सहजीवनातील लिंगभाव

लिंग हे शारीरिक असते आणि लिंगभाव हा सामाजिक असतो. आपले कपडे, आपली वागणूक, जबाबदाऱ्या, कर्तव्य एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून कसे असावे हे जेव्हा समाज ठरविताना दिसतो, तो लिंगभाव. पुरुषांनी एकदम खंबीर असायला पाहिजे असं म्हणतांना एक माणूस म्हणून त्याची भावनिक बाजू त्याने लपवावी असा आग्रह असतो, हे सामाजिक बंधन झालं. मुळात स्त्री आणि पुरुष यामधील  मुख्य फरक शारीरिक आहे आणि तो तितकाच आहे. बाकी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय असं विचारल्यानंतर येणारी उत्तरं नाजूक, सुंदर, भावनिक तर पुरुषाच्या बाबतीत रांगडा, जबाबदार, वगैरे जेव्हा येतात, तेव्हा नक्कीच कळून चुकतं की, आपण लिंगभावाच्या विळख्यात किती घट्ट बसून आहोत. हेच विचार आपल्याला सहजीवनात देखील सोडत नाहीत. जोडीदार निवडताना मुळातच विषमता असलेल्या कित्येक बाबींचा आधार घेतच आपण जोडीदाराची निवड करतो.
सध्या झी मराठीवर खूप गाजत असलेली एक मालिका, त्यातली सुरुवातीला गृहिणी असलेली नायिका नंतर उद्योजिका बनते, नवऱ्याने गृहिणी म्हणून तिची उडविलेली टर, किंवा मग बायकांना काय जमतं वगैरे असं म्हणत, सतत तिला दुय्यम समजणं वगैरे असं सुरू असतं. तिच्या एका मुलाखतीत ती मोठ्या अभिमानाने सांगते की, बाई कितीही मोठी उद्योजिका झाली तरी घरचं काम, जबाबदाऱ्या तिला चुकत नाहीत, हे सांगताना तिचं कौतुक ह्याच गोष्टीसाठी जास्त होतांना दिसतं की, ती घरकाम सोडत नाही, ती तिच्या घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून उद्योजिका बनते, अशी सून म्हणजे आदर्श सून, बायको, मुलगी, वगैरे वगैरे. तिने घरातील कामाची जबाबदारी कोण्या दुसऱ्याला दिली म्हणजे ती एक चांगली स्त्री नसेल का? तिचा नवरा देखील उद्योजक आहेच, मात्र तो बाहेरच्या कामात इतका गुंतलेला असतो म्हणून घराकडे असलेले त्याचे दुर्लक्ष सहज चालवून घेतले जाते मात्र तिने असे केले तर…
सध्या व्हाट्स अप ग्रुपवर सगळ्यात जास्त चर्चेला वेळ घेणारा विषय म्हणजे घरकाम.. जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न विचारला की साहजिकच सुशिक्षित लोकं सांगतील अर्थात दोघांची … पण खरंच तसं दिसतं का? घरकामात कायम कोण गुंतलेलं असतं? ऑफिस झालं की घरी जाऊन काय काय कामं करायची ह्याची मोठ्ठी यादी कोणाच्या डोक्यात असते? हे असे प्रश्न विचारले गेले की, मग अती होतंय वगैरे ऐकायला मिळतं पण ह्या प्रश्नांवर विचार कधी होणार? मी माझ्या बायकोला समजून घेईल आणि तिला घरकामात मदत करेल असे उत्तर जेव्हा एखादा मुलगा देतो तेव्हा खरं तर प्रश्न पडतो की, स्वतःच्याच घरात तो तिला मदत कशी करणार? फारतर तो त्याच्या कामाची त्याच्या घराची जबाबदारी स्वतः घेऊ शकेल, मात्र जेव्हा तो म्हणतो की, माझ्या बायकोला मदत करेल ह्याचा अर्थ घरकाम हा केवळ तिचाच एरिया आहे, आणि तिला त्याचसाठी आणलेलं आहे असे समजून चालायचे का? अजूनही मुलगीच लग्नानंतर मुलाच्या घरी जाते म्हणून खरंतर हा प्रश्न जास्त पडतो की, ती त्याच्या घरी जाते मात्र त्याच्या घरातल्या कामाची सगळी जबाबदारी तिची कशी? पाण्यात पडलं की पोहता येतं, असं कामाच्या बाबतीत मुलींना सांगितलं जातं, आता लग्न झालंय म्हणजे काम आलंच पाहिजे वगैरे… उपक्रम अंतर्गत काही मुलींचे उत्तर असेही बघायला मिळते की, मला माझ्या नवऱ्याने किचनमध्ये पाय ठेवलेला देखील चालणार नाही. वरील दोन्ही उदाहरणे लिंगभाव दाखवतात. घरकाम पुरुषदेखील तितक्याच उत्तमपणे करू शकतो मात्र स्त्रीच्या नावावर ते ठेवल्याने घरकाम इज इक्वल टू बाई असे जणू गणितच जमले. इतक्या मांडणीवरून इथे स्त्री विरुद्ध पुरुष चित्र उभे असल्यासारखे वाटत असले तरीही सहजीवनात ही विषमता झाल्याने कित्येक अडचणी निर्माण झाल्याचे आपण सतत बघतो. घरकाम ही दोघांची जबाबदारी आहे, तिची जितकी तितकीच ती त्याचीही आहेच हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
आपल्याकडे आपण कोणाला अरे-तुरे करून बोलतो, कोणाला अगदी मानपान देऊन बोलतो यावर आपण त्या व्यक्तीला दिलेली किंमत ठरते असं मोठे सांगतात, पण हे खरंच आहे का? म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा आपण सहज अरे-तुरे करतो, त्यात त्यांना आदर नसतो का? मान नसतो की प्रेम नसते? एका अगदी जवळच्या मैत्रिणीचा प्रेमविवाह झाला, लग्नापूर्वी ती त्याला अरे-तुरेच करायची , लग्नानंतर देखील काही महिने-वर्ष ती त्याला एकेरी हाक मारायची मात्र तिला दिवस गेले तसे ती तिच्या नवऱ्याला अहो वगैरे म्हणायला लागली, कारण विचारले तर त्याला बापाचा फील द्यायला हवा न म्हणून … उत्तर खूपच चमत्कारिक वाटले. बापाचा फील हा जबाबदारी, प्रेमाने येणार की बायकोने असं मानापानाने हाक दिल्यानंतर? प्रेमविवाहात पुष्कळ मुलांची अपेक्षा असते की, लग्न होईपर्यंत ठीक नंतर मात्र मानपानानेच बोललं पाहिजे, काहींची अपेक्षा असते की बेडरूममध्ये अरे-तुरे केलेलं चालेल मात्र चारचौघांसमोर अहोच केलं पाहिजे, काही मुली म्हणतात मीच नाही मान दिला तर अजून कोण कसं देईल? मान कामावरून, वागणुकीवरून मिळतो तो तुम्ही केवळ पुरुष आहात म्हणून मिळावा असा आग्रह जरा अती नाहीय का? ह्याला कारण सांगितले जाते की, आधी नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त असायचे म्हणून ही पद्धत पडली वगैरे, पण मग एकसारखे वय असणारे जोडपे देखील हेच करताना दिसतात. सुरुवातीला अगदीच रोमॅंटिक वाटतं काही जणांना असे अहो वगैरे म्हणणे, गंमत म्हणजे काहींच्या फोनचा नंबर पण अहो म्हणून सेव्ह झालेला दिसतो.लग्न झाल्यावर मान दोघांनाही का नको? एकेरी हाक मारणं, नावाने हाक मारणं आदर न करण्याच सूचक कसं असू शकेल? रेवती तिच्या नवऱ्याला नावानेच हाक मारते, पण मग तुम्ही वगैरे बोलते, कारण त्याचं वय जास्त आहे. मात्र रेवतीने अरे-तुरे करावं कारण ते चांगली मैत्री निर्माण करेल अशी त्याची इच्छा असूनही त्यांच्यात तसं अजून शक्य झालंच नाही.
