पुरुष रडत नाहीत. खरे पुरुष जे असतात किंवा पुरेसे, ठीकठाक मर्द जे असतात ते रडत नसतात. ते वेदना पचवतात, दुःख सहन करतात, त्यांची सहनशक्ती अधिक असते. ते पोलादाचे बनलेले असतात, खंबीर असतात, त्यांची छाती ५६ इंची असते आणि त्यांना विचलित करू शकेल असं फार काही ह्या जड, भौतिक जगात नसतं.
हे सर्व अर्थातच कुणाच्या तुलनेत तर स्त्रियांच्या. या पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया म्हणजे रडू बाई, अजिबात सहनशक्ती नाही, थोडंसं काही झालं की लगेच डोळ्यात पाणी. वेदना सहन करता येत नाहीत, दुःख पचवता येत नाही आणि अश्रू अनावर होतात.
झालं, संपलं. तर, नाही. संपलं नाही. आणखी एक जमात आहे, ज्यांच्यासोबत ह्या महान पुरुषांची तुलना होत असते. ती जमात आहे खुद्द पुरुषांचीच. म्हणजे असे पुरुष जे रडतात, जे संकटाला घाबरतात, जे दुःखाला सहज पचवू शकत नाहीत. ते या पुरुषांसारखे खंबीर नसतात, पोलादी नसतात. मग ते काय असतात? कदाचित ‘फक्त पुरुष’ असतात. मर्द? कदाचित नाही कारण ‘मर्द को दर्द नही होता’ असं म्हणणारे म्हणतात ना.
परवा, अगदी परवाच, माझ्या मावशीचे पती गेले. अचानक. एक छोटीशी सर्जरी झाली आणि त्याच दिवशी ते गेले. हृदय विकाराचा तीव्र झटका हे कारण डॉक्टरांनी सांगितलं. काकांना तिन्ही मुलंच, मुलगी नाही. आम्हा सर्वांसाठी हा मोठा धक्काच होता. माझ्या या तिन्ही भावांसाठी तर अगदी आभाळच कोसळलं असं म्हणता येईल. बाप गमावण्याचं दुःख काही वेगळंच असावं. आणि तेही असं ध्यानीमनी नसताना. अर्थातच तिघंही खूप रडले. सांगायची गोष्ट म्हणजे काका गेले तेव्हा दवाखान्यात पहिले काही तास मावशी सोडली तर इतर कोणी स्त्री किंवा पुरुष नातलग आमच्याजवळ नव्हते. त्यामुळे ही मुलं, आईच्या गळ्यात पडून मनसोक्त रडू शकली. त्यांना रडू नको, पुरुष रडत नसतात असं म्हणणारं कोणी नव्हतं किंवा अपेक्षेप्रमाणे बायाच रडत असताना पुरुष आपल्याला आवारतं घेतात तसं इथे झालं नाही. हे एक चांगलं झालं.
मी पुण्यात कॉलेजला असतानाचा एक प्रसंग आठवतो. आम्ही मित्र मिळून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा सिनेमा पाहण्यासाठी गेलो होतो. सिनेमात एक प्रसंग आहे, ज्यात त्या अत्याधिक दारिद्र्यात असलेल्या कुटुंबातील छोट्या मुलीचा, दुर्गाचा, उपचारांअभावी मृत्यू होतो. रोजगाराच्या शोधात शहरात गेलेला तिचा बाप परत आला आहे आणि त्याला मुलीच्या मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे आणि पूर्ण कुटुंबच मोडून पडलं आहे, असा हा प्रसंग. मी त्या प्रसंगात खूप गुंतलो गेलो आणि मला रडू आवरलं नाही. मित्रांनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मला थिएटर सोडून बाहेर यावं लागलं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मला असं व्हायचं. रडू आवरताच यायचं नाही. एकदा का धरणाचे दरवाजे उघडले की सहजा सहजी बंद होत नसत. आठ-दहा वर्षांपूर्वी मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथल्या एका वरिष्ठ व्यवस्थापकाशी माझा एकदा वाद झाला. कार्पोरेट संस्कृतीच्या नियमांप्रमाणे तुमच्या वरिष्ठांच्यासमोर तुम्ही स्वतःला ‘बरोबर’ सिद्ध करायचं नसतं किंवा तसा प्रयत्नही करायचा नसतो. मी तसा प्रयत्न केला आणि त्यांचा तोल गेला. ते मला म्हणाले, ‘शट अप ऑर आय विल स्ल्याप यू.’ माझ्यासाठी हे अगदीच अनपेक्षित. इतके दिवस समता-समानता मानणाऱ्या, जात, धर्म, वर्ग या बेड्या तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये मी अगदीच सुरक्षित वाढलो होतो. याच विचारांशी बांधिलकी असणाऱ्या लोकांच्या कंपनीत कामाला होतो. या प्रसंगाच्या निमित्ताने हे निराळं वास्तव मला अतिच बोचलं, त्या शाब्दिक थप्पडीपेक्षा अधिक लागलं आणि मला जे रडू कोसळलं, हो कोसळलंच, ते अगदीच अवर्णनीय होतं. ते पाहून व्यवस्थापक महाशयही घाबरले आणि मला सॉरी म्हणू लागले. आज आठवतं, तेव्हा हसू येतं. असो.
ह्या झाल्या खूप जुन्या गोष्टी. मागची काही वर्षे खरं तर मी स्वतः रडू न येण्याच्या आजाराचा बळी आहे. विशेषतः मागच्या सात-आठ वर्षांच्या काळात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर मी कधी रडलो असेल असं फारसं मला आठवत नाही. कदाचित मी ‘पूर्ण पुरुष’ बनलो असेन. माझ्या या ‘समस्येविषयी’ एकदा मी माझ्या समुपदेशकाशीही बोललो. (हो, मी कधी कधी समुपदेशकाकडे जातो, त्याने मदत होते) त्यांनी काही उपाय सांगितले नाहीत, पण रडायला काही हरकत नाही असं सुचवलं.
मला वाटतं रडणं हे सुद्धा एक व्यक्त होणं असतं. दुःख शेअर करण्याचं, हलकं करण्याचं एक साधन. बहुतेक वेळेस संवाद साधण्याचाही एक मार्ग. पण आपल्या या पुरुषप्रधान संस्कृती जपणाऱ्या, खरा पुरुष किंवा मर्दपणाच्या विशेष चौकटी पाळणाऱ्या जगात आपण पुरुष या संवाद मार्गाला पारखे आहोत हे मात्र खरं. वेदनेला वाट नाही, भीती-निराशा यांची अभिव्यक्ती नाही, दुःख वाटून घ्यावं, आपल्या मर्यादा मान्य कराव्यात हे कोणी सांगितलंच नाही. उलट त्या लपवाव्यात, खोटा आव आणावा, फुशारक्या माराव्यात, असंच सांगितलं जातं.
पुरुषी समाजात खरा पुरुष असण्याच्या या जाचक व्याख्या स्त्रियांना कमीपणाचे एक मानक ठरवतात. पण या व्याख्या पुरुषा-पुरुषांमध्येही उतरंडी तयार करतात. त्यातूनच पुरुषांमध्येच काही अधिक लायक, अधिक सुपेरीयर पुरुष असतात असा एक समज असतो. मित्रांनो पुरुषीपणाच्या या चौकटी मोडूया, व्यक्त होवूया, बोलूया, हसूया आणि हो रडूया सुद्धा. कारण पुरुषही रडतात आणि काळजी नसावी, ते या पृथ्वीवरचेच असतात.
नोट : ऑफिस मधील वाढलेल्या जबाबदाऱ्या, सहकारी आणि त्यांचे विशिष्ट स्वभाव सांभाळत कामं पूर्ण करण्याची कवायत, वरिष्ठांच्या अपेक्षा आणि माझ्या मर्यादा यांची जाणीव या सर्वांचा परिपाक म्हणून बऱ्याच वर्षांनी परवा माझ्या डोळ्यात पाणी येण्याचा प्रसंग आला. अगदी कोणाशी नाही पण जोडीदाराशी हे शेअर केलं, तेव्हा थोडं मोकळं वाटलं.
No Responses