आम्ही पण माणसं आहोत…

1,842

तृतीयपंथी  समाजाविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून येतात. अजूनही आपल्या समाजामध्ये लैंगिक अल्पसंख्यांना समान दर्जा मिळताना दिसत नाही.  बीड येथे झालेल्या महिला आरोग्य हक्क परिषदेमध्ये समपथिक ट्रस्टची प्रतिनिधी म्हणून पायलची मुलाखत घेण्यात आली होती. ही मुलाखत वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

प्रश्न : ‘हिजडा’ या शब्दाची स्पष्टता द्याल का?

उत्तर – ‘शरीराने पुरुष पण मनाने स्त्री’ अशा व्यक्तीला हिजडा म्हटले जाते. दुसरी-तिसरीला असल्यापासून मी मुलगा आहे की मुलगी हे मला कळायचं नाही. मला मुलींमध्ये खेळायला आवडायचं. आपण पण मुलगीच आहोत, असं वाटायचं. मग अशा व्यक्तीना सिक्स पॉकेट, हिजडा, बायल्या अशी नावं ठेवली जातात. वयात आल्यानंतर कळतं की, हा मुलगा हिजडा आहे.

प्रश्न : आपण हिजडा आहोत ही जाणीव कोणत्या वयात झाली? तेव्हा तुम्ही कसं सामोरं गेलात? आजूबाजूच्या व्यक्तींचा काय प्रतिसाद होता?

उत्तर – आपलं मूल हिजडा आहे, आपला मुलगा वयात आल्यावर बायकांसारखं वागायला लागला की, त्या आई-वडिलांना त्रास होणारच. जगात कुठल्याच आई-वडिलांना असं वाटत नसेल की, आपलं मूल हिजडा होईल. जेव्हा त्या आई-वडिलांना कळतं, की आपलं मूल थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे, तेव्हा आईचं दु:ख आईला आणि वडिलांचं दु:ख वडिलांनाच माहिती. पण हे सगळं बाजूला ठेवून, प्रत्यक्ष त्या मुलाला ‘हिजडा’ असल्याचा किती त्रास होत असेल? हा विचार करायला पाहिजे. समाजापेक्षा आई-वडिलांचा आधार हा महत्वाचा असतो. वयाच्या ८ व्या वर्षी जेव्हा मुलं मला चिडवायची, तेव्हा माझे वडील मला म्हणायचे, ही मुलं तुला का चिडवतात? मी मेकप करायचे, संध्याकाळी आवरून बसायचे, चौकामधून फिरून यायचे, तेव्हा त्यांच्या इतकं लक्षात यायचं नाही. पण जेव्हा दूसरा माणूस आपल्याकडे बघतो, तेव्हा त्यांनी काही म्हणलेलं आपल्या आई-वडिलांनी ऐकलं तर त्यांना त्रास होतो. त्या गोष्टीतून मी बाहेर पडले. जेव्हा शेजारचे मला बायल्या, सिक्स पॉकेट, छक्का म्हणायचे, तेव्हा माझ्या वडिलांनी मला मारलं होतं. ते म्हणले होते की, तू सरळच चालायचं. आता सरळ नाही तर काय वाकडं चालतो का रस्त्याने? मी सरळच चालते. चालते नाही म्हणायचं, ‘चालतो’ म्हणायचं. शेजारचे म्हणले जेवला का? आताच जेवण करून आले, हा ‘आले’ जो शब्द असतो तो मी पहिल्यापासूनच ऐकून आलेले नसते. माझ्या वडिलांनी माझं नाव ‘राहुल’ ठेवलं होतं. पण राहुल या शब्दाचा अर्थ आहे की तो पुरुष आहे. आता मी जेव्हा माझं नाव पायल म्हणते तेव्हा मला असं वाटतं की, मी हिजडा आहे. पण शेजारची बाई जेव्हा म्हणते की तुमचा राहुल असं का हो वागतो तेव्हा माझ्या आईच्या मनात असं येणारच ना की ‘बाबा तू घरात राहू नको.’ मला समाज नावं ठेवीन. समाजात या व्यक्तीला स्थान मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. बायका एकमेकांच्या कानात बोलतात, पण रस्त्याने जाणारे पुरुष किती त्रास देत असतील याचा विचार करा. हिजडा म्हणायचं, दगड मारायचे, हाय का वेळ संध्याकाळी यायला? म्हणजे काय तर हिजडा समाजाला दोन्ही दृष्टीकोनातून पाहिलं जातं. एक म्हणजे काय नटरंग चाललाय, दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी चाललं. म्हणजे शारीरिक संबंधांसाठी पण ह्यांना पुरुष लोकं जवळ करतात. अशा दोन्ही दृष्टीनं तुम्ही विचार करत असाल तर आम्हाला त्रास का? घरच्या लोकांपासून जेव्हा आधार मिळत नसेल, तेव्हा ती एकटी काय करू शकते? आपण बघतो की रस्त्यानं चाललो असलो तर गाडीवाला धडक देवून जाईल. चल संध्याकाळी खुश कर, शंभर रुपये देतो. या गोष्टी जेव्हा आई-वडिलांपर्यंत पोचतात, तेव्हा त्यांना जेवढ्या वेदना होतात तेव्हा त्याच्या दुप्पट वेदना आई-वडील आम्हाला देतात.

प्रश्न : तुमचा शाळेतला आणि मित्र-मैत्रिणींसोबतचा काय अनुभव आहे?

उत्तर : दुसरी-तिसरीपासून माझे हावभाव जरा वेगळे होते. बायकी बोलणं-चालणं होतं. काजळ लावायचं, देवबाप्पा करायचा, हळद-कुंकू लावायचं. मला जास्तकरून मैत्रिणी जवळच्या होत्या. मुला-मुलींची एकत्रच शाळा होती. मित्र नव्हते मला. कारण एखाद्या मित्राच्या बाकावर जरी बसलो तरी दुसरा त्याला म्हणायचा की तो बायल्याय, छक्का आहे, त्याच्याशेजारी कशाला बसतो? मैत्रिणी तरी समजून घ्यायच्या. शाळेतील बाईंना जरी सांगितलं, की मुलं मला असं असं चिडवतात. पण त्यांनाच कुणाला माहिती नसायचं, की हिजडा म्हणजे काय? १-१० वी पर्यंत माझा चुलत भाऊ माझ्याबरोबर होता. मुलांना हिजडा म्हणजे नक्की काय हे माहिती नसतं. मग त्याला जवळ करावं, आपल्यामध्ये घ्यावं, शिक्षणामध्ये मदत करावी ही जाणीव लांब राहते पण चिडवणं, नावं ठेवणं, त्या व्यक्तीला वारंवार त्रास देणं याच गोष्टी शाळेमध्ये घडत असतात.

प्रश्न : हिजडा हा समाज तुमच्या संपर्कात कसा आला?

उत्तर : लोकांच्या चिडवण्यामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घरच्यांनी मला हाकलून देण्याचा प्रयत्न केला होता. चुलत्यांनी मला मारलं होतं. घराच्या बाहेर पडू द्यायचे नाहीत. घरातच खायला-प्यायला देतो, पण घरातून बाहेर पडायचं नाही, असं म्हणायचे. तेव्हा मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

असंच एकदा फिरता-फिरता एक दिवस मला माझ्यासारखाच एक जण भेटला. अशा आमच्या तीन-चार मैत्रिणी होत गेल्या. जशी मावशी-काका अशी नाती आपल्या समाजात असतात, तशी हिजडा समाजात पण नाती असतात. गुरु असतो. हा गुरु केल्याशिवाय या समाजात स्थान मिळत नाही. आपल्याला आवडेल तो गुरु करायचा. गुरु आणि चेला असं म्हणतात.

तृतीयपंथी म्हणून कायद्यानं आम्हाला नागरिक म्हणून मान्यता दिलेली आहे. पण शासनाने अजून आम्हाला कामं दिलेली नाहीत. आमचं पोट भरण्यासाठी आम्ही हळदीसारख्या कार्यक्रमांमध्ये नाचायला जातो. ही लोकं दुकानात जाऊन एक-एक, दोन-दोन रुपया मिळवतात. पोट भागवायचं आणि आमचे जे नायब असतील, त्यांना वर्षाला दहा हजार रुपये काहीही करून द्यावे लागतात. आईला जशी आपला मुलगा आजारी पडल्यावर कळकळ वाटते, तशी चेल्याची गुरूला कळकळ वाटत नाही. तो मेला तरी चालेल त्याला फक्त पैसे हवे असतात. या समाजातील असे रिती-रिवाज तोडायचे असतील, तर जे तृतीयपंथी शिकलेले असतील त्यांना तरी सरकारने नोकरी दिली पाहिजे.

बसमध्ये जरी बसलो ना, तरी एखादी बाई दचकून बघते की वेगळं कुणीतरी बसलंय शेजारी. जसं स्त्री-पुरुष समाजाचे घटक आहेत, तसंच तृतीयपंथी हादेखील समाजाचा घटक म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. जेवढा स्त्री-पुरुषांना मान आहे, तेवढाच तृतीयपंथींना पण द्यायला पाहिजे. मी बी अकरावी शिकलेली आहे. आज पुण्यात लोकांना भीक मागून मी पोट भरते, तेच जर मला नोकरी मिळाली, तर मी तेही करू शकते. समपथिक मध्ये गेली चार वर्षे मी अकौंटंटच काम करते, म्हणजे खात्यामधलं काम जरी सरकारनं आम्हाला दिलं, तरी आम्ही करू शकतो. हे मला सरकारला सांगायचं आहे, म्हणून मी इथं उपस्थित राहिले.

प्रश्न : तुमच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत?

उत्तर : जेव्हा या मावशींनी सांगितलं की, मी धंदेवाली आहे. तेव्हा त्या ४-५ बायका हसल्या. ती पण एक स्त्री आहे, तरी ती स्वतःहून तुम्हाला सांगते की ती धंदेवाली आहे. हे सांगताना ती लाजली नाही. तुम्ही लाजला आणि हसला. ती स्वतः लाजली नाही. तसं हिजड्यांचं बी हाये. हिजडा बी धंदा करून खातो. ज्या हिजड्याला एखादा माणूस रस्त्यानं जाताना म्हणतो की, १०० रुपये देतो चल. याच्यामध्ये त्याची चूकीये का? तसं बायकांना बी कुणीतरी छेडछाड करू शकतं ना? धंद्यावाली बाई हाये म्हणून आपल्या घरातल्या, बहिणी, बाया नीट आहेत. जर धंद्यावाली बाई नसती तर घरातल्या बायांवर किती अत्याचार झाले असते? हे आपण त्यात समजून घ्यायला पाहिजे. तसाच आमचा पार्ट आहे. तसंच आमच्यामधी बी लोकं धंदा करत्यात. धंदा करायला कोण लावतं? आम्ही पण माणसं आहोत, माणूस म्हणून सगळ्यांनाच सारखी वागणूक मिळाली पाहिजे. 

संदर्भ: बीड येथे झालेल्या महिला आरोग्य हक्क परिषदेमध्ये समपथिकची प्रतिनिधी म्हणून पायलने मांडणी केली होती.सदर  मुलाखत महिला आरोग्य हक्क परिषदेच्या अहवालात प्रकशित केली गेली आहे.

Comments are closed.