थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर

3,685

“मी संतोष चव्हाण (संती). मी ट्रान्सजेंडर आहे. मी नेहमी पँट आणि टॉपवर असते. मी अधूनमधून क्रॉसड्रेस (साडी, पंजाबी ड्रेस) करते. मी लहान असताना मुलींमध्ये खेळायचे. मुलांबरोबर खेळताना मला दडपण यायचं. मुलींमध्ये खेळताना खूप मजा यायची व मी मनमोकळेपणे त्यांच्याबरोबर खेळायचे. वयात आल्यावर साधारणत: इयत्ता सहावी- सातवीत असेन त्यावेळी मला शारीरिकदृष्ट्या व लैंगिकदृष्ट्या मुलगेच आवडू लागले. एखादा सुंदर मुलगा मला मोहून टाकायचा. ज्या मुलींमध्ये मी खेळायचे त्या मुलींनाही मुलंच आवडायची. मुलांना मुली आवडायच्या. पण मलाही मुलंच आवडायची. ही बाब भीतीमुळे कुणाशीही बोलले नाही. मी नववी-दहावीत असताना अधूनमधून माझ्या तोंडून बायकी शब्द येऊ लागले. शाळेत मुलं मला चिडवू लागली. याचा माझ्या अभ्यासावर परिणाम झाला. माझं मन शाळेत रमेना. मी शाळा सोडून दिली.”

ही गोष्ट आहे एका ट्रान्सजेंडरची. ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात.

बहुतेक वेळा मुलगा मोठा होताना त्याला आपण मुलगा आहोत असं वाटतं व त्याच नजरेनं तो जगाकडे बघतो. तसंच बहुतेक मुलींची वाढ होताना त्यांना आपण मुलगी आहोत असं वाटतं व त्या मुलीच्या नजरेनं जगाकडे बघतात, जग अनुभवतात. काहींच्या बाबतीत मात्र असं नसतं. काही मुलांना लहानाचं मोठं होताना सातत्यानं वाटतं की ते मुलगी आहेत. याचा अर्थ असा, की काही मुलांची नैसर्गिक घडण अशी होते की त्यांचं शरीर मुलांचं असतं (लिंग, वृषण इ.).  पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलीची असते. म्हणजेच ते जग मुलीच्या दृष्टीने बघतात व अनुभवतात.

या गटातील पुरुष शरीरानं पुरुष असतो. म्हणजे त्याला लिंग व वृषण असतात. वयात आल्यावर लैंगिक इच्छा झाली, की लिंगाला उत्तेजना येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो इतर पुरुषांसारखा असतो पण मानसिकदृष्ट्या त्याचं भावविश्व ‘स्त्री’ सारखं असतं.

काहींना मुलींसारखा पेहराव आवडतो. काहींचं चालणंबोलणं बायकी असतं. पण हे सर्वांच्याच बाबतीत खरं असतं असं नाही. याला अपवादही असतात. म्हणून ‘स्टीरिओटाईप’ म्हणून मानला जाऊ नये. साहजिकच हे अपवाद आपल्या सहजपणे नजरेस येत नाहीत. माझी एक मैत्रीण जन्मानं मुलगा होती. आता लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून ती स्त्री बनली आहे. शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याच्या शारीरिक ठेवणीवरून, पेहराव, आवाज, वागणुकीवरून त्याचा लिंगभाव ‘स्त्री’ चा आहे असं कोणीच ओळखलं नसतं. शर्ट-पँटमध्ये असायचा. त्याच्या बोलण्यात, वागण्यात तो स्वतःला ‘स्त्री’ मानतो हे कळायला कोणतीही बाह्य लक्षणं नव्हती. त्यांनी जेव्हा त्याचा लिंगभाव माझ्यापाशी व्यक्त केला तेव्हा मला कळलं, नाहीतर मला कळायला काहीही मार्ग नव्हता.

असं वेगळेपण काही मुलींमध्येही दिसतं. एखादी मुलगी लहानाची मोठी होताना स्वतःला मुलगा समजायला लागते. याचा अर्थ असा की काही मुलींची नैसर्गिक घडण अशी होते, की शरीर मुलीचं असतं पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलाची असते. म्हणजे ती जग मुलाच्या दृष्टीनं बघते व अनुभवते.

ट्रान्सजेंडर स्त्रिया शरीरानं स्त्री असतात. म्हणजे त्यांना भगोष्ठ, शिश्निका, योनी, गर्भाशय, स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या हे सर्व अवयव असतात. हे सर्व अवयव कार्यशील असतात. वयात आल्यावर अशा स्त्रियांना पाळी येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्या इतर स्त्रियांसारख्या असतात पण मानसिकदृष्ट्या मात्र त्यांचं भावविश्व पुरुषासारखं असतं.

काहींना मुलांसारखा पेहराव आवडतो, पुरुषी खेळ खेळायला आवडतात इत्यादी. याबाबतीतही दिसण्यावर काही नसतं. काही मुली दिसायला अत्यंत नाजूक असतात आणि दिसण्यावरून त्या स्वतःला पुरुष मानतात हे कळायला काहीही मार्ग नसतो.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही. मुलांना/मुलींना तुम्ही लहानपणी कसं वाढवता येतात यावरून तो शिकला जात नाही. उदा. लहानपणी मुलाला मुलीचे कपडे घातले, की त्यामुळे त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तसंच कुणाचं अनुकरण करूनही तो बदलत नाही. उदा. एखादा मुलगा मुलींमध्ये वाढला तर त्या मुलाचं चालणं, बोलणं बायकी होऊ शकतं. पण म्हणून त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तो स्वतःला मुलगी समजायला लागत नाही. म्हणजेच लिंगभाव हा शिकून येत नाही. तो पोहऱ्यात यायला आडात असावा लागतो. मारहाण करून किंवा कोणत्याही उपायांनी लिंगभाव बदलता येत नाही. जो लिंगभाव आहे तो स्वीकारणं हेच सर्वांच्या हिताचं असतं.

मला काही ट्रान्सजेंडर व्यक्तींचे पालक विचारतात. “या मुलाला वाढवताना आमचं काही चुकलं का? म्हणून आमच्या मुलाला मुलीसारखं वाटतं?” त्यांना सारखं वाटत राहतं, की आपण मुलाला वाढवताना कुठेतरी कमी पडलो, म्हणून मुल ट्रान्सजेंडर झालं. पालकांनी स्वतःला कोसायचं काहीही कारण नाही. कोणाचाच लिंगभाव शिकवून घडवता येत नाही.

सावधान

बहुतेक लहान मुलं भातुकली खेळतात, साडी नेसतात, लिपस्टिक लावतात. याचा अर्थ त्याचा लिंगभाव मुलीचा आहे असं अजिबात समजू नये. गंमत म्हणून, कुतुहलापोटी मुलं/मुली हे सगळे खेळ खेळतात आणि त्याच्यात जास्त काही शेधण्याचा प्रयास केला जाऊ नये. तसंच काही मुलींना मोठ्या होतांना, समाजात स्त्रियांना कनिष्ठ स्थान असल्यामुळे, ‘मी मुलगा का झाले नाही’ असं वाटतं. तारुण्यात काहीजणी पुरुषी पेहराव करणं, केस कमी ठेवणं अशा गोष्टी करतात. अनेकांसाठी ही एक ‘पासिंग फेज’ असते, तर काहींमध्ये या पेहरावातून मुलांना असलेल्या संधी, स्वातंत्र्य उपभोगायची इच्छा व्यक्त होते. याचा त्यांच्या दिसण्यावरून त्यांचा लिंगभाव पुरुषाचा आहे हा तर्क काढणं चुकीचं होईल.

समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. तर काही व्यक्ती यापुढे जाऊन लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS) करुन घेतात. पण ही शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी अनेक टप्पे पार करावे लागतात. त्याबाबत जाणून घेवुयात पुढच्या भागात.

संदर्भ:

  • पुरुष उवाच-तरुणाईच्या डोक्याला खुराक- दिवाळी अंक २०१३ मधील बिंदुमाधव खिरे लिखित ‘तसा मी… तसा मी…’ या लेखातील काही भाग.
  • ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.

थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया

थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म

 

 

 

Comments are closed.