माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

 

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट’ मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज पटणार होतं. त्या म्हणाल्या,”तू स्वत:ला लेबल लावून घेण्याची घाई का करतोयस? ठोकळे खोबणीत बसवण्याचा खेळ खेळला आहेस ना लहानपणी? मग असं समज की तुझ्यासमोर त्रिकोणी आणि चौकोनी खोबण आहे. पण तुझ्या हातात काय आहे, हे तुला माहीत नाही. काही वर्ष थांबलास तर तुझ्या हातात त्रिकोण आणि चौकोन यापैकी काहीही नसून वर्तुळाकृती ठोकळा आहे. मग तो त्या खोबणीत कसा बसणार? आता तू गोंधळलेला आहेस. तुला मुलं आणि मुली दोन्ही आवडतात. काही वर्षांनी तुझ्याच लक्षात येईल. तुझा कल कोणाकडे आहे ते. आता एवढ्यात या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. करिअरकडे लक्ष दे.” त्यांचं ऐकून माझ्या मनातलं वादळ शांत तर झालंच. पण त्याचबरोबर

स्वत:चा शोध घेण्याची एक प्रक्रिया नकळत मनात सुरू झाली. अजूनही सुरूच आहे. हळूहळू माझ्याच लक्षात येऊ लागलं की, जबरदस्ती करत आपण इतरांसारखे आहोत, असं भासवण्याच्या प्रयत्नात आपण मुलींच्या मागे जातो. ‘ट्रायल अँड एरर’ सारखं प्रपोज वगैरे करून पाहतो आणि त्याचाच आपल्या मनावर प्रचंड ताण पडतोय. मुलांविषयी आपल्याला कमालीचं लैंगिक आकर्षण आहे आणि ही गोष्ट आपण नाकारतोय. फक्त लैंगिकच नाही, तर भावनिकही. हे कळू लागले आणि स्वतःला स्वीकारत गेलो. तेव्हा पिसासारखं हलकं वाटू लागलं.

त्याचदरम्यान कधीतरी २००९-१० साली आईबाबांना ही गोष्ट सांगून मोकळा झालो. नंतर कुठल्याही घरात होईल अशी रडारड झाली. सायकिअॅट्रिस्ट झाले, माझा विश्वास नसतानाही अंगारे धुपारे झाले, पण माझ्या लैंगिक कलामध्ये कणभरही बदल झाला नाही, तो होणार नव्हताच.

मध्यंतरीच्या काळात आणखी एक गोष्ट मात्र झाली. एका मुलीनं मला प्रपोज केलं. मग रवी जाधवच्या ‘मित्रा’ या लघुपटात दाखविल्याप्रमाणे अगदी तंतोतंत तो प्रसंगही घडला. सुमित्रा विन्याच्या प्रेमपत्राला उत्तर देताना त्याला भेटून आपण वेगळी असल्याचे सांगते आणि आपलं आपल्या रूमपार्टनर ऊर्मिलावरचं प्रेम त्याच्यासमोर उघड करते. अगदी तसंच मग तिला मी एके  दिवशी सारसबागेत बोलावलं आणि तिला नीटपणे समजावलं की मी गे आहे. मी तुझं प्रेम नाही स्वीकारू शकत. त्यानंतर आमच्या गप्पा चालूच राहिल्या वर्षभर आणि त्या काळात मी भावनिकरित्या गुंतत गेलो तिच्यात. वर्षभराने मी तिला प्रपोज केलं आणि ती ‘हो’ म्हणाली, जवळजवळ सहा महिने आम्ही एकत्र होतो. मात्र त्या काळातही माझं पुरुषांबद्दलचे आकर्षण कमी झालं नाही. आमचा ब्रेकअप झाला, त्याला कारणं वेगळी होती. मात्र ते नातं मी ओढत असल्यासारखंच मला वारंवार जाणवत होतं.

त्यानंतर आयुष्याचा साथीदार म्हणून एका योग्य पुरुषाचा शोध घेण्यास सुरुवात केली. साधारण २०११ पासून. तो शोध अजूनही संपलेला नाही. आधी ऑर्केट, मग फेसबुकवरचं फेक अकाऊंट, मग प्लॅनेट रोमिओ आणि नंतर ग्रिंडरसारख्या साईटस आणि अॅप्सवरून शोध चालूच राहिला. पुण्यात असताना याच गोष्टीमुळे दोघांनी ब्लेकमेलही केलं होतं. पैसे लुटले होते. पैसे दे; नाहीतर तु समलिंगी आहेस, हे आम्ही सगळीकडे पसरवू, असं सांगून. ते प्रकरण बाबांनी मिटवलं, पण त्यामुळे त्यांचा असा ग्रह झाला की, हे जग सुरक्षित नाही आणि केवळ त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा धोशा मागे लावला. त्यानूसार काही स्थळंही पाहून झाली. सुदैवाने मला कुठेही तोंड उघडण्याची गरज पडली नाही. पण ते दिवस आठवले की अंगावर सर्रकन काटा येतो.  इच्छा नसताना मी जसा नाही, तसा असल्याचं दाखवत त्या मुलींसमोर बसताना प्राण कंठाशी यायचे. कधी ती मीटिंग संपते, असं व्हायचं. कधीकधी तर त्या भेटींचा इतका ताण यायचा मनावर की नंतर अगदी जवळच्या मित्रांना फोन करून मी ढसाढसा रडत असे.

हळूहळू घरच्यांना कळू लागलं मी काय म्हणतोय ते. आज निदान बाबांनी तरी माझ्या लग्नाचा विचार सोडून दिलाय, पण म्हणून आयुष्य सोप्प झालं अशातला भाग नाही. हा लेख मला वेगळ्या नावाने लिहावा लागतोय, यातच सगळ आलं. आऊट होताना जरी हलकं वाटत असलं तरी प्रश्न संपत नाहीत. सुदैवाने मी एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीमध्ये कामाला असल्याने तिथे म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही. एलजीबीटी गटाचे संरक्षण करणारे नियम असल्याने आयुष्य सुकर झालंय. तरीही टोमणे असतातच. अगदी अलीकडेच एका कलीगने माझ्या डब्यात केळ पाहून म्हटलं होत, “बघ, तुझ्या घरच्यांनाही माहीत आहे तुला केळी किती आवडतात ते.” एकदा डब्यात काहीतरी गोडधोड होतं. ते शेअर करण्यासाठी एका जवळच्या मैत्रिणीला बोलावलं. तर ती “मुद्दाम मीठा है, मीठा है” असं ओरडत सगळ्यांना सांगत होती. शाळेच्या ग्रूपवर आऊट झाल्यावर एका वर्गमित्राने वेगळा मेसेज करून विचारलं, “चोको घेतोस का तू?”  इतरांच्या अध्यातमध्यात नसताना जेव्हा जवळच्या मित्रांकडून मैत्रिणींकडून अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात, तेव्हा नकोच कुणी मित्र, असं वाटू लागते. एकटेपणा खायला उठतो. पण फेसबुकवर कधीतरी प्रत्यक्ष न भेटलेली कुणीतरी व्यक्ती आम्ही पाठीशी आहोत तुझ्या, असं सांगते, तेव्हा वाटतं, आशा सोडू नये. एक दिवस असा नक्की येईल, जेव्हा लोक माझ्याकडे फक्त एक माणूस म्हणून पाहतील.

६ सप्टेंबर २०१८ ची सकाळ होए्यापूबीच Whatsapp वर गैलक्सी मॅगझिनचा मेसेज आला होता… कलम ३७७ बद्दल सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार… त्यामुळे मनात प्रचंड धाकधूक होती. सकाळपासून Live Updates चेक करत होतो. अखेर कोर्टाने एलजीबीटी समूह कलम ३७७ मधून वगळण्यात येईल असा निर्वाहा दिला आणि मन फुलपाखरासारखं बागडू लागलं. ब-याच जणांना आधीच आऊट असल्यामुळे या निर्णयाने तसा प्रत्यक्षपणे माझ्या वैयक्तिक आयुष्यात तसा फार काही फरक पडणार नसला, तरीही मोकळा श्वास घेण्याची फीलिंग मात्र काही और असते, हे अनुभवायला मिळालं. यापुढे कुणीही मला गे असल्यावरून ब्लॅकमेल करू शकणार नव्हते. त्यातही न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी काढलेले उद्गार तर जर दाद – देण्याजोगे होते. त्या म्हणाल्या, “एलजीबीटी समुदायला इतकी वर्ष गुलामगिरीत ठेवल्याबद्दल आपण इतर समाजाने त्यांची माफी मागायला हवी.”

अर्थात निर्णय एलजीबीटी समुदायाच्या बाजूने लागला. म्हणून गोष्टी लगेच बदलत नसतात. स्वीकार करण्यासाठी एक समाजमन तयार व्हावं लागतं. ते व्हायला अजून बराच कालावधी उलटावा लागेल. त्यातही इथे पुन्हा विवाहसंस्था उभी करायची, तर त्यातून पुढे निर्माण होणा-या प्रश्नांवरही तोडगा शोधून काढावा लागेल. माध्यमांनी जनसमुदायात तयार केलेली एलजीबीटी समुदायाची प्रतिमा कशी चुकीची आहे, हे लोकांना समजावून सांगावे लागेल. त्याचबरोबर एलजीबीटी समुदायाचे स्वतःचा स्वीकार करण्यातले अडथळेही समजून घ्यावे लागतील.

अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. माझा स्वतःला शोधण्याचा प्रवास तर चालूच असणार आहे, पण तो व्यक्तीकडून समष्टीकडे कसा जाईल, यासाठी प्रयत्न करायचे अहेत:
(वैयक्तिक गुप्ततेच्या कारणास्तव लेखकाचे मूळ नावाऐवजी टोपणनाव वापरण्यात आले आहे)

सदर लेख पुरुषस्पंदनं माणूसपणाच्या वाटेवरची / दिवाळी २०१८ या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.

(या अंकासाठी http://www.mavaindia.org/contact.html या लिंकवरील संंपर्क क्रमांकावर विचारणा करावी.)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap