थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया

मागील भागात आपण ट्रान्सजेंडरम्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या  व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही हे ही पाहिलं या भागात आपण लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS) व त्याआधी काय काय टप्पे आहेत याबाबत पाहणार आहोत.

लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS: Sex Reassignment Surgery)

समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्तीं आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. काहींना आपला लिगभाव लपून ठेवणं अशक्य असतं लिंगभाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा त्यांच्या स्वप्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. जगणं अशक्य होतं. त्यांना तीव्र इच्छा असते की आपल्याला जी मानसिक घडण निसर्गानं दिली आहे तीच जगली पाहिजे, मग त्याचा समाजाकडून कितीही त्रास होवो. आपल्या लिंगभावाशी समरस शरीर असावं ही इच्छा तीव्र असते. म्हणून काहीजण तसं शरीर घडवायचा मार्ग शोधायची खडतर तपश्चर्या करतात.

ट्रान्ससेक्शुअल्स :  जी ट्रान्सजेंडर व्यक्ती लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपलं शारीरिक लिंग बदलते अशा बदल झालेल्या व्यक्तीला ‘ट्रान्ससेक्शुअल’ म्हणतात. या बदलाचे अनेक टप्पे आहेत, याची थोडक्यात ओळख खाली दिली आहे.

लिंग बदलायचे टप्पे

माहिती मिळवणं

ज्या कॉन्सेलरला (समुपदेशक) या विषयातलं ज्ञान आहे व जो पूर्वग्रहदूषित विचार करणारा नाही अशा कॉन्सेलरला भेटावं लागतं. संवेदनशील कॉन्सेलर मिळणं अवघड असतं. कॉन्सेलरकडे जाऊन या विषयाची पूर्ण माहिती मिळवावी लागते. कॉन्सेलर विविध गोष्टी पडताळून बघतो. आलेली व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे का? की काही विशिष्ट ‘मूड्स’ असतानाच स्त्री बनायची इच्छा प्रकट होते? काही गैरसमजुतींतून, कुणाच्या दबावातून तर हा निर्णय घेतला जात नाही ना? ही व्यक्ती समलिंगी आहे पण गैरसमजानं ही व्यक्ती स्वत:ला ट्रान्सजेंडर तर समजत नाही ना?

काहीवेळा चर्चेत दिसून येतं, की क्लायंटला हा विषय नीट कळलेलाच नसतो. लैंगिक कल व लिंगभाव यात फरक आहे. हा फरक त्यांना समजायला खूप जड जातं.

पूर्वतयारी

सामाजिक बाबींवर चर्चा करावी लागते. या प्रवासात क्लायंटला आधार देणाऱ्यांची यादी बनवावी लागते. (उदा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक). त्यांना बोलावून त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. त्यांच्या ज्या काही शंका असतील त्याचे निरसन करावं लागतं.

काहीजण म्हणतात की, “मला लिंग बदलायची शस्त्रक्रिया करायची आहे.” त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलेलं नसतं. सहकाऱ्यांना, मित्रांना माहिती नसतं. “घरच्यांना कल्पना आहे का?”, “या प्रक्रियेत त्यांचा आधार घेणार का?” असं विचारलं तर म्हणतात की, “शस्त्रक्रिया झाल्यावर आम्ही घरच्यांना सांगणार. आत्ताच हे बोलणार नाही कारण त्यांचा खूप विरोध होईल.”

जर तुम्ही प्रौढ असाल, घरच्यांपासून वेगळे राहत असाल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तर हे पाऊल तुम्ही उचलू शकता. पण जर तुम्ही घरच्यांपासून वेगळे राहत नसाल, विविध कारणांसाठी घरच्यांवर अवलंबून असाल, तर अशा वेळी एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. लिंग बदलायची प्रक्रिया सुरू झाली व मध्येच घरच्यांना कळलं, तर लिंगबदल प्रक्रियेचा ताण, त्यामुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल व त्यात घरच्यांची भांडणं या सगळ्या त्रासांना एकदम सामोरं जावं लागतं. हे सगळेच त्रास एकाच वेळी आपल्याला झेपणार आहेत का? याचा नीट विचार करावा लागतो. हा विचार अनेक वेळा झालेला दिसत नाही. काही वेळा आपल्या जोडीदाराचं लग्न ठरत असतं आणि ते ठरायच्या आत लिंगबदल करून त्याच्याशी/तिच्याशी गुपचूप लग्न लावायचं असतं. सर्व पैलूंचा नीट विचार न करता अस पाऊल उचलण्याचा उतावीळपणा करू नये.

जर पुरुष शस्त्रक्रियेनंतर स्त्रीच्या वेशात राहणार असेल तर शस्त्रक्रियेआधी किमान एक वर्ष तरी त्यानं स्त्रीची जीवनशैली जगावी असं सुचवलं जातं. (जर तो अगोदरपासून स्त्री-वेशातच वावरत असेल तर हा मुद्दा उपस्थित होत नाही.) पुरुषाला समाजात जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्त्रियांना नाही. जर स्त्री म्हणून समाजात वावरायचं ठरवलं तर या मर्यादांची मानसिक तयारी व्हावी लागते. बदल झाल्यावर हे स्वातंत्र्य गृहीत धरता येणार नाही याची जाण हवी. एक ट्रान्ससेक्शुअल म्हणाली, “आता मी संध्याकाळी कोणत्याही पुरुषाशी रस्त्यात बोलताना दिसले तरी वस्तीतील लोक माझ्याकडे संशयी नजरेनं बघतात. ही बाई कशी काय परपुरुषांशी बोलते?”

जर नवीन परिस्थितीला सामोरं जायची मनाची तयारी झाली नसेल शस्त्रक्रिया झाल्यावर नंतर आपण ही शस्त्रक्रिया करायला नको होती, असं वाटलं तरी परत ही शस्त्रक्रिया उलटी करता येत नाही. अशा काही केसेस आहेत की ज्यांनी नीट माहिती न मिळवता, नीट विचार न करता लिंग/वृषण काढून टाकली आहेत व आता “माझा निर्णय चुकला आता मला परत लिंग व वृषण बसवा. जमेल का?” असं विचारणारेही लोक आहेत. त्यामुळे या गोष्टी नीट विचारात घेणं, त्या व्यक्तीची मानसिक तयारी तपासणं खूप महत्त्वाचं असतं.

मानसोपचारतज्ज्ञ

दोन संवेदनशील, पूर्वग्रहदूषित नसलेल्या मानसोपचारतज्ज्ञांना भेटून क्लायंट ट्रान्सजेंडर आहे असे दाखले मिळवावे लागतात. असे संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञ मिळणं अवघड असतं. बहुतेकजण अत्यंत पूर्वग्रहदूषित असतात. एक ट्रान्सजेंडर म्हणाली, “मी मागची दोन वर्ष तिच्याकडे (मानसोपचारतज्ज्ञाकडे) जात होते. तिने दोन वर्ष माझा निर्णय कसा चुकीचा आहे हे समजून सांगण्यात घालवला.” अशा डॉक्टरांचा काही उपयोग होत नाही.

काही ट्रान्सजेंडर्स मात्र मानसोपचारतज्ज्ञांकडे जात नाहीत. गौरी म्हणाली, “मी एकाही मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले नाही. मी एकाही मानसोपचारतज्ज्ञाला विचारलं नाही की मला दाखला दया. हे कोण मला दाखला देणार? मला लहानपणापासून माहिती आहे की मी मुलगी आहे, बस! माझ्या शरीरावर माझा काही अधिकार आहे की नाही?”

कायदा

याच्यानंतर कायद्याच्या बाबी समजून घ्याव्या लागतात. एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून इजा करणं भा.दं.सं.३१९, ३२० या कलमांनुसार गुन्हा आहे. इजेचे विविध प्रकार दिले आहेत. यात पहिला प्रकार खच्चीकरणाचा (इमॅस्कूलेशन) आहे. खच्चीकरण म्हणजे एखादया पुरुषाचे वृषण काढून टाकणं. हा कायदा खूप पूर्वी बनवला होता जेव्हा ट्रान्सजेडर, ट्रान्ससेक्शुअल व्यक्तींबद्दल काहीही शास्त्रीय माहिती नव्हती. आज ज्या पुरुषांना शस्त्रक्रिया करून स्त्री बनायचंय अशांना ही कलमं लागू होतात का? याचं उत्तर स्पष्ट नाही.

ही शस्त्रक्रिया करण्याआधी काही डॉक्टर्स त्या व्यक्तीला अॅफिडेव्हीट करायला सांगतात. या अॅफिडेव्हीटमध्ये ती व्यक्ती सज्ञान आहे व ही शस्त्रक्रिया स्वत:च्या मर्जीनं करू इच्छिते हे नमूद केलं जात. डॉक्टर जरी अॅफिडेव्हीट लिहून घ्यायची काळजी घेत असले तरी जोपयंत भा.दं.सं. ३१९, ३२० मध्ये बदल होत नाही, तोपर्यंत तरी डॉक्टरांसाठी ही कायदेशीर बाजू नाजूकच असणार आहे.

खच्चीकरण व ‘SRS’ या दोन्ही विषयांबद्दल अनेक प्रश्न कायद्याच्या दृष्टीने आज तरी अनुत्तरित आहेत. यातील काही मुद्दे-

  • खच्चीकरण झालेल्या पुरुषाला कोणत्या लिंगाचं मानायचं? पुरुष? का स्त्री? का एक तिसरं सेक्स म्हणून कायद्याने मान्यता दयायची? जर तिसरं सेक्स म्हणून कायदयाने मानलं तर त्यांचे अधिकार कोणते? तृतीयपंथी लोकांना इलेक्शन कमिशनने मतदार ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. यात ‘पुरुष’ किंवा ‘स्त्री’ यांच्याऐवजी ‘इतर’ हा लिंगाचा प्रकार वापरण्यात यावा असं सुचवलं आहे. पण कायदयाच्या इतर पैलूंमध्ये लिंगाचा प्रकार ‘इतर’ म्हणून चालणार का?
  • ‘SRS’ करून पुरुषापासून स्त्री बनली किंवा स्त्रीपासून पुरुष बनला तर लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणं या सर्वांसाठी कोणते कायदे लावणार? पुरुषाचे का स्त्रीचे? हे कायदे त्यांच्या बदललेल्या लिंगावर आधारित असणार की त्यांच्या जन्माच्या वेळेच्या लिंगावर आधारित असणार? उदा.वडिलांनी वारसा हक्क सगळा मुलांसाठीच ठेवला. त्यांची एक मुलगी ‘SRS’ करून पुरुष बनली तर त्याला मुलगा मानून वाटा मिळणार का?

आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर  व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. यापुढे पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना स्त्रीचं पुरुषात रुपांतर करताना काय काय पर्याय असू शकतात  व शस्त्रक्रियेनंतर काय?  याबाबत माहिती पुढच्या भागात घेणार आहोत.

संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग. ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा  साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा  मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे  विक्रीसाठी उपलब्ध)

Image Courtesy : https://iraniansurgery.com/en/sex-reassignment-surgerymale-to-female-in-iran/#

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap