शब्दवेडी… आपली लेखणीला पार्टनर आणि लिखाणाला लेकरं मानणारी शब्दवेडी दिशा. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथे तथापिने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिशाची मुलाखत घेतली होती. लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी दिशा पोटतिडीकीने बोलत होती. मुलाखतीचा पहिला भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.
प्रश्न – आपल्या प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते. प्रत्येकाच्या ओळखीमध्ये लैंगिकता हा महत्वाचा भाग आहे. लैंगिक विविधता किंवा मुख्य प्रवाहापासून वेगळ्या लैंगिक ओळखीबद्दल काही सांगू शकशील का ?
शब्दवेडी दिशा: सगळ्यात पहिल्यांदा मला जेन्डर या संकल्पनेबद्दल बोलायचंय. जेन्डर कशा प्रकारे बनतं हे सिमोन द बुवारनं त्यांच्या द सेकंड सेक्स या पुस्तकात सांगितलंय. त्या म्हणतात, की जन्मतः कुणी मुलगा किंवा मुलगी नसते तर त्यांना तशा प्रकारे घडवलं जातं. आपण मात्र बाळ जन्माला आल्यावर फक्त योनी किंवा लिंग बघून ते स्त्री आहे की पुरुष हे ठरवतो. आपल्याकडे दोनच सेक्स मानले जातात. पण मुळात सेक्स आणि जेन्डर या दोन भिन्न गोष्टी आहेत. जिथं एखाद्या बाळाला योनी किंवा लिंग हे अवयवच नसतात तिथं काय होतं? तिथं आपण असा निष्कर्ष काढून रिकामे होतो की हिजडा जन्माला आलाय. पण हिजडा म्हणजे कोण? हे कशाप्रकारे ठरतं? मुळात जेन्डर ही संकल्पना कमरेखालचा अवयव बघून ठरत नसते तर ती मेंदू मध्ये ठरत असते. एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष, स्वतःबद्दल काय फील करते यावर त्याचं/तिचं जेन्डर ठरतं. हिजडा हे कोणतं जेन्डर नाही तर ती एक संकल्पना आहे. यामध्ये स्त्रिया असतात आणि पुरुषही असतात. ज्या व्यक्तींचा कुटुंबाने त्याग केला आहे अशा अनेक व्यक्ती या संकल्पनेचा स्वीकार करतात आणि त्यांनाही हिजडा म्हटलं जातं. हिजडा देखील LGBT मध्ये येणाऱ्या व्यक्तींप्रमाणे अल्पसंख्येत असतो, शोषित असतो आणि पीडित असतो. पण मुळात आम्हाला तृतीयपंथी म्हणण्याचा अधिकार समाजाला कुणी दिला? आपण जेव्हा समानतेची भाषा करतो तेव्हा पहिल्यांदा पुरुष, मग स्त्री आणि मग ‘इतर’ असं का म्हणलं जातं? आमची लैंगिकता वेगळी आहे, आमचं दिसणं वेगळं आहे, आमची आयडेंटिटी वेगळी आहे. त्याप्रमाणेच आम्हाला बघितलं पाहिजे. त्यात पण जेव्हा समाज मला ट्रान्सजेन्डर म्हणून हाक मारतो, तेव्हा तो मला याची आठवण करून देत असतो की मी जन्मतः जसा आहे तसा नाहीये तर नंतर बदललोय. थोडक्यात सर्वच बाजूंनी आम्हाला समाजापासून वेगळं काढलं जातं मग ते भाषेद्वारे असेल किंवा जशा पद्धतीची वागणूक आम्हाला दिली जाते त्या वागणुकीमधून असेल. समाजाने बनवलेली दुसरी महत्वाची संस्था म्हणजे विवाह संस्था. विवाह संस्थेबद्दल बोलायचं झालं, तर पाहिलं तर ती एक समाजव्यवस्था आहे आणि ती मुळात बनवली गेली स्त्रियांवर, त्यांच्या प्रजनन करण्याच्या क्षमतेवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून. पण जर एखाद्या व्यक्तीचा पार्टनर त्या व्यक्तीबरोबर खुश नसेल आणि ती व्यक्ती समाजाच्या दबावाखाली आपल्या पार्टनरला बाजूला करत नसेल तर ते ही एक प्रकारचं शोषण आहे. समाज महिलांना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या पुरुषांवर अवलंबून राहायला लावतो त्यामुळं सर्वांनी आणि खासकरून महिलांनी स्वतंत्र होणं गरजेचं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
प्रश्न – दिशा, तुला स्वतःच्या लैंगिकतेविषयी कधी आणि कसं समजलं? स्वतःच्या लैंगिकतेला तू कसं स्वीकारलंस? काही अडचणी आल्या का ? अडचणींचा कसा सामना केला ?
शब्दवेडी दिशा: एखादा हिजडा कोणत्या परिस्थितीमधून जातो असं जर तू मला विचारशील, तर मी म्हणेन की ज्या परिस्थितीमधून LGBT कम्युनिटीतील इतर लोक जातात त्याच परिस्थितीमधून हिजडा कम्युनिटीमधील लोक जातात. त्यांनाही तशाच प्रकारे हिणवलं जातं, चिडवलं जातं, त्यांचंही लैंगिक शोषण होतं, कुटुंबातले लोक त्यांनाही बाजूला करतात. मी पण याच सगळ्या परिस्थितीमधून गेले. लहानपणापासून मला मुलींसारखं वागायला आवडायचं. घरात मुलींची कामं करायला आवडायचं. मी लहान असताना अंगावर साडी सारखा पंचा गुंडाळून, गरोदर बायका झोपतात तसं पलंगावर झोपायचे आणि दुसऱ्या एखाद्या मुलीला सांगायचे जसं बाळ जन्माला येतं तसं माझ्या दोन पायांच्या मधून बाहुलीला बाहेर काढ.
प्रश्न – आपल्या पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्री, पुरुष या जेंडरला किंवा स्त्री-पुरुष नातेसंबंधांनाच मान्यता मिळताना दिसते. आजूबाजूला असे वातावरण असताना तू तुझ्या कुटुंबियांना आणि मित्र-मैत्रिणींना तुझ्या लैंगिक ओळखीविषयी कसं सांगितलंस आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?
शब्दवेडी दिशा: मोठी झाल्यावर घरचे लग्नासाठी मागं लागले. मला लग्न करण्याची इच्छा नाही असं जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा माझ्या घरचे लग्न करण्यासाठी माझ्यावर दडपण आणू लागले. एकदा त्यांनी माझ्या परस्पर माझं लग्न ठरवलं आणि माझी एंगेजमेंटची तारीख पण फिक्स केली. आणि मला न सांगताच मला तिकडं घेऊन गेले. जेव्हा मला लक्षात आलं, की माझीच एंगेजमेंट आहे तेव्हा मी काहीतरी कारण काढून घराबाहेर पडले आणि तिकडून पळून गेले आणि मुंबईला हमसफर मध्ये आले. तीन महिन्यांनी जेव्हा मी घरी परत आले तेव्हा पहिल्यांदा कुणी काहीच केलं नाही पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी माझं जेन्डर बदललंय, तेव्हा सगळ्यांनी नाटक करायला सुरवात केली. आणि मला घरातून बाहेर काढलं. तेव्हा मला वाटलं की इतकी वर्षं जे घरच्यांसाठी केलं ते सगळं वाया गेलं.
नोट: ‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २ पुढच्या मंगळवारी, दिनांक १९ सप्टेंबर २०१७ ला प्रकाशित केला जाईल. यामध्ये हिजडा समाजातील नाती, प्रेम, कमिटमेंट, इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि लैंगिक विविधतेला स्वीकारलं जावं यासाठी काय करायला हवं याविषयी दिशा बोलली आहे. तोपर्यंत मुलाखत वाचून काय वाटलं ते नक्की सांगा.
शब्दांकन : निहार सप्रे
No Responses