मागील लेखात पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार समजून घेतले. या लेखात आपण त्याचे आणखी काही प्रकार जाणून घेऊया.
विरूद्धलिंगी व्यक्तीचा पोशाख घालणे (Transvestic disorder)
ट्रान्सव्हेस्टिक डिसऑर्डर या मनोलैंगिक विकारामध्ये व्यक्ती जर पुरुष असेल तर लैंगिक उत्तेजना येण्यासाठी स्त्रीवेश धारण करते. स्त्री प्रमाणे वेशभूषा आणि केशभूषा करते तसेच दागिनेही घालते आणि नटते. एकदा अशी स्त्री वेशभूषा आणि केशभुषा केली की मग अशा व्यक्तीला लैंगिक उत्तेजना किंवा ताठरपणा येतो आणि मग असा पुरुष स्वत:च्या लैंगिक जोडीदाराबरोबर लैंगिक संबध करू शकतो. जर अशा पुरुषाला स्त्रीवेश धारण करता आला नाही तर मग त्याला लैंगिक उत्तेजनाच येत नाही. त्यासाठी असा स्त्रीवेश धारण करणे त्याला अपरिहार्य असते. प्रत्यक्षात तसे केल्यानंतर अथवा तशा प्रकारची दिवास्वप्ने मनामध्ये रंगवली तरच त्यांना लैंगिक उत्तेजना येते त्यानंतर ते हस्तमैथुनाव्दारे किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध करुन लैंगिक समाधान मिळवतात.
तसे पहिले तर असा विरुद्ध लिंगी व्यक्तीचा पोशाख इतर अनेक प्रसंगामध्ये केला जाऊ शकतो मात्र त्याची कारणं वेगवेगळी असतात. लैंगिक उत्तेजना येण्यासाठी ती व्यक्ती तसे करत नसते. उदाहरणार्थ : नाटकामध्ये स्त्रीभूमिका करण्यासाठी स्त्रीवेश धारण करणे किंवा एखादे सोंग वठवण्याकरिता तसे करणे. अनेकदा कृष्णभक्तीने व्याकुळ झालेले भक्त अनेकदा आपल्याला कृष्ण भेटेल या आशेने राधेचा वेश धारण करतात. कधी कधी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी किंवा गुप्तहेर म्हणून काम करत असताना देखील असा स्त्रीवेश धारण केला जाऊ शकतो. मात्र यासगळ्याकडे आपण पॅराफीलिया म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही.
आत्मपीडन (Masochism)
या लैंगिक विकारामध्ये लैंगिक उत्तेजना येण्यासाठी व्यक्तीला लैंगिक जोडीदाराने त्रास देणे, शारीरिक इजा करणे, मारहाण करणे,रागावणे किंवा अपमान करणे, किंवा इतर कोणत्याही प्रकारे इजा करणे या गोष्टी जरूरीच्या वाटतात. जोपर्यंत लैंगिक जोडीदाराकडून अशा प्रकारे मानसिक किंवा शारीरिक पीडा व्यक्तीला केली जात नाही तोपर्यंत अशा व्यक्तींना लैंगिक उत्तेजना येत नाही. म्हणूनच लैंगिक संबंध करण्याआधी अशी व्यक्ती आपल्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारे पीडा करण्याची विनंती करते. अशा प्रकारे प्रत्यक्ष आत्मपीडन करून घेऊन किंवा तशा प्रकारे आपल्याला आपला जोडीदार वागणूक देत आहे असे दिवास्वप्न मनामध्ये रंगवले कि मगच या व्यक्तींना लैंगिक उत्तेजना आणि पुढे लैंगिक समाधान मिळते.
अनेकदा अशा प्रकारे वर्तन करण्यास लैंगिक जोडीदाराकडून नकार मिळू शकतो किंवा त्याला तसे वागणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. त्यामधून पुढे आंतरवैयक्तिक संबंधांना तडा जाऊ शकतो. विवाह केला असल्यास तो टिकवून ठेवणे अशक्य होऊन बसते. याची व्यक्तीला संपूर्ण कल्पना असली तरीसुद्धा या पॅराफीलियामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची असहाय्यता आलेली असते आणि लैगिक समाधान मिळवण्यासाठी अशी व्यक्ती जोडीदाराच्या आक्रमक वर्तनावर संपूर्णपणे अवलंबून असते.
