My soul is from elsewhere, I’m sure of that, and I intend to end up there.
– Rumi, From ‘The Essential Rumi’
खूपदा आपल्याला स्वतःबद्दल वेगळंच काहीतरी जाणवत असतं जे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आयुष्यभर आपण काहीतरी वेगळे आहोत आणि जगताना मात्र वेगळंच जगतोय या द्विधा मनःस्थितीमध्ये जगणाऱ्या लोकांची व्यथा सर्वसामान्य लोकांना कळण्यापलीकडची असते. अशावेळी काही लोक धाडसी पाउल उचलतात आणि साचेबद्ध विचारांना तोडत, त्यांना जसं जगायचं असतं तसं जगतात. असं नाही की त्यांना झगडावं लागत नाही. पण जशी व्यवहारामध्ये कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही तसं स्वतःला शोधतानादेखील त्या शोधामुळे मिळणारा अंतिम आनंद सहजासहजी मिळत नाही. मग भलेही तो आनंद मृत्यूमुळे मिळाला तरी चालेल. या शोधप्रवासात खूप कमी लोक असे भेटतात जे त्या व्यक्तीला समजून घेतात. प्रोत्साहन देतात. अशा प्रोत्साहनाला विशेष महत्त्व असतं. कारण बऱ्याचदा अशा मदत करणाऱ्या व्यक्तीदेखील वेगळ्याच कॉन्फ्लिक्ट्समधून जात असतात. आणि त्यातून जन्माला येतं एक अजरामर नातं जे समाज, समाजाची बंधनं, सामाजिक चौकटी यांच्या पलीकडे जाणारं असतं.
‘द डॅनिश गर्ल’ हा सिनेमा अशाच नातेसंबंधांवर आधारित आहे. सत्यघटनेवर आधारित या सिनेमाची कथा १९२६ साली कोपनहेगन स्थित ट्रान्सजेन्डर पुरुष चित्रकार आईनर वेगनर आणि त्याची चित्रकार पत्नी गर्डा वेगनर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आईनर कोपनहेगनमधला प्रथितयश चित्रकार आहे. त्याची पत्नी गर्डादेखील चित्रकार आहे परंतु ती आईनरइतकी प्रथितयश नाही. दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. दोघांच्यातही पतीपत्नीमध्ये जसे (रूढार्थाने) नॉर्मल शरीरसंबंध असावेत तसे संबंध आहेत, दोघांचं सोशल लाईफ उत्तम आहे पण चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसा तो आपल्याला त्या दोघांच्या वेगवेगळ्या दिशेनं होणाऱ्या प्रवासातला सहप्रवासी बनवतो आणि दोघांच्या वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्ट्सवर विचार करायला प्रवृत्त करतो.
आईनर हा बाह्य स्वरूपात शरीरानं आणि (रूढार्थानं) नॉर्मल पुरुष असला तरी त्याचा अंतरात्मा स्त्रीचा आहे. चित्रपट जसा पुढे सरकतो तसं हळू हळू आईनरला तो स्त्री आहे अशी जाणीव होऊ लागते. पण स्त्री म्हणून जगताना त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी, गर्डा आणि त्याच्यामधल्या नात्यात येत जाणारा दुरावा, पुरूषांबद्दल त्याला वाटणारं आकर्षण, त्याची हरवत चाललेली चित्रकला या सर्व गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या क्लिष्टतेमध्ये आईनर अडकतो. गर्डाला याची जाणीव असते आणि ती त्याच्या आईनरपासून ‘लिली’ होण्याच्या प्रवासात त्याच्यामागे खंबीरपणे उभी रहाते पण ते करत असताना आपण आपल्या पतीला गमावतोय याची तिला होणारी जाणीव, त्यातून तिला होणारा त्रास आणि आईनरची लिलीच्या रूपातली चित्रं काढल्यानंतर तिला सापडणारं चित्र आणि त्यातून तिचा एक प्रथितयश चित्रकार होण्यापर्यंतचा प्रवास असे दोन प्रवास आपल्याला त्यांच्या दोघांच्या कॉन्फिल्क्ट्सवर विचार करायला भाग पाडतात.
आईनरला तो स्त्री आहे हे जाणवतं ते दाखवणारे काही अप्रतिम सीन्स या चित्रपटात आहेत. त्यातील काही सीन इथं नमूद करावेसे वाटतात. गर्डाच्या एका अर्धवट राहिलेल्या चित्रासाठी ती आईनरला स्त्री वेष परिधान करून मॉडेल म्हणून बसवते. सुरवातीला आईनरला विचित्र वाटतं पण नंतर जेव्हा तो त्याच्या पायात slacks घालतो, अंगावर ते कपडे चढवतो तेव्हा त्याला वेगळंच फिलिंग येऊ लागतं. त्या कपड्यांवरून, slacksचा स्पर्श, त्यातून येणारी स्त्री शरीराबद्दलची भावना यातून त्याला comfortable वाटतं. त्यानंतर एका बॉलडान्स कार्यक्रमासाठी गम्मत म्हणून गर्डा आईनरला स्त्री वेष परिधान करून यायला सांगते. सुरवातीला आईनरला विचित्र वाटतं पण स्त्री वेष परिधान केल्यावर त्या वेशात त्याला कम्फर्ट जाणवू लागतो. तिथे तो एका पुरुषाला चुंबन देतो आणि आपण काहीतरी भलतंच करतोय याची जाणीव त्याला चाटून जाते. गर्डा त्याला चुंबन देताना पाहते आणि तिथे तिला आपण काहीतरी भलतंच केलंय याची जाणीव होते. दुसऱ्या एका सीनमध्ये आईनर स्वतःला आरशात नग्न पहातो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या शरीरावरून हात फिरवतो, त्याच्या शरीरात कुठेतरी स्त्रीपणाचा अंश दडलाय याची त्याला जाणीव होते. त्याचं शरीर एखाद्या स्त्रीसारखंच आहे त्यात फक्त लिंगाचा फरक आहे असं त्याला जाणवतं. या सर्वातून आपल्याला प्रेक्षक म्हणून हे जाणवतं की आईनरला स्त्री होण्याबद्दल खरं प्रेम आहे. ते प्रेम कोणत्याही external forceमुळे आलेलं नसून आतूनच त्याची स्त्री बनण्याची इच्छा आहे. त्याचं शरीर जरी पुरुषाचं असलं तरी त्याचं मन, त्याचा आत्मा स्त्रीचा आहे.
हे सर्व होत असताना गर्डा मात्र वेगळ्याच कॉन्फ्लिक्ट्समधून जात असते. आईनरला दिवसेंदिवस लिली बनताना बघून ती त्याचं लिलीच्या रूपातलं एक चित्र काढते आणि आईनर तिच्यापासून दूर गेलाय याची तिला जाणीव होते. एका बाजूला आईनरला लिली बनत चाललाय किंवा बनला आहे याला कारणीभूत ती आहे, तिने त्याला स्त्री वेष घालण्याचा आग्रह केला, तिने त्याला लिली बनवलं अशी गिल्ट तिला खात असते आणि दुसऱ्या बाजूला आईनरकडून तिला मिळणारं शरीरसुख, त्याचा सहवास, त्याच्यावरचं तिचं प्रेम, पती म्हणून त्याच्याकडून तिला मिळणारा comfort या गोष्टी कुठेतरी हरवत चालल्यात आणि मुख्यतः आईनर कुठेतरी हरवत चाललाय आणि त्याला जवाबदार तीच आहे याचा तिला सतत त्रास होत असतो. असं नसतं की आईनरला गर्डाची घुसमट दिसत नाही. पण तो काहीच करू शकत नसतो.
या सर्व घुसमटीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणून आईनर वेगवेगळ्या डॉक्टरांची ची मदत घेतो. तिथेदेखील तो ‘तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे’, ‘तो स्कीझोफ्रेनिक आहे’, ‘त्याच्या डोक्यात केमिकल इम्बॅलेंस झालाय’ असे त्यांचे निष्कर्ष ऐकून घेतो, प्रसंगी काही ठिकाणाहून पळून जातो पण त्या सर्वातून जाऊनदेखील आपण ‘लिलीच’ आहोत याची त्याला खात्री होते आणि सरतेशेवटी तो लिंगबदलाचे ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतो. ऑपरेशन कठीण असते, जीवाचा धोका असतो (कारण ते ऑपरेशन जगातले पहिले लिंगबदल ऑपरेशन होते) पण आईनर ते करण्याचा निर्णय घेतो. त्या निर्णयात गर्डा त्याच्यामागे खंबीरपणे उभी असते. शेवटी आईनर सर्व क्लिष्टतेपासून, सामाजिक बंधनातून आणि सर्व कॉन्फिल्क्ट्समधून मुक्त होतो पण मुक्त होताना तो आईनर बनून नाही तर लिली बनून मुक्त होतो आणि तिथे चित्रपट संपतो.
या चित्रपटाच्या निमित्तानं काही मुद्दे इथे मांडावेसे वाटतात. मुळात मानवी लैंगिकता आणि त्यासंबंधी वेगवेगळ्या विषयांवर, त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांविषयी चर्चा करणं आपल्याकडे होत नाही. त्यात लैंगिकतेकडे black and white दृष्टीकोनातून बघण्याची सवय आपल्याला लहानपणापासूनच लावलेली असते. खरंतर मानवी लैंगिकता ही दगडासारखी रिजिड नसते तर पाण्यासारखी फ्रीफ्लोइंग असते हा विचार आपल्याकडे नसतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची लैंगिकता काही वर्षांनंतर बदलू शकते यावर आपण विश्वासच ठेवू शकत नाही. ‘वेगळी’ लैंगिकता असणाऱ्या लोकांना एका बाजूला पाडले जाते आणि त्यातून एक प्रकारचा ‘तुम्ही विरुद्ध आम्ही’ असा संघर्ष तयार होतो. अशा प्रकारच्या संघर्षाला पूर्णपणे आळा घालता येणं कठीण आहे. पण जर आपण संघर्ष निर्माण करणाऱ्या परिस्थितीकडे किंवा मुद्द्यांकडे वेगळ्या पर्स्पेक्टीव्हमध्ये पाहिलं तर त्याची कारणं समजू शकतात आणि तो संघर्ष कमी होण्यास मदत होऊ शकते. पण त्यासाठी जरुरी आहे आपला दृष्टीकोण रिजिड न ठेवता बदलता अर्थात फ्लेक्झिबल, मानवी आणि सुदृढ ठेवण्याची. त्यासाठी गरज आहे आपण ‘समाजाने’ बनवलेल्या चांगल्या-वाईटच्या संकल्पना तपासून बघण्याची. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून स्वतंत्र विचार करण्याची. वैज्ञानिक दृष्टीकोनाची! आणि आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीला ‘वेगळं’ म्हणून बाजूला न काढता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची.
One Response
कधीही न बोलल्या गेलेल्या गोष्टी आहेत. या विषयी खरंच बोलण्याची गरज आहे.