धावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’!

तेवीस वर्षांपूर्वी, तिच्या जन्माच्या वेळी देशातल्या बहुतेक गावांसारखं तिचं गावही हलाखीत दिवस ढकलत होतं. पूर्व ओडिसातलं चाका गोपालपूर हे जेमतेम सहाशेच्या वस्तीचं विणकरांचं गाव. घरोघरच्या हातमागावरच्या कामावर बहुतेक संसार चालत होते. गावोगावच्या हस्तकलांचं रोमॅन्टिक कौतुक करण्याचे दिवस संपले होते. जागतिक बाजार केव्हाचा आक्रमकपणे वेशीवर पोचला होता. तिच्या जन्माच्या वेळी घरात पुरेसे तांदूळ नव्हते. चांद कुटुंबातल्या घरातल्या या तिसऱ्या मुलीचा जन्म कुटुंबासाठी भविष्याची कसलीच आशा घेऊन आला नव्हता. छोट्या दुतीसकट तिच्या घराला, गावाला उद्याच्या सुसाट वादळाची कोणतीही खबर नव्हती.
ही गोष्ट दुती चांदची आहे तशी तिच्या गावाचीही आहे. प्रसिद्ध खेळाडूंवरच्या कोणत्याही सिनेमात शोभून दिसेल अशी ही गोष्ट आहे खरी, पण या सिनेमाचा क्लायमॅक्स आणि ॲन्टिक्लायमॅक्स पाहायचं धाडस आपल्याला करता येणं फारच अवघड आहे.

दुतीला सहा बहिणी आणि एक भाऊ. वडील चक्रधर आणि आई आखुजी. तिची सर्वात मोठी बहीण सरस्वती. शाळेत असताना खेळांमध्ये सरस्वती चमकू लागली. खेळात चांगली कामगिरी करणाऱ्यांना सरकारी नोकरी मिळते, हे ठाऊक असल्याने तिला खेळण्यासाठी पाठिंबा मिळत गेला आणि थोड्याच काळात ती राष्ट्रीय खेळाडू झाली. सरस्वतीनेच आपल्या पाठोपाठ छोट्या दुतीला पहिल्यांदा धावपट्टीवर आणलं. अगदी पाच सहा वर्षांची असल्यापासून दुती रोज पळण्याचा सराव करू लागली. पळण्याचे बूट दूरच राहिले, दुतीकडे तर धड चपलाही नव्हत्या. गावातल्या नदीकाठच्या कच्च्या रस्त्यावर अनवाणी पायांनी धावत दुती स्वतःच स्वतःचं ‘ट्रेनिंग’ करू लागली. सरस्वतीताई आणि आईच्या प्रोत्साहनाचं इंधन घेऊन दुतीचं इंजिन वेगात पळू लागलं. दुती पळू लागली आणि सरस्वती पोलिसात भरती झाली.

दुतीही तिच्या ताईच्या मार्गाने सरळ धावत निघाली होती. मात्र शाळेच्या वयात राष्ट्रीय पातळीवरची खेळाडू म्हणून पळता पळता ती रेकॉर्डच्या इतक्या जवळ पोचली की तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जाणकार तिची तुलना प्रसिद्ध धावपटू पी टी उषा यांच्यासोबत करू लागले. ज्युुनियर नॅशनल, सिनियर नॅशनल… सगळीकडे पदकं पटकावत १०० मीटर पळण्याच्या शर्यतीत दुती देशातली सगळ्यात वेगवान खेळाडू ठरली. मग काय, आंतरराष्ट्रीय धावपट्टी तिला बोलावू लागली. २०१३च्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक पटकावलं. त्याच वर्षी वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपच्या १०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीपर्यंत पोचणारी दुती ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. चाका गोपालपूरचं नाव पहिल्यांदाच जगाच्या नकाशावर उमटलं. गावानं आपल्या या लाडक्या लेकीचं सन्मानाने स्वागत केलं.

दुतीच्या पळण्याचा आलेख वेगाने उंच चढत होता आणि तितक्यात २०१४ हे वर्ष तिच्या लहानशा आयुष्यात फार मोठ्या उलथापालथी घेऊन आलं. त्यावर्षीच्या एशियन ज्युुनियर ॲथलेक्टिक्स चॅम्पियनशिपच्या शर्यतीत तिने दोन सुवर्णपदकं पटकावली. आता स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेची ती आतुरतेने वाट पाहत होती. सगळी तयारी करून तिचे कोच एन रमेश लंडनला पोचले आणि अचानक त्यांना तिथे दुतीचा फोन आला. तिला स्पर्धेतून काढून टाकण्यात आलंय, हे सांगण्याचा ती कसनुसा प्रयत्न करत होती. नेहमीप्रमाणे स्पर्धेआधी दुतीला वैद्यकीय चाचण्यांसाठी नेण्यात आलं. मात्र यावेळी पहिल्यांदाच चाचण्यांसाठी तिचं रक्त घेण्यात आलं. डॉक्टरांनी काही निरीक्षणं केली आणि दुती परत गेली. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स पाहून दुती अवाक झाली. दुती ही स्त्री नाहीच, अशा अर्थाच्या बातम्या छापून आल्या होत्या. स्कॉटलंडच्या कॉमनवेल्थ स्पर्धांमधून तिला काढून टाकल्याचं आता स्पष्ट झालं होतं.

दुतीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या ‘पुरुष संप्रेरका’चं प्रमाण जास्त असल्याचं जाहीर करण्यात आलं. ती ‘पुरेशी स्त्री’ नसल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. पुन्हा महिलांच्या स्पर्धेत धावायचं असेल तर तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील, असं सांगण्यात आलं. आपलं शरीर निसर्गतःच आहे असं आहे, आता खेळण्यासाठी पात्र व्हावं म्हणून स्वतःचं शरीर कृत्रिमपणे बदलायला हवं, हे दुतीला पटेना. दुतीला ज्या अटीमुळे बाद करण्यात आलं त्याच ‘हायपरॲन्ड्रोजेनीजम’च्या अटीमुळे जगभरात कितीतरी होतकरू महिला खेळाडूंची कारकीर्द संपवून टाकण्यात आली होती. आपल्या देशाला तब्बल १२ आंतरराष्ट्रीय पदकं मिळवून देणाऱ्या शांती सौंदरराजन या धावपटूचं एक रौप्य पदक अशाच नियमामुळे काढून घेण्यात आलं आणि तो धक्का सहन न होऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुळात संप्रेरकांच्या पातळ्यांवरून कोण ‘नॉर्मल’ आणि कोण ‘ॲबनॉर्मल’ हे ठरवण्याच्या सगळ्या पाश्चिमात्त्य फुटपट्ट्यांनी भारत आणि आफ्रिकेच्या कानाकोपऱ्यातलं रक्त कधी तपासलंच नव्हतं… आणि ‘शिव आणि शक्तीची आदीरूपं प्रत्येक मानवी शरीरात असतात’ हे सांगणारी भारतीय परंपराही हे स्त्री आणि पुरुष गुणधर्मांचं प्रत्येक शरीरातलं अस्तित्व सोयीस्कररित्या विसरली.

दुतीसोबत मात्र भारतातल्या आणि कॅनडातल्या कायदेतज्ञांची एक टीम उभी होती. ‘टेस्टोस्टेरॉनमुळे स्पर्धेत फायदा होतो, याचा कुठलाही पुरावा नसताना असे अतार्किक नियम बदलले पाहिजेत’ असं म्हणत या टीमने आंतरराष्ट्रीय खटला जिंकला, या संदर्भातला नियम बदलला गेला आणि दुतीला पुढच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली. दुतीच्या खटल्याने जागतिक क्रीडा जगाचे डोळे उघडले. ‘प्रत्येक शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ संप्रेरकं असतात. प्रत्येक शरीर वेगळं असतं, प्रत्येकाच्या शरीराची वाढ वेगळी असते…’ दुती बोलू लागली आणि क्रीडा जगात वंशवाद आणि लैंगिक भेदभावाबद्दल चर्चा सुरू झाली. अशाच नियमामुळे स्पर्धेतून बाद झालेल्या साउथ आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या या धावपटूला दुतीने आपली कायदेशीर मदत देऊ केली.

दुती पुन्हा धावू तर लागली, पण तिला जाईल तिथे विचित्र नजरांचा सामना करावा लागत होता. ती स्त्री नाहीच, अशा बातम्यांमुळे लोक तिच्याकडे संशयाने पाहत होते. हॉस्टेलमधून तिला काढून टाकण्यात आलं. आता कुठे जावं, अशा काळजीत ती असताना हैदराबादच्या गोपीचंद अकादमीने तिला जवळ केलं. तिथल्या हॉस्टेलमध्ये तिचा सराव नव्या जोमाने सुरू झाला आणि पी व्ही सिंधूसारख्या मैत्रीणींनी तिला पटकन सामावून घेतलं.

दरम्यान दुतीच्या आयुष्यात कुणीतरी आलं होतं. प्रचंड थकवून टाकणाऱ्या सरावाच्या दरम्यान दुती व्हॉट्सॲपवर कुणाच्या तरी मेसेजची जीव लावून वाट पाहू लागली होती. आपलं प्रेम जगावेगळं आहे, असं प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच वाटतं. दुतीच्या बाबतीत मात्र तिच्यापेक्षाही इतरांना तसं जास्त वाटत होतं. तिच्या गावाकडच्याच एका मुलीच्या दुती प्रेमात पडली होती. एका व्हॅलेंटाईन डेला तिने दुतीला व्हॉट्सॲपवरच प्रपोज केलं आणि इतकी सगळी पदकं मिळवणाऱ्या दुतीला आता तिच्या ‘साथी’सोबत असताना जगातल्या सगळ्या स्पर्धा जिंकल्यासारखं वाटू लागलं. दोघींचं प्रेम भरधाव धावत होतं. गेल्या वर्षी भारताच्या सुप्रीम कोर्टाने समलैंगिकतेला बेकायदेशीर ठरवणारं आयपीसीचं ३७७वं कलम रद्द केलं आणि दुतीला मोठा धीर मिळाला. मुलीने मुलीच्या प्रेमात पडणं, त्या दोघींनी ते घरच्यांसमोर मान्य करणं या सगळ्याचा चाका गोपालपूरमध्ये कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आपल्या पोटच्या पोरीनेच शरम आणली म्हणून तिचे आईवडील आसवं गाळू लागले. दुतीची लाडकी सरस्वतीताई मात्र भयंकर संतापली. तिने दुतीला सांगितलं की आता तिचं घर तुटलं. तिचं गावही आता तिला उभं करायचं नाही. दुती मात्र शांत राहिली. ‘हळूहळू कळेल त्यांना… त्यांना परंपरेशिवाय दुसरं काहीच माहीत नाही ना! प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुणीतरी खास हवं असतं. आपलं प्रेम हे आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस असतं. मला ते मिळालं आहे तर मी ते कसं सोडू?’ गावाने दुतीकडे पाठ फिरवली, पण दुतीने चाका गोपालपूरचा हात सोडला नाही. ‘कळेल त्यांना हळूहळू’ ती पुन्हा शांतपणे म्हणते. जकार्तामध्ये झालेल्या एशियन खेळांमध्ये दुतीने दोन रौप्य पदकं मिळवली. गेल्या आठवड्यात वर्ल्ड युनिवर्सिटी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी दुती ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. ॲथलेटिक खेळाडूचं आयुष्य म्हणजे वयाची विशी संपेपर्यंत करियर. दुतीला माहितीय की, २०२४च्या ऑलिंपिक्सपर्यंतच तिला धावता येणार आहे. त्यानंतर तिला आपल्या सहचरीसोबत संसार थाटायचा आहे. दोघींनी भविष्याची कितीतरी स्वप्नं पाहिली आहेत. त्यांना एक मूल दत्तक घ्यायचं आहे. तिची जोडीदार थट्टेने म्हणते की आपल्या मुलाला मात्र आपण दुतीसारखं खेळाडू करायचं नाही, काहीतरी धड काम करेल असा वकील करायचं. दोघी कदाचित भुवनेश्वरच्या सुवर्णमंदिराजवळ घर घेतील. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर दोघींनी कितीतरी सूर्यास्त पाहिले आहेत.

दुतीच्या नजरेला दिसणारा गुलाबी सुर्यास्त चाका गोपालपूरमधल्या तिच्या लोकांनाही एक दिवस दिसेल याची तिला खात्री आहे. भारतातल्या सर्वात वेगवान मुलीचा वेग गाठणं इथल्या जनतेसाठी किती कठिण आहे, हे तिलाही माहितीय. ती काहीच मागत नाहीये. ‘आपल्या सगळ्यांना जगण्याचा अधिकार असतो… आणि प्रेमाशिवाय कुठे जगता येतं का?’ एवढं साधं ती विचारते आहे.

लेखिका : राही श्रु. ग.

लेखाचा स्त्रोत : https://divyamarathi.bhaskar.com/news/s-g-rahi-wirtes-about-duti-chand-1563619488.html?ref=ht&fbclid=IwAR20zCiaVzmfnuQe7GmxMpsraiccoaAkynwwhnqzRWKxkzBZd1OQ2alaewM

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap