…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!

बाळाला पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसतं. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसते ती आई. या काळात बाळासाठी आईच नंबर वन असते; पण बाबानं ठरवलं तर तोही बाळाच्या या विश्वात प्रवेश करू शकतो. पण ठरवलं तर…

पप्पा म्हणजे पप्पाच नाही हो, पप्पा, डॅडी, बाबा, बॉब्ज किंवा जे काही तुमचं मूल तुम्हाला म्हणणार असेल ते- आपल्या बाळाच्या आगमनासाठी तुम्ही सज्ज झाला आहात का?

तुम्ही म्हणाल, हो हो, अर्थातच. बायकोची छान काळजी घेतोय. दरमहा नीट तपासण्या, गरज असल्यास औषधोपचार, बाळ व्यवस्थित वाढतंय ना, यावर देखरेख, बाळंतपणासाठी चांगलं हॉस्पिटल, इतकंच काय, बारशासाठी हॉल कोणता घ्यायचा हेही ठरलेलं आहे आणि मुला-मुलींची नावंही फायनल करून ठेवली आहेत. आणखी काय तयारी हवी?
अहो पप्पा, ही तयारी नाही. ही सगळी वरवरची तयारी झाली. बाळाचे पप्पा बनायला थोडी वेगळी तयारी करायला हवी. बाळाचे पप्पा बनण्याची तयारी.

पप्पा, तुमच्या बाळाला ना पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसणार नाहीये. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसणार आहे तो त्याच्या आईचा चेहरा आणि ज्यातून त्याचं भरणपोषण होतं, तो अवयव. त्याच्या  चिमुरड्या विश्वात तुम्ही असणार आहात का?

म्हणजे काय? मीही बाळाला खेळवणार. ते रडत असेल तेव्हा त्याला खुळखुळा वाजवून दाखवणार,  गाणी म्हणणार. करेक्ट, हे सगळं करायला हवंच; पण यापलीकडेही काही करायला हवं. आपल्याकडे बाळ येणार म्हटलं की त्याची सगळी तयारी बाळाच्या आईचीच होते. तिच्या चेह-यावर तेज येतं, सोनेरी झाक येते, डोळ्यांत वेगळीच तृप्ती येते.  शरीरात, मनात बाळाच्या आगमनाच्या दृष्टीनं खूप बदल होतात.  पण, बाळाच्या बाबतीत सगळी सज्जता आईचीच व्हायला हवी, असं नकळत आपल्या मनावर बिंबवलं गेल्यामुळे पप्पा काही त्या अर्थानं तयार होत नाहीत. बाळाला पहिले सहा महिने भूक लागली की आईच दूध देणार, ते आईच्या कुशीतच झोपणार? साहजिकच त्याची शी-शू, रात्री  ते जागं झालं की त्याला जोजवणं, झोपवणं हे सगळं आईच करणार, पप्पा फक्त छान सजलेल्या, तीट लावलेल्या, अंगडं-टोपडं घातलेल्या पाळण्यात किंवा आईशेजारी हातपाय नाचवत बागडत असलेल्या बाळाबरोबर दुरून खेळणार. ज्यांना लहान मुलं अंगाखांद्यावर घेण्याची सवय आहे, असे बाबा बाळाच्या मानेखाली हात सारून खांद्यावर घेणार किंवा हातांवर आडवं उचलून घेणार आणि बाळानं ट्यॉँहा केलं की आईकडे सोपवणार, त्यानं शी किंवा शू केली की त्याला आईकडे सोपवणार आणि कपडे स्वच्छ करायला धावणार. बरोबर ना?

शिवाय आपल्याकडे बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. तिथे बाळाच्या आईपेक्षा बाळाची आजी, म्हणजे आईची आई किंवा त्या वयातल्या इतर अनुभवी बायकांचा राबता असतो. बाळंतिणीच्या खोलीत बाळाचा बाबा सारखा सारखा यायला लागला, तर या बायका ‘आमच्या काळात नव्हतं बाई असं, जरा धीर नाही या तरुण पोरांना’ असं म्हणून तोंडाला पदर लावून बाहेर जातात.

आता त्यांना कोणी विचारत नाही की काकू, खरंच असं होतं, तर तुमच्या दोन मुलांमध्ये एकच वर्षाचं अंतर कसं? पण, ते एक असो. सांगायचा मुद्दा इतकाच की बाळंतिणीच्या खोलीत विविध वयोगटांमधल्या बायकांचा राबताही असतो आणि त्यांचाच वरचष्मा असतो.

