‘कमिंग आऊट’- आपल्या लैंगिकतेचा स्वीकार आणि अभिमान

समलैंगिकता तसेच विविध लैंगिक कल हे हजारो वर्षांपासून आहेत याचे अनेक पुरावे असूनही आपल्यकडे विविध लैंगिक कल आणि ओळख स्वीकारणं अवघड जातं. स्वतःची लैंगिकता स्वीकारणं अवघड असतं. समाजानं दिलेले स्वत:बद्दलचे नकारात्मक संकेत धूडकारून स्वतःची नव्यानं ओळख करणं सोपं नसतं. स्वतःचा स्वीकार होण्यास समलिंगी आधार संस्था, आदर्श समलिंगी व्यक्तींचा आधार मिळणं अत्यंत महत्वाचं असतं. याचा आधार घेवून जेव्हा ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे स्वीकारते तेव्हा तिची स्वप्रतिमा बदलते. ती व्यक्ती हळूहळू स्वतःवर प्रेम करायला लागते. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागते. तिचं मन हळूहळू शांत व्हायला लागतं. निखळपणे समलिंगी प्रेमाचा अनुभव घेता येतो. अर्थात हे एका दिवसात होत नाही. कळत नकळत जसजसा आपल्या मनावरचा ताण कमी होतो तसे आयुष्याचे इतर रंग, पैलू समोर यायला लागतात.

स्वतःचा स्वीकार झाल्यावर आपोआपच इच्छा होते की, आपण जसे आहोत तशी उघडपणे आपली जीवनशैली जगली पाहिजे. समाजमान्यतेसाठी आपली लैंगिकता लपवून ठेवणं चुकीचं वाटतं. असं लपून राहण्याने गुदमरायला होतं आणि म्हणून मग ती समलिंगी व्यक्ती आऊट व्हायचं ठरवते. म्हणजेच अभिमानानं आपण गे समलिंगी आहोत हे जाहीर करायचं ठरवते.

हा निर्णय अर्थातच सोपा नसतो. या निर्णयानं आपलं आयुष्य कायमचं बदलणार असतं. आपण समलिंगी आहोत हे सांगितलं की घरच्यांपासून दारच्यांपर्यंत सगळे आपले शत्रू बनतील याची जाण असते. घरचे बाहेर काढतील, नातेवाईक वाळीत टाकतील याची भीती असते. कामाच्या ठिकाणी आपण समलिंगी आहोत हे कळलं की तर आपल्याला त्रास देतील याची काळजी असते. मालकाला जर कळलं की आपण समलिंगी आहोत तर आपल्याला भाड्यानं राहायला खोली कोणी देणार नाहीत, याची जाणीव असते. असं असून काहींना आपली लैंगिकता लपवायची इच्छा नसते. ते दुटप्पी आयुष्य जगण्यापेक्षा प्रामाणिकपणे आयुष्य जगणं पसंत करतात. हे धाडस कौतुकास्पद आहे.

‘कमिंग आऊट’ ला मराठीत शब्द मिळणं अवघड आहे. ढोबळ अर्थानं जी व्यक्ती स्वतःच्या समलैंगिकतेला स्वीकारते आणि अभिमानानं आजूबाजूच्या लोकांना सांगते या प्रक्रियेला कमिंग आऊट असे म्हणतात. अनेक भिन्नलिंगी व्यक्ती मला विचारतात, की ‘ तू सगळ्या लोकांना का सांगत फिरतोस की तू समलिंगी आहेस म्हणून ? आम्ही भिन्नलिंगी आहोत असे सांगत फिरतो का? तू तुझ्यापुरत ठेव ना. जगजाहीर कशाला करायचं?’ याचं उत्तर असं की भिन्नलिंगी लोक आपण भिन्नलिंगी आहोत हे बोलत नाहीत कारण आपल्या आजूबाजूला सगळे भिन्नलिंगी आहेत हेच गृहीत धरलं जातं. कायदा, धर्म, संस्कृती या सर्व गोष्टी भिन्नलिंगी जीवनशैलीचाच विचार करून बनवल्या आहेत. आपण जे आहोत ते लपवून ठेवणं म्हणजे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे ते झाकायचा प्रयत्न करणं आहे.

