आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया तसेच पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व स्त्रीचं पुरुषात रुपांतर करताना काय काय पर्याय असू शकतात व शस्त्रक्रियेनंतर काय? याबाबत माहिती या भागात घेणार आहोत.
एका कुशल सर्जनबरोबर व एन्डोक्रिनॉलॉजिस्टबरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात. कोणते पर्याय उपलब्ध आहेत? शस्त्रक्रिया/संप्रेरक थेरपीच्या मर्यादा, दुष्परिणाम काय आहेत हे क्लायंटला समजावलं जातं.खर्चाचे अंदाजपत्रक बनवलं जातं.
- पर्याय १: काहीजण नुसती कृत्रिम स्तन बसवतात (ब्रेस्ट इंप्लान्ट). आपल्याला पाहिजे त्या आकाराची सिलीकॉन पिशव्यांची स्तनं बसवली जातात. अशा व्यक्ती शरीरानं कंबरेवरती स्त्री व कंबरेखाली पुरुष राहतात (शी-मेल).
- पर्याय २: काहीजण वृषण आणि लिंग काढून टाकायची शस्त्रक्रिया करतात. एक लघवी बाहेर यायचं छिद्र उरतं. शरीराच्या आतील वीर्यकोष काढून टाकत नाहीत. जर वीर्यकोष तसेच ठेवले तर काही अंशी विर्यनिर्मिती चालू राहते. वीर्यकोष भरले की त्यातून वीर्य वाहन या छिद्रातून गळतं. योनी तयार करून घेतली जात नाही.
- पर्याय ३: काहीजण वरील (पर्याय २) शस्त्रक्रियेबरोबर शरीराच्या आतील वीर्यकोष काढून टाकतात. जर वीर्यकोष काढले तर वीर्यनिर्मिती बंद होते.
- पर्याय ४: काहीजण वृषण, वीर्यकोष, लिंग काढून योनी तयार करून घेतात (व्हजायनोप्लास्टी). लिंगाच्या आतील मांसल भाग काढून टाकला जातो. वृषण काढले जातात पण वृषणकोष काढून टाकले जात नाहीत. वृषणकोषाच्या व लिंगाच्या कातड्याचा वापर करून त्याची योनी बनवली जाते. वृषण काढल्यामुळे पुरुषबीज निर्मिती बंद होते. वीर्यकोष काढल्यामुळे वीर्यनिर्मिती बंद होते. ही शस्त्रक्रिया किती चांगल्या प्रकारे होते यावरून तयार केलेल्या योनीत किती संवेदनशीलता मिळते हे ठरतं.
योनीचं कातडं चिकटून योनी बंद होऊ नये यासाठी शस्त्रक्रियेनंतर योनी उघडी ठेवण्यासाठी एक उपकरण (व्हजायनल डायलेटर) वापरावं लागतं. योनीच्या आतील भागातील मेलेल्या पेशी काढण्यासाठी वेळोवेळी ‘इअर बड्स’ वापरून योनी साफ करावी लागते.
या बनवलेल्या योनीत पुरुष जोडीदार लिंग घालून संभोग करू शकतो. पुरुषाची स्त्री बनलेल्या व्यक्तीला गर्भाशय, स्त्रीबीजवाहिनी, स्त्रीबीजांड नसतात. म्हणून या स्त्रीला पाळी येत नाही व पुरुषापासून गर्भधारणा होऊ शकत नाही.
वृषण काढल्यानंतर बहुतांशी अंड्रोजेन संप्रेरक निर्मिती बंद होते. अंगावरचे केस हळूहळू कमी होतात. नंतर इलेट्रॉलिसीस करून गालावरचे उरलेले केस काढता येतात. (वृषण काढायच्या आत इलेट्रॉलिसीस केलं तर अँड्रोजेन संप्रेरक वृषणात निर्माण होत असल्यामुळे गालावर केस येत राहतात व इलेट्रॉलिसीसला खूप खर्च येतो.)
पुरुषाला स्त्री बनण्यापेक्षा, स्त्रीचं पुरुषात रुपांतर करणं जास्त अवघड असत. या प्रक्रियेत अनेक पर्याय आहेत.
- पर्याय १: काहीजणी फक्त स्तन लहान करायची शस्त्रक्रिया करतात. बाकी कोणताही बदल त्यांना नको असतो.
- पर्याय २: काहीजणी स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या व गर्भाशय काढून टाकतात पण योनी, शिस्निका तशीच ठेवतात. स्त्रीबीजांड काढली की लगेच रजोनिवृत्ती येते.
- पर्याय ३: काहीजणी स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या व गर्भाशय काढून टाकतात. मोठं व छोटं भगोष्ठ, योनीचा भाग वापरून, कंबर किंवा मांडीचं कातडं वापरून कृत्रिम लिंग आणि वृषणकोष घडवले जातात. वृषणकोषात कृत्रिम वृषण बसवले जातात.