पण पप्पा, जरा विचार करा. यातलं बाळाच्या आईनंच केलं पाहिजे असं नेमकं काय आहे?
खरं सांगायचं तर बाळाला दूध पाजण्यापलीकडे असं काहीच नाही, जे फक्त आईच करू शकते. तीही बाळाबरोबर असते, याची दोन कारणं असतात. एकतर गर्भारपण आणि बाळंतपणाच्या काळातली शरीराची झीज भरून काढण्यासाठी तिला विर्शांतीची गरज असते, ती तिथे पूर्ण होते. बाळाला अनियमित आणि सतत भूक लागत असते. ती भागवण्यासाठी तिला सतत सज्ज राहावं लागत असतं. तिसरं कारण हे सामाजिक सवयीतून आलेलं आहे. काय आहे ही सवय? आई अशीही सतत बाळाच्या जवळ असतेच तर बाळाचं बाकीही सगळं तिनं किंवा तिच्याभोवती असणा-या  इतर बायकांनी करायचं असतं, ही ती सवय.

तो काही नियम नाही.

शहरांमध्ये, जिथे अनेकदा नोकरीच्या निमित्ताने नवरा-बायको दोघेच असतात आणि बाळंतपणानंतर लवकर ऑफिस जॉइन करायचं असतं, कामधंद्याला लवकर सुरुवात करायची असते, तिथे बाळाच्या आईला मदत करायला मोठी माणसं, म्हणजे घरातल्या मोठय़ा बायका असतीलच, असं सांगता येत नाही. तिथे बाळाचे पप्पा आपोआपच, ‘त्यांची नसलेली’ अनेक कामं करायला लागतात. काही पप्पांनी बाळाच्या आगमनाच्या आधीपासून तयारी केलेली असते. ते बाळंतिणीच्या खोलीतल्या अन्य महिलांच्या रूष्ट नजरा झेलून, त्यांच्याशी प्रसंगी संघर्ष करून आपल्या बाळाचा ताबा मिळवतात आणि त्याला घेऊन गाणीबिणी म्हणतात, त्याला जोजवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनं शी -शू केली तर आधी आपले कपडे बदलायला न धावता बाळाचे कपडे बदलण्याचा प्रयत्न करतात. बाळ अंघोळ करून आलं की त्याला दुपट्यात गुंडाळतात. बाळं मोठी डांबरट असतात. ती हुदिनीच्या वंशातली असल्याप्रमाणे, करकचून बांधलेल्या दुपट्यातूनही हात सोडवून घेतात. पण, बाबाही विक्रमादित्याच्या वंशातला असल्याप्रमाणे हट्ट न सोडता बाळाला पुन्हा दुपटेबंद करतो.

एक वर्षाच्या आतल्या वयाच्या बाळांसाठी हे मजेशीर आक्रमण असतं. या बाळांनाही, बहुदा जेनेटिकली फक्त मम्मा एके मम्माच हवी असते या काळात. तेच त्यांचं अन्नपुरवठा केंद्र असतं आणि भुकेपलीकडे फारशा काही गरजा जाणवत नसतात. त्यात हा वेगळाच मनुष्य सारखासारखा आपल्याला का डिस्टर्ब करत असतो, का खेळवत असतो, हे त्यांना कळत नाही..

..मात्र , हा स्पर्श परका नाही, हा ‘आपला’च आहे, हेही बाळांना आपल्या उबेतून समजत असतं. त्यावेळी मम्मा नंबर वन असते आणि पप्पा नंबर टू असतो; पण बाळाच्या त्या दोन फुटांच्या विश्वात पप्पाही तेव्हाच शिरू शकतो..
..आता आपल्या बाळाच्या त्या विश्वात शिरायचं की दोन फुटांपलीकडूनच त्याच्यासाठीच्या ‘सगळ्या जबाबदा-या’ घ्यायच्या, हे पप्पा तुम्हीच ठरवायचं आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘कुटुंबवत्सल’ गृहस्थ असून, दोन मुलींचा बाबा आहे.)
mamanji@gmail.com

 

सदर लेख लोकमत – सखी या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेला आहे. सोबत मूळ लेखाचा दुवा जोडत आहोत.

http://www.lokmat.com/sakhi/father-can-enter-childs-world-he-should-first-prepare-it-how-he-make-prepare/ 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap