वडीलांना (तात्यासाहेब पाटील) गावासमोर पोरीमुळे अपमानित व्हावं लागलं म्हणून त्यांचा पोरीवरचा राग, मुलानं किंवा मुलीनं प्रेम केलं म्हणून तिच्याशी आयुष्यभरासाठी संबंध तोडणं, आई आणि मुलीची ताटातूट, जातपंचायतीकडून होणारा त्रास आणि समाजानं वाळीत टाकणं, परश्याच्या बहिणीचं लग्न ठरताना येणारी अडचण, मारामारी, जाळपोळ, परश्यावर अपहरणाचा आणि बलात्काराचा केलेला आरोप, मुलगी प्रेमात पडली (तिचा पाय घसरला) म्हणून तिचं जातीतल्याच दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न लावून देणं यांसारखे प्रकार आजही समाजात होताना दिसतात. ‘तुम्हाला काय मज्जा मारायची ती मारा पण लग्न करताना मात्र आपल्या जातीतल्या मुलीशीच करा.’ असा सल्ला देतानाही काही महाभाग दिसतात. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेला जपणाऱ्या समाजातील प्रवृत्तींशी संघर्ष करताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेक जण कुटुंबियांच्या वेगवेगळ्या दबावांना बळी पडून जबरदस्तीने दुसऱ्या कोणाबरोबर तरी कुढत, घुसमटत आयुष्य काढत आहेत.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला ‘निवडीचा अधिकार’ आहे. पण समाजात आजही हा अधिकार नाकारला जातो. खोट्या प्रतिष्ठेतून होणारे अनेक खून, हल्ले आपण पाहतो. मागच्याच काही महिन्यांमध्ये अशाच भयानक घटनांविषयी आपण माध्यमांतून ऐकले. तामिळनाडूमध्ये उच्चजातीय मुलीशी लग्न केले म्हणून लग्नानंतर आठ दिवसांनी दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यात मुलाला प्राण गमवावे लागले तर मुलगी गंभीर जखमी झाली. अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई गावातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाचा उच्चजातीय मुलीवर प्रेम केले म्हणून त्या मुलासकट त्याच्या दोन मित्रांचा निर्घूण खून केला. खर्ड्यातील नितीन आगे या १७ वर्षाच्या किशोरवयीन मुलाला मारून झाडाला टांगले. अशा मन सुन्न करणाऱ्या अनेक घटना जातीय द्वेषातून होत आहेत.
आजपर्यंत बहुतांश चित्रपटांनी अबला, परावलंबी, स्वतःच्या शरीर आणि सौंदर्याच्या साच्यात अडकलेली अशी समाजाला हवी असणारी तथाकथित ‘आदर्श स्त्री’ रंगवली आहे. मात्र ‘सैराट’ चित्रपटातील नायिका आर्ची ही स्वतंत्र विचारांची आणि स्वच्छंदी असं व्यक्तिमत्व आहे. तिला पोहायला आवडते, बुलेट चालवायला आवडते, ती ट्रक्टर चालवते, बंदूक चालवते, परश्याला गुंडांच्या(?) तावडीतून सोडवते, ती अगदी मोकळेपणाने आपले प्रेम व्यक्त करते, परश्याची हिंमत वाढवते. नायिका आर्चीची भूमिका एकदम धाडसी तर नायक परश्याची भूमिका हळवा, संवेदनशील, अशी रंगवून हा चित्रपट समाजातील (आणि बहुतांश चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या) लिंगभावावर आधारित साचेबद्ध कल्पनांना तडा देताना दिसतो.
वास्तवातही अशा अनेक सशक्त, स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया आहेत आणि त्यांचे समाजामध्ये किती कोडकौतुक(!) होते हे काही वेगळे सांगायला नको. अशा धाडसी (मर्दानी??) असणाऱ्या स्त्रियांना तथाकथित समाजाने ठरवून दिलेल्या ‘आदर्श स्त्री’च्या भूमिकेत बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. ‘पोरीच्या जातीनं असं वागू नये’, ‘पायीची वाहन पायीच बरी’ अशा प्रकारचे दबाव आणून अजूनही स्त्रीचे स्वातंत्र्य आणि संधी नाकारली जाते हे समाजाचे वास्तव आहे. प्रेम व्यक्त करताना पुढाकार घेणाऱ्या स्त्रियांना वाया गेलेल्या, चारित्र्यहीन असेच समजले जाते. अशा मुली फक्त लफडं किंवा टाईमपास करण्यासाठी ठीक आहेत पण लग्नासाठी (मैरेज मटेरीअल) ठीक नसतात अशी मानसिकता समाजात आढळते.