स्त्रीपासून पुरुष झालेल्या व्यक्तीच्या शरीरात वीर्य व पुरुषबीज निर्मिती होत नाही. बसवलेल्या लिंगातून लघवी येते पण लिंगाला उत्तेजना येऊ शकत नाही. म्हणजेच तो पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या योनीत लिंग प्रवेश करून संभोग करू शकत नाही. स्त्रीपासून पुरुष बनलेल्या व्यक्तीपासून स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही.
काही सर्जन, प्रयोगाची संधी मिळते म्हणून पुरेसं कौशल्य न मिळवता या शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक असतात. जर शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर पुढे अनेक अडचणी उद्भवू शकतात. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर स्वस्तात शस्त्रक्रिया करायला तयार आहेत एवढा एकच आर्थिक निकष लावू नये. डॉक्टरांना या विषयाचा किती अनुभव आहे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
शस्त्रक्रियेनंतर, काहीजण गोळ्या/ इंजेक्शनमार्फत काही संप्रेरक घेतात. काहीजण शस्त्रक्रिया करतात पण संप्रेरकांची औषधं घेत नाहीत. या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत म्हणून, जर संप्रेरक घेणार असाल तर ही औषधं डॉक्टरांच्या (‘एन्डोक्रिनॉलॉजिस्ट’) निदर्शनाखालीच घ्यावी.
स्त्रीत रूपांतर झालेल्या व्यक्तीला काही विशिष्ट संप्रेरकांची इंजेक्शन/गोळ्या घेऊन शरीराला गोलाई येते, स्तनं वाढतात. पुरुषात रूपांतर झालेल्या व्यक्तीला काही विशिष्ट संप्रेरकांची इंजेक्शन/गोळ्या घेतल्याने स्तन बसतात, आवाज बसतो. अंगावरचे केस वाढतात. शरीराला पुरवलेले संप्रेरक शरीर हळूहळू वापरत असतं म्हणून हे संप्रेरक ठरावीक काळाने परत परत इंजेक्शन/गोळ्या मार्फत पुरावावे लागतात.
इतक्या वर्षांची तळमळीची इच्छा पुरी झाल्यावर खूप मानसिक थकवा येतो. आपल्या पूर्वीच्या आयुष्याला पूर्णविराम दिल्यामुळे काही काळ खूप नैराश्य येतं. हा पुनर्जन्म सोयीस्कर व्हावा म्हणून संवेदनशील कॉन्सेलर, घरची मंडळी, मित्र, सहकारी मंडळी या व्यक्तींना आधार देण्याची मोठी भूमिका बजावू शकतात. काहीजण आपल्या नव्या जीवनशैलीत सहज मिसळून जातात, तर काहीजणांना नव्या जीवनशैलीत रुजायला वेळ लागतो. शस्त्रक्रियेनंतर काहीजण आवाज बदलण्याचा सराव व्हॉइस थेरपिस्ट कडून करून घेतात. काहींना नव्या पद्धतीनं चालणं, बोलण्याचा प्रयत्न करावा लागतो. काहींना या बदलाला सरावण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. यानंतर हळूहळू आत्मविश्वास वाढू लागतो, मन आनंदी होतं, शांत होतं, नवीन जीवनशैलीत ती व्यक्ती पूर्णपणे एकरूप होते आणि मग ती व्यक्ती जगाचे इतर रंग अनुभवण्यास स्वतंत्र होते.
हे सगळं वाचून साहजिकच मनात प्रश्न येतो, की हे सगळं करायचा एवढा त्रास कशाला घ्यायचा? तर याचं उत्तर असं की अशा व्यक्तींनी कसं जगायचं, आयुष्य अनुभवायचं हे त्या व्यक्तीवर सोडावं. त्यांची दृष्टी आपल्याला नाही, त्यांना काय त्रास होतो हे आपण भोगलेलं नाही. त्यांना हा बदल तळमळीनं हवा असतो म्हणून एवढा त्रास सोसायची तयारी दाखवतात. आपण अशा व्यक्तींच्या भावना अनुभवल्या नाहीत. म्हणून त्या भावना, इच्छा चुकीच्या आहेत, निरर्थक आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगायचा अधिकार आहे. आपल्याकडून त्यांना जेवढा आधार देता येईल तेवढा दयावा, जेणेकरून त्यांचा प्रवास कमी खडतर होईल.
संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग. ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे विक्रीसाठी उपलब्ध)
Image Courtesy :
https://www.liveuttarpradesh.com/en/
httpswww.livescience.com39170-how-gender-reassignment-surgery-works-infographic.html
No Responses