आऊट व्हायचं की नाही हे ठरवायला अनेक दिवस लागतात. आऊट व्हायचे परिणाम काय होतील याचा नीट विचार करावा लागतो. ‘हमसफर ट्रस्ट’ चे संचालक विवेक आनंद म्हणाले, ‘ मी समलिंगी मुला/मुलींना नेहमी सांगतो, जोवर तुम्ही लैंगिकता पूर्णपणे स्वीकारत नाही, स्वतःच शिक्षण पूर्ण करून आर्थिकदृष्ट्या पायावर उभं रहात नाही तोवर इतरांना तुमची लैंगिकता सांगायची घाई करू नका.’

जेव्हा आऊट व्हायचा निश्चय होतो तेव्हा काहीजण आपल्या जवळच्या मित्राला सांगतात. त्याची प्रतिक्रिया बघतात, पालकांना सांगायचं धाडस करायला खूप वेळ लागतो. अनेक दिवस कसं, कुठे,कधी सांगायचं याच्यावर विचार चालू असतो. भीती असते, दु:ख असतं, काळजी असते. पुढे काय होणार/ घरच्यांचं आपल्यावरच प्रेम एका क्षणात विरणार का? आणि तसं झालं तर मग घरच्यांचं प्रेम खरं होतं का?

नितीन कराणी म्हणाले, ‘’ मी समलिंगी विषयाची पुस्तकं माझ्या कपाटात ठेवली व मुददाम दार उघडं ठेवलं. आईला आज न उद्या ती दिसतील व तिला शंका येईल आणि हा विषय निघेल असं हेतू होता. तसंच झालं. आईनी पुस्तकं बघून वडिलांना सांगितलं व मग माझ्यापाशी हा विषय काढला.’’

पालकांना सांगितल्यावर बहुतेकांना धक्का बसतो. फार थोड्यांच्या घरचे समजून घेतात. घरच्यांना भीती असते की इतरांना कळल तर आपली इज्जत जाईल, काहींना याची किळस वाटते, सर्वाना दु:ख होतं. काही जणांना पालक घरातून बाहेर काढतात. आपल्याला घरच्यांनी स्वीकारावं अशी मुलाची खूप तळमळीची इच्छा असते पण जेव्हा मुलाला सर्वात जास्त आधाराची गरज असते, तेव्हाचा त्याला घरचे दूर करतात.

ज्यांच्या घरचे समजून घेतात त्यांच्या घरच्यांना काळजी पडते की याचं पुढं कसं होणार? आपल्यानंतर याच्याकडे कों बघणार? ही काळजी विशेषतः स्त्रियांबद्दल असते. एकटी स्त्री उघडपणे लेस्बियन म्हणून समाजात राहणार असेल, तर समाज तिला अनेक मार्गानं त्रास देणार ही भीती असते. आजूबाजूला   एकटया राहणाऱ्या स्त्रियांना समाज कशी वागणूक देतो हे त्यांनी आयुष्यभर पाहिलेलं असतं. गीता कुमाना म्हणाल्या, “आऊट झाल्यावर आपल्या वाटेत कायम अडचणी येणार हे माहित असतं. आऊट होवून इतकी वर्ष झाली तरी मला अजून घरच्यांनी पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. आपल्याजवळचे आपल्यापासून दूर जातील याची मनाची तयारी करावी लागते. या सर्व अडचणी असूनसुद्धा मी आऊट झाल्याची मला आजीबात खंत नाही.”

साभार : बिंदुमाधव खिरे लिखीत “मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख” या पुस्तकातून साभार. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.

 

चित्र साभार: https://polyinpictures.wordpress.com/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap