”कथ्थक शिकत असताना आम्ही सगळेच नृत्याची एकच स्टँन्डर्ड भाषा शिकत होतो. कथ्थक शिकताना पुरुषासारखे किंवा स्त्रियांसारखे नाचायचे नसते तर ग्रेसफुली अर्थात लावण्ययुक्त नाचायचे असते, एव्हढेच गुरूंकडून शिकायला मिळत होते. हातांची मुव्हमेंट पूर्ण व्हायला हवी किंवा पायांचे आघात पूर्ण पडायला हवेत, बोल स्वच्छ निघायला हवेत यावरच सारा कटाक्ष असायचा. पण…”
A woman in man’s business is progressive, but a man in woman’s business is pathetic – Dance like a man
लहानपणापासून आपण अनेक गुरूंच्या कथा ऐकत आलेले असतो. आणि हे सर्व गुरु पुरुषमंडळीच असतात. मग ते पुराणात आणि महाकाव्यात उल्लेखलेले देवांचे गुरु बृहस्पती असोत, असुरांचे गुरु शुक्र, रामाचे गुरु वसिष्ठ किंवा कौरव-पांडवांचे गुरु द्रोण किंवा कृष्णाचे सांदिपनी. शिक्षण हे नेहमीच पुरुषांचे क्षेत्र राहिले आहे. इतिहासातदेखील अनेक गुरूंचे दाखले देता येतात. ज्ञानेश्वरांचे त्यांचे वडीलबंधू निवृत्तीनाथ होते तर तुकारामांचे गुरु बाबाजी चैतन्य, अपवाद काय तो शिवाजी महाराजांचा – जिजाबाई शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या; पण तेथेही दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी आणि तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांचे गुरुपद दिले गेले आहे. कलेच्या क्षेत्रात तर पुरुषांनी गुरुस्थानी असणे हे जवळ जवळ निश्चित आहे. अगदी ज्यांच्यापासून नृत्याची उत्पत्ती झाली ते आद्यगुरु शिव आहे असं मानण्यात येतं. पण मला कॉलेजमध्ये आणि कथ्थकचे धडे गिरवताना जे धडे मिळाले त्या मात्र स्त्रिया होत्या.
आमची शाळा हा मेरीटचा कारखाना होती. त्यामुळे शाळेत असताना सतत कन्व्हेयर बेल्टवर समोर सरकत राहिल्यासारखे असायचे. मार्क मिळवा, पास व्हा, पुढे सरका. मार्क मिळाले नाहीत की लगेच ‘रिजेक्टेड प्रोडक्ट’मध्ये रवानगी व्हायची. शाळेपासून सुटका अर्थात दहा वर्षानंतर झाली. तेव्हा कुठे सुटकेचा श्वास टाकता आला. मग आजूबाजूचं जग दिसायला लागलं. आत्तापर्यंत शाळेत सतत बाहेरच्या जगाची भीती घातली जायची, ते बाहेरचे जग इतके भयानक नाही हे अनुभवायला यायला लागले. महत्वाचे म्हणजे आता कन्व्हेयर बेल्ट नव्हता. ते पुस्तकातले चार मुद्दे पाठ करून, तसेच्या तसे लिहिणे नव्हते. लायब्ररीत पुस्तके मागता येत होती. ठरवलेली पुस्तकेच वाचायची सक्ती नव्हती. मोकळा श्वास घेणे म्हणजे काय हे कळत होते.
माझे खरे कॉलेजमधले interaction सुरु झाले ते मी एमएला असताना. तेव्हा मी नुकतीच अॅन रँडची पुस्तकं वाचली होती. फाउंटन हेड, अॅटलस श्रग्ड ह्या कादंबऱ्या, रोमँन्टिक मेनिफेस्टो, कॅपिटॅलीझम– द अननोन आयडॉल वगैरे पुस्तकांचा फडशा पाडला होता. अॅन रँड तेव्हा माझ्यासाठी शेवटचा शब्द होता. शिवाय तारुण्यांची उर्मी होती. जग झपाट्याने बदलत होते आणि आपण त्या बदलत्या जगाचा जागरूक हिस्सा होतोय याची जाणीव होती. एम.ए. अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अंजली कुलकर्णी होत्या. कुलकर्णी मॅडम मिश्रअर्थव्यवस्थेच्या समर्थक होत्या आणि बदलत्या जगाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्यासोबत अर्थशास्त्रावर चर्चासत्र झडायची. अनेक मुद्दे त्यांच्यासोबत चर्चेला घेता येत. हे असे का? ते असेच का? हे प्रश्न विचारता यायचे. आपली वैचारिक बैठक कशी पक्की करता येते हे मी त्यांच्याकडे शिकलो. मॅडम काय वाचतात आणि ते आपण कसं मिळवून वाचलं पाहिजे, हाच तेव्हा एक विचार होता. मुक्त अर्थव्यवस्थेची चर्चा करताना लगेच तू ‘अॅफ्लूअंट सोसायटी’ वाचलंस का? असा प्रश्न असायचा. कम्युनिस्ट विचार चुकीचा आहे असे म्हणणे रेटले की तू ‘दास कॅपिटल’ वाच, ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ वाच, तो पहा कपाटात आहे, घेऊन जा आणि वाचून परत कर; रिसर्च पेपर असा लिहायचा असतो, असे त्या सतत सांगत असायच्या. मुद्दे कसे मांडायचे असतात, किंवा खोडायचे असतात याचे शिक्षण त्यांच्याकडून मला मिळत होते. पुढे एम.ए झाल्यावर कुलकर्णी मॅडमबरोबर जागतिक बँकेच्या एका प्रोजेक्टवर काम करायला मिळाले. संरक्षित जंगलांचे प्रश्न, तसेच तिथे रहाणाऱ्या लोकांचे प्रश्न समजावून घेता आले. विचार कसा करायचा याची एक शिस्त मला मॅडमनी लावली.
त्याआधी बरीच वर्षं मी कथ्थकचे शिक्षण घेत होतो. तेव्हा श्रीमती ज्योती वज्रे, डॉ. साधना नाफडे, सौ. ललिता हरदास या मला गुरुस्थानी होत्या. या तिघींपैकी ललिता हरदास या जयपूर घराण्याच्या गुरु होत्या तर श्रीमती वज्रे आणि डॉ. साधना नाफडे या ग्वाल्हेर घराण्याच्या होत्या. घराण्याच्या मर्यादांमध्ये तोडे शिकणे किंवा हस्तक शिकणे यातही एक खुमारी असायची. आजूबाजूला असलेल्या मुली आणि त्यात आम्ही दोन तीनच मुलं. पुढे मी ज्या क्लासमध्ये कथ्थक शिकत होतो, तिथल्या एका मुलाने दहावी आहे म्हणून कथ्थक सोडले. त्यामुळे माझ्या डान्स क्लासमध्ये मग मी एकटाच मुलगा उरलो तर दुसरा मुलगा हा दुसऱ्या क्लासमध्ये होता. मी कथ्थक शिकत होतो, तेव्हा आम्ही कथ्थकला “डान्स क्लास”च म्हणायचो आणि सगळे जण डान्स क्लासला “डान्स” शिकायला जायचो.
जेव्हा मी कथ्थक शिकायला सुरवात केली, तेव्हा मी आठवीत होतो. त्यामुळे एक साधारण समज विकसित झाली होती. पण आमच्या क्लासला येणाऱ्या बहुतांश मुली या पहिली दुसरीत असायच्या. त्यातल्या काही केवळ उन्हाळ्यात “समर अॅक्टिवीटी”साठी आलेल्या असायच्या. काहीजणी अगदी प्रारंभिक किंवा प्रवेशिका पास होण्यापुरत्या शिकायला यायच्या. तर काहीजणी केवळ आईची हौस म्हणून सातवीपर्यंत कथ्थक शिकायच्या. एकदा आठवीत गेल्या की त्यांचा आणि नृत्याचा संबंध कायमचा संपायचा. कारण दहावीचे क्लास सुरु झालेले असायचे. एक दोन जणी तर दहावीनंतर किंवा ग्रॅज्यूएशनला असताना शिकायला यायच्या; पण त्यांची संख्या फारच थोडी असायची, शिवाय त्यापण दोन चार महिने कथ्थक शिकायला आलेल्या असायच्या. आता वयाने लहान असणाऱ्या मुलींना किंवा दोन तीन महिने डान्स क्लासला येणाऱ्या मुलींना कथ्थकचे ततकार जरी आले तरी खूप असायचे. नाहीतर निदान हस्तक आणि एक दोन तोडे शिकता आले तरी त्यातच त्यांचे दोन महिने संपून जायचे. कथ्थकसाठी घुंगरू घ्यायचे असतील तरी निदान चार पाच महिने ती मुलगी क्लासला येत असेल किंवा परीक्षेला बसणार असेल तरच आग्रह असायचा. जे आम्ही अनेक वर्षं शिकत राहायचो, त्यांनादेखील कथ्थक शिकणे ही सोपी बाब नव्हती. काय नाचायला जातेस किंवा जातोस असा टोमणा असायचा. घुंगरू घालून नाचतोस तू, असा तिरस्कार असायचा. तुमच्या डान्स टीचरपण घुंगरू घालून नाचतात, असा शेरा असायचा.
कथ्थक शिकत असताना आम्ही सगळेच नृत्याची एकच स्टँन्डर्ड भाषा शिकत होतो. कथ्थक शिकताना पुरुषासारखे किंवा स्त्रियांसारखे नाचायचे नसते तर ग्रेसफुली अर्थात लावण्ययुक्त नाचायचे असते, एव्हढेच गुरूंकडून शिकायला मिळत होते. हातांची मुव्हमेंट पूर्ण व्हायला हवी किंवा पायांचे आघात पूर्ण पडायला हवेत, बोल स्वच्छ निघायला हवेत यावरच सारा कटाक्ष असायचा. भाव व्यक्त करताना अशी नेत्रपल्लवी हवी, हातांच्या मुद्रांचा असा वापर करायला हवा, शरीराची ही ठेवण असायला हवी याकडे लक्ष दिले जायचे. ‘भावभंगीमा’ ही त्यासाठी exact टर्म होती. त्यात सगळंच फार तांत्रिक होतं. आणि त्या तंत्रशुध्दतेवरच अधिक जोर असायचा.
तोडे, तुकडे, परन, कवित्त करताना जेन्डर आडवं येत नव्हतं. कदाचित ती जाणीवपण नव्हती. गतभाव करताना मात्र माझे मतभेद व्हायचे, ते सहाजिक होते असे मला अजूनही वाटते. गत करून भाव व्यक्त करणे हा मुद्दा मला मान्य होता. ही शब्दाची फोड पण ठीक होती. त्यात स्वतःला राधा समजून कृष्णाशी समरस होणे हाही वादाचा मुद्दा नव्हता. माझा मुद्दा एवढाच असायचा की त्यात कृष्णाची बाजू पण यायला हवी. इतकंच नव्हे तर तो अँगलपण असायला हवा. कारण जर राधेला कृष्णाबद्दल एवढे प्रेम वाटते तर कृष्णालाही राधेबद्दल काहीतरी वाटायला हवे. ते वाटणे काय असू शकते? ते डान्समधून कसे दाखवता येईल असे प्रश्न असायचे. मग तू खूप क्रीएटीव आहेस, पण आपल्या सीलॅबसमध्ये एवढेच दिले आहे असे उत्तर मिळायचे. क्रीएटीव म्हणजे काय हे नंतर मला टी.व्ही. इंडस्ट्री जॉईन केल्यावर समजले. पण तो शिकण्याचा काळ होता.
जेन्डर आणि सेक्शुअॅलिटी या दोन्ही संकल्पना नृत्याच्या बाहेरच्या कल्पना होत्या. नृत्य हे जेन्डर स्पेसिफिक असते किंवा पुरुषांनी हे करू नये किंवा तेच करावे ही फार नृत्याच्या बाहेरच्या जगातली जाणीव होती. म्हणजे ठुमरी ही माझ्या गुरुंसाठी किंवा माझ्यासाठी ठुमरीच होती, ती ठुमरीच्या भावभंगीमेसोबत शिकवली आणि शिकली जायची. पण ठुमरीच्या ऐवजी भजन किंवा अभंग हा पब्लिक परफॉरमन्स असायचा. ती सामाजिक मागणी होती. तिथे आपले जेन्डर आपल्या आडवे येते आणि ठुमरी करता येत नाही हे दुःख असायचे.
माझा एक झगडा तर ‘सतत कथ्थक करणारी मुले ही आत्यंतिक स्त्रैण असतात’ या गोष्टीसोबतच असायचा. कथ्थक करणारे म्हणलं की ज्या लोकांचा नृत्याशी काही संबंध नाही अशांकडून मला सजेशन यायचे, तू साडी घालून डान्स कर किंवा पुरुषांसारखा डान्स कर तेव्हा विचित्र वाटायचे. कारण साडी हा माझा दररोज घालायचा ड्रेस नव्हता. अगदी कथ्थकसाठी कुर्ता पायजमा घालण्यापेक्षा मला शर्ट किंवा टी शर्ट आणि पँन्ट किंवा जीन्स जास्त सुटसुटीत वाटायचे; अजूनही वाटतात. कुर्ता पायजमा हा एकेकाळचा ड्रेस होता. आता बहुतांश मुले तो घालतही नाहीत किंवा traditional डे ला घालतात हे त्यामागचे लॉजिक. मी डान्स क्लासला जातानासुद्धा कधी कुर्ता पायजमा घालत नसे. मग उगाच एक दिवस तो घालणे, त्यात पर्फोरमंस करणे मला कटकटीचे वाटायचे. शिवाय टाईट जीन्स-टी शर्टमध्ये शरीराच्या मुव्हमेंट जास्त स्पष्ट दिसतात, अधिकच शार्प होतात. तीच बाब पुरुषांसारख्या डान्सची. कथ्थकचे एक तंत्र आहे आणि त्यानुसारच ते केले जाते. कथ्थकचा जसा जसा अभ्यास वाढत गेला आणि पुढे एम. एफ. ए ड्रामा करताना नाट्यशास्त्राचा अभ्यास करता आला तेव्हा तर ही बाब अधिकच स्पष्ट होत गेली. आपल्याकडे भावभंगीमाचं एक शास्त्र आहे. प्राचीन मूर्त्यांमध्ये ते आपल्याला पाहताही येतं. त्यात स्त्री पुरुषांची body language वेगळी केली गेलेली नाही. ती एकसारखी आहे. त्रिभंग हा कृष्णासाठीपण आहे आणि राधेसाठीपण. बहुतेक मुद्रा पण दोन्हीकडे सारख्या आहे. फरक असतो तो मुद्रांच्या वापरात. कृष्णाची बासरी आणि राधेचा पदर दाखवला कि दोन व्यक्ती वेगवेगळ्या होतात. अन्यथा एकच शिव त्याक्षणी अर्धनारीनटेश्वर होतोच ना. स्त्री पुरुषांची वेगवेगळी body language ही युरोपिअन संकल्पना आहे आणि सध्या तिच्यावरची पुस्तके सगळीकडे उपलब्ध असल्याने ती वाचून आपल्यापैकी अनेक जण body language एक्सपर्ट पण बनलेत. मग भारतीय नृत्यकारांवर ती body language लादण्यात येते.
कथ्थकचे एक तंत्र आहे असे मला तेव्हाही वाटत होते आणि अजूनही वाटते. तंत्रावर हुकुमत आली कि त्यात प्रयोग करता येतात. नवे हस्तक, नवे पदन्यास, नव्या भावमुद्रा तयार होऊ शकतात. अगदी टेलीफोन येणे, तो घेणे यावर आधारित तुकडे कथ्थकमध्ये आहेत.
कथ्थक हे मुळात तवायफांनी चालवलेले, आकाराला आलेले नृत्य होते, त्यातला शृंगार-उत्तानता कितीही कमी करायची म्हणलं तरी ती होणार नव्हतेच. अगदी तोडे, तुकडे, परन एकवेळ चेहरा कोरा ठेवून करता येतील; पण कवित्त, गतभाव, अभिनय प्रस्तुती करायची म्हणलं की चेहरा हावभाव व्यक्त करणारच. कौन गली श्याम किंवा श्याम सुंदर आये मेरे घर ही ठुमरी भाक्तीरसात भिजवतो म्हटले तरी भिजत नव्हती आणि पनिहारी गतभाव करताना कृष्णाने पाण्याचा माठ फोडल्यावर चिंब भिजलेले अंग झाकताना ओठ दाबले जाणे, शरीर आक्रसणे, आपल्याला कोणी पहिले तर नाही ना या भावना चेहेऱ्यावर येणे साहजिक होते. त्यात शृंगार होता. पण याला एकदा मधुराभक्ती म्हटली कि मग सगळे थोडे सहनीय असायचे.
अजून एक मतभेदाचा मुद्दा होता. डान्स ड्रामा करताना कृष्ण, राम, अगदी गौतम बुद्धाचा रोल पण मुलीच करायच्या. मला अजूनही आठवते, एकदा मला माझ्या डान्स टीचर म्हणाल्या होत्या; अरे मुली नाजूक असतात ना, त्या राम किंवा कृष्णाच्या रोलमध्ये छान दिसतात. मग मला पुरुषभूमिकांमध्ये निगेटिव रोल तरी वाट्याला यायचे किंवा फारच बिन महत्वाचे रोल यायचे. टीव्हीवरून दिसणाऱ्या नृत्याच्या कार्यक्रमांमधून पण मुलीच पुरुषांचा रोल करताना दिसायच्या. कदाचित आजपासून बारापंधरा वर्षांपूर्वी हाच एक्सपेकटेड ट्रेंड होता.
असे असले तरी माझी कथ्थक शिकण्याची वर्षं आनंदाची होती. पुढे माझा पण डान्स क्लास बंद झाला. तोपर्यंत जे शिकलो होतो, ते मात्र भरपूर होतं. त्यानंतर अनेक वर्षं मी कोरिओग्राफी करत होतो. कथ्थक शिकताना एक हलकीशी जाणीव होती, कथ्थक हे ‘एन्ड इन इटसेल्फ’ नाही. तो मार्ग आहे; ज्याचा अंत अजून कशात तरी आहे. ‘कथा कहे सो कथक कहावे’ असं म्हणले जाते. मला ही कथा सांगायची होती, मग मी नाटक शिकायचं ठरवलं आणि कथ्थकचा एन्ड यूज दिसायला लागला. नवी क्षितीजं समोर होती. नाटकांकडे वळल्यावर मला डान्स ड्रामाचा फॉर्म अधिकच जवळचा वाटायला लागला. त्यातून काव्यनाट्य करणे किंवा दुष्यंतप्रिय नाटक करताना नृत्याचा वापर करणे मला सहज शक्य झाले.
जेन्डर सेक्शुअॅलिटीचा आयडेंटीटी क्रायसिस मला कथ्थक शिकताना कधी आला नाही. उलट तेव्हा मी फार सुरक्षित होतो, भिन्नलिंगी आकर्षण असायला हवे, मैत्रीण असायला हवी, मुलींनी आपल्याशी बोलायला हवे वगैरे कल्पना तेव्हा मला शिवत नव्हत्या. माझ्या मित्रांना एका मुलीशी मैत्री असणं ही अचीवमेंट वाटत असताना मला निदान दहा मैत्रिणी होत्या. त्यातल्या दोघी तर अतिशय जवळच्या होत्या. इतक्या कि घरच्यांना शंका यावी, याचं काही लफडं तर नाही ना? अर्थात पुढे आमचे मार्ग वेगळे झाले.
मी कथ्थक शिकलो म्हणून माझी सेक्शुअॅलिटी बदलली का? याचे उत्तर पण तितक्याच ठामपणे देता येईल! नाही. माझी लैंगिकता मी जेव्हा शोधून काढली, तेव्हा उलट मी मनापासून कथ्थकला आणि माझ्या मैत्रिणींना धन्यवादच दिले. कदाचित १७ व्या १८ व्या वर्षी मला माझी लैंगिकता जाणवली असती तर एक मोडलेपण आले असते. २७ व्या वर्षी स्वतःची लैंगिकता स्वीकारताना किंवा ती डिफेंड करताना त्रास झाला नाही.
आजही कथ्थक करताना मला तोच आनंद मिळतो, जो पूर्वी मिळत होता. आणि माझी लैंगिकता मला माझ्या आयुष्याचा तितकाच भाग वाटतो, जितका कथ्थकमधले ततकार. ते कथ्थकचा एक भाग आहेत पण म्हणून ते कथ्थकची पूर्ण ओळख नव्हे. पण त्याच्याशिवाय कथ्थकला पूर्णत्वदेखील येत नाही.
हे सगळे ज्यांच्यामुळे सुरु झाले, ज्यांनी मला त्यासाठी उत्तेजन दिले त्या माझ्या गुरु श्रीमती ज्योती वज्रे, सौ ललिता हरदास, आणि डॉ. साधना नाफडे यांचा त्यामुळे मी सदैव ऋणी राहीन.
(पुरुषस्पंदनं माणूसपणाच्या वाटेवरची दिवाळी अंक २०१५ वरून साभार)
No Responses