“आमच्या घरी पिरेड्समध्ये चार दिवस बाजूला बसावच लागतं”असं मनिषाची सासू लग्नाच्या एक महिन्यांनंतर तिला जेव्हा सांगते तेव्हा मनिषाला प्रचंड दडपण येतं, कारण माहेरी तिने असं काहीही केलेलं नसतं, ह्याउलट मंजिरीच्या माहेरी हे सगळं चालायचं पण सासरी मुळीच कोणी पाळत नाही ह्याचा मंजिरीला खूप त्रास होतो. मानिषाला तिचा नवरा त्या ४ दिवसात माहेरी जा म्हणून सांगतो पण नैसर्गिक असलेल्या ह्या गोष्टीला असा विटाळ का मानावा हे मनिषाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. नर्स असलेली कविताला देखील ह्याला सामोरे जावे लागायचे. पाळी आली म्हणून बाजूला तर बसायला लागायचेच शिवाय मिळणारे जेवण हे सासू उपकार करतेय बनवून असा काहीसा त्यांचा अविर्भाव असायचा. काही सासवा तर काम करतांना सुनेच्या पाळीच्या दिवसात काम जास्त झाले म्हणून त्यांना बोल लावतांना देखील दिसतात. ह्याचे समर्थन करतांना त्याना ४ दिवस आराम मिळावा म्हणून असं केलं जातं वगैरे सांगतात मात्र कोणाला काही दिवसांसाठी अस्पृश्य समजणं ही भावना नक्कीच आरामदायक नाहीये. ह्यावर आधीच बोलणं होणं गरजेचं आहे. बरेचदा मुलांना आपल्या घरात काय चालतं हे माहीत नसतं, ते लग्नापूर्वीच बोललं गेलं पाहिजे, येणाऱ्या मुलीकडूनच्या ह्या अपेक्षा नेमक्या काय आहे ह्या आधीच माहीत असणे जास्त योग्य.
नावात काय आहे… असं म्हणतांना अर्थात नावात बरंच काही आहे हे सहज लक्षात येतं. लग्नानंतर मुलींचे नाव बदलते. केवळ मधलं आणि आडनाव नाही तर कधीकधी पहिलं नाव देखील बदललं जातं. २०-२५ वर्ष ती ज्या नावाने वाढली आहे, ज्या नावाने तिला ओळख दिली आहे तेच नाव बदलायचं? काही ठिकाणी मुली ह्याला नकार देतात पण काही ठिकाणी ही कल्पना काही मुलींना रोमँटिक वाटते. प्रमोदचे नाव प्र पासून म्हणून मग रमोलाचे नाव प्रमिला झाले, ह्या सोहळ्यात ते तांदळात नाव लिहिणे वगैरे सगळ्या विधी झाल्या, आता रमोलाची प्रमिला झाली तिथवर ठीक, पण एकदा तिचा नवरा बोलता-बोलता तिला म्हणाला रमोला नाव ऐकलं तेव्हा ती त्याला अगदीच फालतू वगैरे वाटली होती नावाने, म्हणून मग नाव बदलूनच टाकावे असे त्याला बघितल्यानंतर वाटले. रमोलाच्या मनावर हा नक्कीच एक आघात होता. शिवानीला नाव बदलण्यात मुळीच रस नव्हता, हे तीने आधीच बोलून घेतले होते, मात्र आडनाव तर बदलले गेलेच पाहीजे असा विक्रमच्या बाजूनें आग्रह असल्याने लग्न ठरले नाही. हाच स्पष्टपणा आधी असावा, नंतर ह्यामुळे जास्त मनं दुखावली जातात.
लग्न करतांना देविका स्थळ बघत आहे मात्र मुलगा तिला तिच्यापेक्षा वयाने जास्त हवा, कमाई देखील त्याची जास्तच असावी. मागच्या लेखात स्पष्ट केल्यानुसार हा निवडीचा पायाच मुळी समान नाहीये, सुधीरची कमाई देविकापेक्षा जास्त मात्र शिक्षण आणि वय थोडं कमी म्हणून ती त्याला नकार देते.अरमान अपेक्षाला नकार देतो, कारण तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. हे दिसताना थोडं वाटलं तरी त्यात सामावलेली विषमता खुप मोठी आहे, म्हणून अरमान आणि देविका अपेक्षा आणि सुधीरला स्वीकारू शकत नाही. मुलाचे वय जास्त, उंची जास्त, पगार जास्त, शिक्षण जास्त, मुलीचं अनुक्रमे हे सगळं कमी. जास्त शिकलेली, कमावती, उंचीची, वयाची मुलगी ऐकण्यातली नसते वगैरे समीकरण ह्या मागे असावे, म्हणजे मुली कानाखालच्याच असाव्या. अन्वरला वय, कमाई, शिक्षण, उंची जास्त असलेली मुलगी चालणार आहे, पण या अपेक्षासोबत तो लिहितो ह्या सगळ्या गोष्टींचा तिला गर्व नसावा. वय आणि उंची नैसर्गिक असलं तरी कमाई आणि केलेल्या शिक्षणाचा तिला अभिमान पण असू नये ही अपेक्षा कशी समर्थनीय असू शकते? पण खरंतर अशी अपेक्षा असते.
लग्न झालेल्या स्त्रीला आणि पुरुषाला कसे ओळखायचे असा प्रश्न कार्यशाळेत केल्यानंतर मिळणारे उत्तर हमखास तिच्या सौभाग्य अलंकारांवरून तर पुरुषाच्याबाबत मग जबाबदार, वगैरे अक्षरशः शोधाशोध करून उत्तरं दिलेले असतात. लग्न झाले म्हणजे मंगळसूत्र, जोडवे, कुंकू, सिंधुर असं काही तिच्या शरीरावर असलंच पाहीजे, असा काहींचा ठाम समज असतो.  ह्या सौभाग्य प्रतिकामुळे ती सुरक्षित असते असाही युक्तिवाद आहे. मंगळसूत्र असलं की कोणी वाकड्या नजरेने बघत नाही असे ज्योती सांगत होती. सिंधुर म्हणजे लाल सिग्नल आहे, तसेच मंगळसूत्र म्हणजे लायसन्स आहे वगैरे आपण सतत ऐकतो. आजकाल कुठे इतक्या मुली मंगळसूत्र घालतात असं म्हणणारे मात्र चारचौघांसमोर तरी घालावे लागेल असा आग्रह करतात. काहींना मंगळसूत्र जसे सुरक्षित असण्याची पावती वाटते तसेच काही मुलींना आणि मुलांना ते गुलामगिरी वाटतात. एखादी स्त्री अमुक एका पुरुषाची मालमत्ता आहे म्हणून ती आता उपलब्ध नाही असा काहीसा मेसेज त्यातून जातो असेही वाटते. त्यात मंगळसूत्र घालण्याचा एक विधीच असतो. पुरुष स्त्रीला मंगळसूत्र घालतो म्हणजे आता ती त्याचीच आहे वगैरे गृहीत असते, ह्याउलट पुरुषाच्याबाबत मात्र असे काही विधी नसतात. सौभाग्य अलंकार कमी महत्वाचा विषय नक्कीच नाही. तो लग्नापूर्वीच डिस्कस असावा. मंगळसूत्र घालण्यामागे आणि न घालण्यामागे असलेल्या स्वतःच्या भूमिका आधीच बोलल्या गेलेल्या असल्या तरी जास्त सोपं. हे बोलणं घरच्यांसोबत होणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
लग्न झाले की सासर दोघांनाही मिळतं मात्र सासरी मिळणारी वागणूक दोघांना सारखी नसते. हे सत्य आहे .सून म्हणून मिळणारी वागणूक वेगळी तर जावई म्हणून वेगळी. विदुला आणि समीर नोकरीच्या निमित्ताने मुंबईला असतात, मात्र जेव्हा-जेव्हा सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा सासरी गेले की, अगदी गेल्यापासून जितके दिवस सासरी असणार तितके दिवस विदुलाने जबाबदारी घ्यावी असे सासरी वाटते. विदुलाची सगळी सुट्टी मग सासरच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तर जातेच मात्र सुट्टीला आलाय म्हणून समीरला पूर्ण आराम असतो. आजकालच्या मुलींना कामच जमत नाही. जबाबदारीच घेता येत नाही वगैरे तिला नेहमी ऐकवलं जातं. समीरच्या आईची तब्येत खराब असल्याने विदुलाला सहा महिने रजा घ्यावी लागली, समीर येऊन-जाऊन करत होताच मात्र पूर्ण जबाबदारी विदुलाची होती. असे कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात . खरंतर दोघांच्या घराची जबाबदारी दोघांची तितकीच आहे. सून किंवा जावई म्हणून ती कमी जास्त होत नाही. विदुलाच्या सासरी पहिली जबाबदारी समीरची आहे आणि त्यासोबत विदुला त्याला मदतीला म्हणून असेल तर विदुलाच्या घराची पहिली जबाबदारी तिची असेल आणि त्यासोबत समीर तिला मदतीला असेल. मात्र असे होतांना दिसत नाही विदुलाच्या माहेरची जबाबदारी समीर अगदीच नावाला वगैरे घेतो पण समीरच्या माहेरची जबाबदारी सून म्हणून विदुलाला अगदी सगळंच सांभाळून घ्यावी लागते. अगदी सहा महिने विदुलाने एकटीने सुट्टी घेण्यापेक्षा काही दिवस समीर आणि काही दिवस विदुला असे नक्कीच जमू शकत होते पण तिचे करिअर, ऑफिस, काम ह्या समोर तिने नेहमी घराला सिलेक्ट करावे हा आग्रह असतोच. थोडक्यात काय तर दोघांना लग्नानंतर मिळणारे सासर सारखेच नसते जे असणं गरजेचं आहे.
लग्नाला सहा वर्षे झाले पण आस्मा आणि किरणला बाळ नाही ह्यावरून आस्माला सतत ऐकवले जाते. किरणमध्ये दोष आहे हे त्याला माहित असूनही तो इतर ट्रीटमेंटचा किंवा दत्तक घेण्याचा विचार करत नाही. सविताला दोन बाळ असावे असं तिचं लग्नापूर्वीच ठरलं होतं, मात्र कार्तिकला एकच हवं असल्याने तिला ह्या इच्छेसोबत तडजोड करावी लागते. लग्नानंतर पाळणा अगदी वर्षभरात हललाच पाहिजे सुरुवातीला एक मूल होऊन जाऊद्या मग काय ती तुमची प्लॅनिंग करा वगैरे गोष्टी सतत सांगितल्या जातात. लग्नापूर्वी सहज गप्पामध्ये रमेशने अनिताला सांगितलं की, त्याला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. अनिताला त्याचा तो निर्णय आवडला म्हणून दोघांनी लग्न केलेही मात्र मग लग्नानंतर स्वतःच मुलंच हवं असा आग्रह रमेशच्या घरून झाल्याने त्याला दत्तक मुलगी घेण्याचा विचार सोडावा लागला. शर्वरी ४ वर्षाची झाली आता अजून एक बाळ हवेच असा तिच्या आजीचा आग्रह सुनिताला त्रासदायक आहे. मुलाच्या बाबत असलेल्या भावनिक अपेक्षा, गरजा लक्षात घेता ह्याबाबत प्रत्यक्ष आई-वडीलांपेक्षा घरातील मोठे लोक निर्णय घेतांना दिसतात. एक मूल हवंय, दोन मुलं हवेत, कधी असावं वगैरे सगळे निर्णय घरचे सांगतात असंच चित्र असतं. मातृत्व कितीही सुखकारक असलं तरी जान्हवीला ते नकोय. हे तिने लग्न होण्याआधीच अजितला सांगूनही आता लग्नानंतर काही वर्षातच इतरांच्या अपेक्षित प्रश्नाला उत्तरं अजित देत नाही, हा एकट्या जान्हवीचा निर्णय आहे, असे तो सांगून मोकळा होतो. मातृत्व नाकारणारी बाई कशी असू शकते अशा इतरांच्या नजरा जान्हवीला टोचतात.
नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडलं तर कोणाला सांगायचं अशी म्हण आपल्याकडे आहे. पावसाचा जसा भरवसा नाही तसाच नवऱ्याचा पण भरोसा नाही. आणि अर्थात त्याला मारण्याचा अधिकार आहे हे ह्यातून अधोरेखित होतं. कमी शिकलेले, खेड्यातले वगैरे लोक आपल्या बायकांना मारतात वगैरे भ्रम असेल तर तो आताच काढायला हवा. अगदी सुखवस्तू कुटुंबातही अशी मारहाण सहज होतांना दिसते. भाजीत मीठ कमी पडलं, कामावरून घरी आल्यावर मुलांनी गोंधळ केला, लवकर डबा करून दिला नाही ते कोणासमोर तरी उलट बोलली म्हणून हात उचलणारे देखील आपल्या आसपास दिसतात.कौटुंबिक हिंसाचार हा एक गुन्हा आहे .मात्र प्रेम ,काळजी आहे म्हणून मारण्याची वाईट पद्धत आपल्याकडे आहे. स्वतःला थोडा वरचढ समजणारी कोणतीही व्यक्ती सहज हात उचलते. तसंच नवरा बायकोच्या नात्यातही होतं.वरच्या  मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांतून दिसून आलेली विषमता शेवटी असे रूप घ्यायला वेळ लावत नाही. बायको माझ्याच मालकीची वस्तू आहे असं समजणारा नवरा कधीही हात उचलू शकतो आणि त्याचे त्याला वाईटही वाटत नाही.रुपाली दिसायला एकदम सुंदर आहे म्हणूनच मंगेशने तिच्यासोबत लग्न केले मात्र लग्नानंतर मग तिच्याकडे सगळे का बघत असतात असा संशय घेत मंगेश तिला सतत बंधनं घालू लागला. थोड्या थोड्या संशयावरुन रूपातील मारहाण करायला लागला . सहन न झाल्याने रुपालीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मात्र दुसरीकडे लफडं चालुय म्हणून तू मला सोडतेय असा अंदाज बांधत मंगेश ने शेवटी रुपालीचा जीव घेतला. मारहाण कधीच साधी, छोटी,सहज नसते. तो एक गुन्हा आहे.
आतापर्यंत चर्चा केलेले सगळे मुद्दे लग्नापूर्वीच बोललं जाणं, एकमेकांच्या इच्छा अपेक्षा लक्षात घेऊनच होकार / नकार कळवणे खूप महत्वाचे आहे. लग्न जरी दोघांचेच होत असले तरी इतर नाते ह्या लग्नामुळेच दोघांच्या आयुष्यात निर्माण होतात त्या सगळ्या नात्याना देखील ट्रेनिंगची गरज असते. लग्नापूर्वीचे समुपदेशन जसे दोघांसाठी महत्वाचे आहे, अगदी तसेच समुपदेशन इतर नात्यांना देखील गरजेचे आहे. खरंतर नात्यांसाठी देखील प्रशिक्षण असावे ज्यातून अधिक निकोप नाते निर्माण होण्याची शक्यता वाढेल.
 वरील सगळ्या बाबींचा विचार जोडीदार निवडीच्या वेळीच करणे जास्त समर्पक आहे. लग्न झाल्यानंतर ह्या एक-एक बाबी समोर आल्या की, आपण अपेक्षा केलेला जोडीदार आपल्याला मिळाला नाही ह्याचे दुःख तर होतेच शिवाय समोरच्याने बदलायच्या अपेक्षा वाढू शकतात. आजकाल मुलांना मॉडर्न, शिकलेली, कमावती बायको हवी असते मात्र सोबतच बायको म्हणून ती टिपिकल असावी अशी सुप्त इच्छा देखील असते. थोडक्यात काय तर शिकलेल्या मुलांना शिकलेल्या मुलींना सांभाळून घेणे जमेना, आणि त्यांना तशी शिकवण देखील  विषमता असलेला समाज देण्यात कमी पडतोय. म्हणूनच जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत आपण आपल्या सारखीच व्यक्ती निवडतोय, तितकेच नाही तर समोरच्या व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष म्हणून असणारे हक्क किंवा कर्तव्य कमी-जास्त नाही तर आपल्या इतकेच आहे ही गोष्ट मनावर कोरून ठेवून जोडीदार निवडीला सज्ज व्हावे, विवेकी निवड ह्यालाच म्हणता येईल.
संदर्भ : दिक्षा काळे. बहिणा मासिक – जून 2018 – लग्नगाठ मधील ह्या महिन्याचा लेख-जोडीदाराची विवेकी निवड

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap