वैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी नोकरीत आहे आणि तिला बढतीही मिळाली आहे. तिची ही आत्मकथा – ले. बिंदुमाधव खिरे
वैशालीची गोष्ट
माझा जन्म एका खेडेगावात, माझ्या आईच्या माहेरी झाला. आईची प्रसूती घरच्या घरी केली गेली. माझ्या वडलांनी जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी माझ्यात असलेलं वेगळेपण त्यांच्या लक्षात आलं. ते मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासलं आणि वडलांना सांगितलं की बाळाचे वृषण कालांतराने नाहीसे होतील. तूर्तास काळजी करू नका. (ही माहिती चुकीची होती)
मी जशी मोठी झाले तसं माझ्या वागण्या-बोलण्यात असलेला वेगळेपणा त्यांना जाणवू लागला. परंतु मला, माझ्यात काही कमी आहे असं वाटतच नव्हतं. आमच्या शेजारच्या बाई आमच्या आईला सारखं म्हणायच्या, “ही अशी पुरुषासारखी खांदे उडवत का चालते?’’ माझ्या आईला याची लाज वाटायची आणि ती मला माझी चालण्याची पद्धत बदलायला सांगायची. मी ८वी-९वीत असताना माझी आई मला डॉक्टरांकडे घेऊन जायचा आग्रह करू लागली. आई खूप मागे लागली म्हणून मी माझ्या आत्याला घेऊन एका डॉक्टरकडे गेले. मी मोठी झाल्यापासून पहिल्यांदाच कुणी माझी जननेंद्रियं तपासली. त्यांनी मला तपासलं व माझी सोनोग्राफी केली. मी हळूच डॉक्टरना एक चिठ्ठी दिली आणि विचारलं, “मी तृतीयपंथी आहे का?” डॉक्टर म्हणाल्या, “तुला गर्भाशय नाही. त्यामुळे तुला पाळी येणार नाही.” याचा मला थोडा धक्का बसला. पण त्यांनी माझी समजून काढली. त्या म्हणाल्या, “अनेक लोकांमध्ये विकलांगता असते. काही लोकांना हात-पाय नसतात, काही लोकांना दिसत नाही. त्यांच्या तुलनेत तुझं वेगळेपण काहीच नाही.” मला त्यांच्या बोलण्याने हुरूप आला. मी घरी आल्यावर सगळ्यांना सांगितलं की मला आता कसलीच भीती नाही आणि मी व्यवस्थित आहे.
माझ्यात इतर स्त्रियांपेक्षा काय वेगळं आहे असं विचाराल तर माझी शिश्निका (क्लिटोरिस) मोठी आहे, मला गर्भाशय नाही, भगोष्ठांमध्ये वृषण आहेत व योनीच्या ठिकाणी खड्डा आहे. मला शस्त्रक्रिया करून बदल करून घ्यावेसे वाटले नाहीत व आताही वाटत नाही. कधी तरी मधेच असं वाटतं की ब्रेस्ट इंप्लांट करून घ्यावं पण अजूनही तो निर्णय पक्का नाही.
मी माझ्या वेगळेपणाविषयी कुणाशीच बोलले नव्हते. मी जास्तीत जास्त इतर मुलींसारखं राहण्याचा प्रयत्न करू लागले. पण, पुढे मला माझ्यातला वेगळेपणा जास्त जाणवू लागला. ही भावना अस्वस्थ करणारी होती. त्याचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर व्हायला लागला. माझ्या संगतीतल्या सर्व मुली मुलांकडे पहायच्या पण मला मुलांमध्ये रस नव्हता. मला मुलीच आवडायच्या. इतर मुलींना संशय येऊ नये म्हणून मीही मुलांकडे पाहण्याचं नाटक करायचे. ११वीत मला खूप नैराश्य आलं. आपण या जगात का आलो, आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे असे प्रश्न पडू लागले. मग मी अध्यात्मिक पुस्तकं वाचू लागले. उदा. स्वामी विवेकानंद. यामुळे माझा आत्मविश्वास वाढू लागला. आपल्या आगळेपणाचा काही विशेष उद्देश आहे असं वाटू लागलं.
मी अभ्यासात चांगली आहे. माझा असा समज होता की मी वेगळी आहे त्यामुळे माझ्यातली उणीव भरून काढण्यासाठी मी खूप अभ्यास केला पाहिजे. माझ्या शिक्षकांना माझं कौतुक होतं. मला वाटतं, मी इतरांसारखीच असते तर सामान्य राहिले असते व अशी महत्त्वाकांक्षा माझ्यात आली नसती. माझ्या सर्व नातेवाईकांना माझ्या वेगळेपणाविषयी माहित आहे आणि त्यांनी मला कधीही दुजेपणाची वागणूक दिली नाही. माझे शेजारीही माझ्या शिक्षणाचं कौतुक करतात. मला आनंद वाटतो की या सर्वच लोकांना माझ्यातल्या लैंगिक वेगळेपणापेक्षा माझं कर्तृत्व जास्त महत्त्वाचं वाटतं. मी शिक्षण पूर्ण केलं, सरकारी नोकरी स्वीकारली, कालांतराने एमएसडब्ल्यू केलं. समपथिक आणि लेबिया या दोन संस्थांचा मला आधार मिळाला.
मला माझी जोडीदार होस्टेलमध्ये भेटली. आधी आम्ही मैत्रिणी होतो, हळू हळू प्रेमात पडलो. माझ्या जोडीदाराचा व माझा पहिला सेक्स झाला तेव्हा आम्ही दोघी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होतो. नेमकं काय करायचं कळत नव्हतं, तरी माझ्या पार्टनरनं मला स्वीकारलं यातच मला धन्यता वाटत होती. मला तिच्याबरोबर लैंगिक सुख उपभोगायला आवडतं. मला तिचं सुख महत्त्वाचं वाटतं. सेक्सच्या वेळी मला पुरुषाची भूमिका घ्यायला आवडते. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला तिच्याबरोबर एक खास नातं हवं आहे. मी सतत आमचं नातं जमून रहावं यासाठी प्रयत्न करत राहते. मला सांगण्यास आनंद वाटतो की आम्ही 4 वर्षांपासून एकत्र आहोत.
जर तुम्ही मला विचारलंत की तू पूर्णपणे स्वतःचा स्वीकार केला आहेस का? तर मी म्हणेन – हो आणि नाही. कधी कधी असं वाटतं की मी तर इतर मुलींसारखी असते तर बरंच सुखी जीवन जगले असते, पण दुसऱ्याच क्षणी असंही वाटतं की जीवन खूप छोटं आहे व रडणं व्यर्थ आहे.
इंटरसेक्स – एक प्राथमिक ओळख, ले. बिंदुमाधव खिरे, समपथिक प्रकाशन या पुस्तकातून साभार
अधिक माहितीसाठी – www.samapathik.org
No Responses