चित्रपटात काही प्रसंगातून जातीचे वेगळेपण आणि तथाकथित प्रतिष्ठा जपण्यासाठी केले गेलेले शक्ती प्रदर्शन दाखवले आहे. आर्चीचा भाऊ प्रिन्स तलवारीने केक कापून एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच करतो, शाळेत त्याच्या शिक्षकांना मारतो तेव्हा त्याबद्दल तो काही चुकीचं करतोय असं आर्ची वगळता घरातल्या कोणालाही वाटत नाही. खरंतर प्रिन्ससारख्या माझ्या अनेक तरुण मित्रांना मी दोष देत नाही. त्यांचा राग येण्यापेक्षा मला कीव वाटते. खरं तर ते बळी आहेत पुरुषप्रधानतेचे, त्यांना जाणीवपूर्वक तसं घडवलं जातंय आणि हेच पुढं जाऊन समाजाला अधोगतीकडे नेणाऱ्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
चित्रपटाच्या उत्तरार्धात मानवी भावभावना, नाती आणि नात्याचं हळूहळू उलगडणं, खूपच वास्तववादी दाखवलं आहे. आर्चीला वाटणारा एकटेपणा, घरच्यांची आठवण येणं, परश्याला वाटणारा मत्सर, पझेसिव्हनेस, त्याचं आर्चीवर संशय घेणं, सहजीवन सुरु झाल्यानंतर एकमेकांचे गुण-दोष आणि आत्तापर्यंत न उलगडलेले पैलू समोर येणं, त्याच्याशी जुळवून घेताना करावा लागणारा संघर्ष, पणाला लागलेलं सर्वस्व आणि प्रेमाच्या बळावर या सगळ्यावर केलेली यशस्वी मात या सगळ्याची खूप चांगली सांगड घातली आहे.
प्रत्येकाला प्रेम करण्याचा, स्पप्न पाहण्याचा अधिकार आहे पण कधी कधी स्वप्नांपेक्षा वास्तव अधिक प्रभावी ठरते आणि स्वप्नांचा चोळामोळा होतो हे अगदी नेमकेपणाने या चित्रपटातून दाखवले आहे.
भारतीय प्रस्थापित सरंजामी व्यवस्थेमध्ये अजूनही मुक्तपणे प्रेम करण्याचं स्वातंत्र्य नाही. अजूनही तो गुन्हाच समजला जातो. असं प्रेम करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असंही अनेकांना वाटतं, आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम आणि विवाह आजही आपल्याकडे तितक्या सहजपणे स्वीकारले जात नाहीत हे सामाजिक वास्तव आहे. आपल्या समाजात अजूनही प्रेम हे लफडं, भानगड अशाच नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. समाजाने ठरवून दिलेल्या विशिष्ट साच्यामध्ये आणि नात्यांमध्ये राहून प्रेम करणं म्हणजेच खरं, पवित्र प्रेम आणि बाकीचं सगळं चूकीचं असा समज आपल्याला पाहायला मिळतो.
खरं तर प्रेम ही समाजाला उन्नतीकडे घेऊन जाणारी निसर्गदत्त चिरंतन भावना आहे त्यामुळे प्रेमाला जात, धर्म, आर्थिक स्तर अशी बंधनं घालणं शक्यच नाही. कुमारवयात, तारुण्याच्या उंबरठ्यावर आणि खरं तर वयाच्या कोणत्याही टप्प्यात एखाद्याविषयी प्रेम वाटणं अगदीच स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे. प्रेम करणाऱ्यांना जाळलं, मारलं, कापलं, गाडलं, बंधनं घातली, तरी अशा प्रेमकहाण्या होतंच राहणार याला इतिहास साक्ष आहे. म्हणूनच सामाजिक आणि धार्मिक नीतिमत्तेच्या नावाखाली प्रेमावर, प्रेम करणाऱ्यांवर निर्बंध लादण्यापेक्षा ते सहजेतेने स्वीकारणं हेच समाजाला उन्नतीकडे घेऊन जाण्यारं लक्षण आहे.
नोट : सैराटच्या निमित्ताने या सगळ्याचा विचार करत असताना एका मैत्रिणीची आठवण होऊन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही. जातीच्या बाहेरील मुलाशी लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला म्हणून स्वतःच्या वडिलांनी ती झोपेत असताना डोक्यात पार घालून थंडपणे खून केला आणि स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याविषयी कळवले. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेला जपणाऱ्या समाजातील प्रवृत्तीविरुद्ध लढताना आणि ‘निवडीचा अधिकार’ मिळवण्याच्या लढाईत ज्यांना प्राणाचे बलिदान द्यावे लागले अशा सर्वांना माझी सलामी !
No Responses