परपीडन (sadism)
आत्मपीडन या पॅराफीलियाच्या बरोब्बर विरुद्ध गोष्ट परपीडन किंवा सॅडीझममध्ये होत असते. परपीडन या प्रकारात लैंगिक जोडीदारावरती आक्रमकता दाखवून, तिला शारीरिक इजा करून किंवा मारहाण करून अथवा भाषिक किंवा शाब्दिक अत्याचार करून किंवा अन्य कोणत्यातरी प्रकारे लैंगिक जोडीदाराला त्रास दिला जातो. असे झाल्यानंतरच मग परपीडन हा पॅराफीलिया असलेल्या व्यक्तींना लैंगिक उत्तेजना येते आणि मग पुढे तिला लैंगिक संबंध प्रस्थापित करता येतात. अन्यथा ती व्यक्ती असे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अपयशी ठरते. अनेकदा जोडीदाराच्या आक्रमक वर्तनाचा किंवा शारीरिक अथवा मानसिक पीडा करण्याच्या वृत्तीचा जोडीदारावरती विपरीत परिणाम होतो आणि एक प्रकारची दहशत तिच्या मनात उत्पन्न होते. त्यामुळे तिचे स्वतःचे लैंगिक जीवन आणि समाधान धोक्यात येऊ शकते. म्हणूनच परपीडन या पॅराफीलियाचे आंतरवैयक्तिक संबंधांवरती अतिशय गंभीर नकारात्मक परिणाम होतात आणि वैवाहिक संबंधांमध्ये असे होत असल्यास गोष्टी घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात.
पीडोफिलीया (Pedophilia)
या मनोलैंगिक विकारांमध्ये व्यक्तीला अगदी लहान मुलांमुलींच्या शरीराबद्दल अथवा नुकत्याच वयात येत असलेल्या मुलांमुलींच्या शरीराबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. त्यांच्या बद्दलची लैंगिक दिवास्वप्ने पाहून किंवा या वयोगटातील मुलांशी लैंगिक वर्तन करून या व्यक्तिंना लैंगिक उत्तेजना आणि लैंगिक समाधान मिळते. आपण ह्या लेखमालेमध्ये पीडोफिलीयाबद्दलची माहिती, त्याची तपासणी, उपचार या सगळ्या बद्द्ल सविस्तर माहिती घेतलेली असल्यामुळे प्रस्तुत लेखामध्ये जास्त सविस्तरपणे माहिती दिलेली नाही. (अधिक माहितीसाठी निळ्या शब्दांवर क्लिक करा.)
आता आपल्या सर्व वाचकांच्या लक्षात आलं असेल की पॅराफीलिया म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारच्या कल्पनांचा, त्यांचा दिवास्वप्नांचा एक पक्का नमुना तयार झालेला असतो आणि प्रत्येकाच्या पॅराफीलियानूसार विशिष्ट गोष्टीची दिवास्वप्ने पाहिली जातात, अनेकदा असे विचार अथवा कल्पना प्रत्यक्ष वर्तनामध्ये देखील दिसू लागतात तेव्हा पॅराफीलियाचे पॅराफीलिक डिसओर्डर मध्ये रुपांतर होते. पॅराफीलियांच्या या विविध प्रकारांमध्ये कधी-कधी व्यक्तीची स्वतःची स्वतःबरोबर गुंतवणूक असते किंवा तिला एखादा पदार्थ, वस्तू याबद्दल लैगिक आकर्षण वाटते आणि तिसऱ्या प्रकारांमध्ये व्यक्ती स्वतःच्या लैंगिक मागण्या पूर्ण करण्यासाठी लैंगिक जोडीदारावर अवलंबून असते.
सरतेशेवटी एक मात्र नक्की एखाद्या विचाराचा किंवा वर्तनाचा जर व्यक्तीला त्रास होत असेल, अथवा त्यामुळे तिचे अथवा इतरांचे लैंगिक जीवन धोकादायक परिस्थितीमध्ये येत असेल तर अशा व्यक्तीने आपण होऊन पुढे येऊन उपचार घ्यायला हवेत आणि आत्मनियंत्रण आणि इतर अनेक गोष्टी शिकून घेऊन स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याची गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी सुधारली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:चे आणि इतरांचे लैंगिक स्वास्थ्य जपायला हवे..
चित्र साभार :
https://www.webpsychology.com/news/2015/05/15/best-ways-treat-gender-dysphoria-217566
https://www.lehmiller.com/blog/2014/5/18/how-common-are-sexual-sadism-and-masochism
No Responses