वेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन 

भाग २

1,002

इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे – पुरुष व स्त्री. पुरुष-स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल तर  समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या व्यक्तीवर खूप अन्याय होऊ शकतो.

इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे. – पुरुष व स्त्री. पुरुष-स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल तर  समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या व्यक्तीवर खूप अन्याय होऊ शकतो. वैशालीनं कॉलेजात प्रवेश घेताना ती कोण आहे हे तिने सांगितल्यावर त्या संस्थेत तिला प्रवेश द्यायचा का नाही यावर चर्चा झाली. एक मत होतं की तिला प्रवेश देऊ नये तर काहींचं मत होतं, की ती शिकत आहे तर आपण तिच्या प्रयत्नांना हातभार लावायला पाहिजे. आनंदाची गोष्ट ही की तिला प्रवेश मिळाला.

अशा व्यक्तींनी आपलं वेगळेपण लोकांना सांगावं का? हा मोठा प्रश्न असतो. समाजाकडून पावलोपावली आपल्याला त्रास होऊ नये म्हणून बहुतेक जण आपलं वेगळेपण लपवतात. सर्वांनाच आपलं वेगळेपण लपवणं सोपं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मित्र-मैत्रिणींना संशय येऊ शकतो. लिंग नसेल किंवा खूप लहान लिंग असेल (मायक्रोपीनस) तर पुरुष म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला मित्राच्या शेजारी मुतारीत उभं राहून लघवी करता येत नाही. मुलगी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला पाळी येत नसेल तर मैत्रिणींना संशय येऊ शकतो. वैशाली म्हणते, “मी सॅनिटरी पॅड्स पर्समध्ये ठेवते. पण तरीली मला पाळी येत नाही याचा मित्रमैत्रिणींना संशय येईल ही मला कायम भीती असते.”

सरकारी नोकरी मिळवतानाही अडचण येऊ शकते. शारीरिक तपासणी केल्यावर अशा व्यक्तीला पुरुष की स्त्री म्हणून घेणार का अशा व्यक्तींना वैद्यकीय तपासणीत बाद करणार? तसं केलं तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का? (आता या संदर्भात कायदे बदलू लागले आहेत) या सर्व सामाजिक अडचणींबरोबर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत म्हणून येणाऱ्या एकटेपणामुळे नैराश्य येऊ शकतं. आपणच असे का असा विचार मनात य्तो. स्वतःच्या वेगळेपणाबद्दल द्वेष वाटू लागतो.

लैंगिक जीवन

इंटरसेक्स व्यक्तींना जोडीदार मिळणं अवघड असतं. असं वेगळेपण असलेला जोडीदार मिळणं अवघड असतं व वेगळेपण असलेल्या जोडीदाराचा शोध कसा घ्यायचा? जिथेसमाजाच्या भीतीपोटी प्रत्येक जण आपलं वेगळेपण लपवतो, तिथे जोडीदार कसा शोधायचा?  मीना म्हणते,”माझ्यासारख्या स्त्रीला लैंगिक जोडीदार सहजासहजी मिळत नाही.”

इंटरसेक्स व्यक्तींचं लैंगिक आकर्षण कोणाबद्दल असतं? पुरुष, स्त्री का दोन्ही? जननेंद्रियांची रचना आणि लैंगिक कल यांचा कोणताही संबंध नाही. याचा अर्थ काही इंटरसेक्स व्यक्तींना पुरुषांबद्दल तर काहींना स्त्रियांबद्दल आकर्षण वाटतं, तर काहींना दोघांबद्दल.

मला विचारलं जातं की इंचरसेक्स व्यक्ती संभोग कसा करतात? याचंही फक्त एक उत्तर नाही. त्या व्यक्तीला कोणती जननेंद्रियं आहेत, ती किती विकसित आहेत, ती किती कार्यक्षम आहेत याच्यावर त्यांना कोणत्या प्रकारे संभोग करता येतो हे अवलंबून असतं.

जननेंद्रियं पूर्णपणे विकसित नसतील तर काही जणांसाठी, संभोगातून मिळणाऱ्या सुखाला मर्यादा येतात. विशिष्ट केसेसमध्ये शस्त्रक्रियेचा फायदा होऊ शकतो. उदा. काही इंटरसेक्स स्त्रियांमध्ये योनी पूर्णपणे तयार झालेली नसते. अशा वेळी जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर शस्त्रक्रिया करून योनी पूर्णपणे तयार केली जाते. याच्यामुळे या योनीत लिंगप्रवेश करून संभोग करता येतो.

पुढील लेखात – वैशालीची गोष्ट

(क्रमशः)

(इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख, ले. बिंदुमाधव खिरे, समपथिक प्रकाशन या पुस्तकातून साभार
image courtesy – pinterest.com)

Comments are closed.