लैंगिक सुखास मारक घटक

मागच्या आठवड्यात आपण लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचलात. आता लैंगिक सुखास मारक असणारे घटक याविषयी जाणून घेऊ यात.

अपराधीपणा:

लैंगिक सुखात सर्वात मोठी अडचण आणणारा घटक आहे तो म्हणजे अपराधीपणा. स्वप्नरंजन असू देत किंवा एखादी लैंगिक कृती असू देत त्याच्याबद्दल जर मनात अपराधीपणाची भावना असेल, तर त्याचा लैंगिक अनुभवावर विपरीत परिणाम होतो. अपराधीपणा काही गैरसमजुतींतून येतो तर काही वेळा सांस्कृतिक नियंत्रणातून येतो. हस्तमैथुन करावासा वाटतो पण, ‘ते करण चांगलं नाही’, अशी शिकवण मिळाली तर अपराधीपणाची भावना येते. ‘आता बास! हे शेवटचं, यापुढे मी दोन महिने लिंगाला हात लावणार नाही.’ ही प्रतिज्ञा दोन दिवसांत मोडली जाते व आपण किती दुर्बल आहोत म्हणून स्वतःला कोसलं जातं. काहीजणांना स्वप्नरंजनाबद्दल अपराधीपणा वाटतो. एकजणाने मला विचारलं, “मला माझ्या एका जवळच्या नातेवाईकाबरोबर संभोग करण्याचं स्वप्नरंजन करायला आवडतं. मी वास्तवात तसा संभोग करू शकणार नाही. पण निदान मनात आणून हस्तमैथुन करून ती इच्छा काही अंशी पुरी करतो. हे चुकीचं नाही ना? म्हणजे पापबिप नाही ना?” काहींना विशिष्ट संभोग किंवा पोझिशनचा अपराधीपणा वाटतो. एकजण म्हणाला, “मला जोडीदाराबरोबर ‘डॉगी’ स्टाईलनी करायला आवडतं. अशा घाण घाण पोझिशनमध्ये मला सेक्स का करावासा वाटतो?” अशी असंख्य कारणं  आहेत, जिथे अपराधीपणा लैंगिक सुखास मारक तर ठरतोच पण त्याचबरोबर त्याचा आपल्या स्व-प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. आपली जोडीदाराकडे बघण्याची दृष्टी दूषित करतो. एखादी हवीहवीशी वाटणारी पण आपण घाण मानत असलेली गोष्ट करत असलो तर त्यामुळे स्वतःबद्दल व जोडीदाराबद्दल द्वेष उत्पन्न होतो. यातून स्वतःला शिक्षा करून प्रायश्चित्त घेण्याचे विचार येऊ लागतात. आपल्या लैंगिक गरजांना, आवडीला जोडीदार जबाबदार आहे असं मानून त्याला/तिला वाईट वागणूक देणं, मारहाण करणं अशा अनेक रूपात हा अपराधीपणा प्रकट होतो.

भीती

दुसरा महत्त्वाचा लैंगिक सुखास मारक घटक आहे तो म्हणजे भीती. भीती काही वेळा अज्ञानातून येते. जर स्त्रीला संभोगाच्या वेळी काय होणार हे माहित नसेल तर संभोगाचा अनुभव घ्यायच्या वेळी भीती वाटते. काही वेळा भीती अनुभवातून येते. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर या प्रसंगानंतर तिला आपल्या जोडीदाराबरोबर लैंगिक जवळीक साधायची भीती वाटू शकते.

काळजी

जर कौटुंबिक, व्यावसायिक काळज्या असतील तर त्याचाही प्रभाव लैंगिक अनुभवावर पडतो. लैंगिक उत्तेजना कमी होण, संभोग करताना मध्येच उत्तेजना जाणं असे परिणाम दिसू शकतात.

जर घर छोटं असेल व इतरजणं घरात राहत असतील तर घरातल्या इतरजणांना आपल्या संभोगाची जाण होईल म्हणून कोणताही आवाज न करता दडपणाखाली संभोग करावा लागतो. त्याच्यामुळे लैंगिक सुखास बाधा येते.

काही वेळा गैरसमजातून काळजी निर्माण होते व त्यामुळे लैंगिक सुखास अडचण येते. एक ताई म्हणाल्या, “मला मुखमैथुन करायला आवडतं पण मला सारखी भीती असते की त्यानं गर्भधारणा होईल.”

दु:ख व वेदना

आपल्या जवळची व्यक्ती दगावली तर काही काळ काहीजणांना लैंगिक इच्छा होत नाही, तर काहींना ते दु:ख दूर करण्यासाठी तळमळीची लैंगिक इच्छा होते व त्याचं अपराधीपण वाटतं. ‘ही जाऊन दोन महिनेसुद्धा नाही झाले तर मला लैंगिक इच्छा होऊ लागली. म्हणजे मी तिच्याशी प्रतारणा करतोय’, किंवा ‘मला ती जाण्याचं पुरेसं दु:ख झालं नाही’ अशी मनात भावना येते. याच्यामुळे पुरेशी उत्तेजना न येणं, संभोगात मध्येच उत्तेजना जाणं, इत्यादी परिणाम दिसतात.

आजार/औषधं

विविध आजार, त्यांच्यावर घेतलेले उपचार, दारू/नशा लैंगिक अनुभवावर प्रभाव पाडतात.

 संदर्भ: बिंदुमाधव खिरे लिखीत “मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख” या पुस्तकातून साभार. सदर पुस्तक रसिक साहित्यसाधना ग्रंथ प्रदर्शनशनिवार पेठमॅजीस्टीक बुक स्टोअरपुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Santosh says:

    सर मि २१ वर्शा़चा आहे मि लहानपनापासुन हसत मैथुन करत ह़ोतो आता माझी संभोग क्रिया की इच्छा राहीली नाही उपाय सांगा

    • I सोच says:

      खरंतर हस्तमैथुन आणि लैगिक इच्छा कमी होणं याचा एकमेकांशी काहीच संबंध नाही.
      हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही.
      आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
      लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
      ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
      प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap